धर्मेंद्र-अमिताभला ‘जय-वीरू’ नव्हे तर शोले मधील हे दोन पात्र साकारायचे होते, पण….

१९७५ साली शोले रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी शोलेला भरभरून प्रतिसाद दिला. इतक्या वर्षानंतर आजही जेव्हा शोले टीव्हीवर दाखवला जातो तेंव्हा तो आवर्जून पहावासा वाटतो. जय -वीरूची दोस्ती, गब्बरसिंग नावाचा खलनायक, आपल्या कुटुंबियांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आतुर झालेला ठाकूर हि सगळीच पात्रं उत्तमरीत्या साकारली गेली आहेत.
तुमच्या आमच्या डोळ्यासमोर त्या सिनेमातील एखाद्या पात्राचे नाव घेतले कि पटकन तो चेहरा डोळ्यासमोर येतो. शोलेमधील ठाकूर बलदेवसिंग ह्या पात्राचे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येतो अंगावर नेहमी शाल गुंडाळून असणारा संजीव कुमार, गब्बरसिंग नाव काढताच डोळ्यासमोर येतो अमजद खानने रंगवलेला क्रूर डाकू आणि जय-वीरू म्हणताच डोळ्यासमोर दिसतात “ये दोस्ती हम नहीं तोडेंगे” असं गाणं गुणगुणत मोटारसायकलवरून जाणारे अमिताभ आणि धर्मेंद्र.
आपल्याला असं वाटतं कि शोले चित्रपटाचे नायक अमिताभ आणि धर्मेंद्र आहेत. पण स्वतः धर्मेंद्र आपल्याला मिळालेल्या वीरूच्या रोलबद्दल फारसा आनंदी नव्हता. हा किस्सा जेव्हा आमच्या वाचण्यात आला तेव्हा खरंतर आम्हाला जरा आश्चर्यच वाटलं. वीरूची इतकी चांगली भूमिका धर्मेंद्रला का नकोशी वाटली आणि त्याला वीरू साकारायचा नव्हता तर मग कोणती भूमिका त्याला हवी होती ? तर त्याला करायचा होता ठाकूर बलदेवसिंगचा रोल.
मग तो आपला हट्ट सोडायला कसा तयार झाला ? संजीव कुमार सुद्धा सुरुवातीला ठाकूरची भूमिका करायला तयार नव्हता. मग असं काय घडलं कि तो ह्या भूमिकेसाठी तयार झाला.
मे १९७३, त्याकाळच्या एका प्रसिद्ध साप्ताहिकात म्हणजे “स्क्रीन” या साप्ताहिकात शोलेची भलीमोठी जाहिरात झळकली. चित्रपटातील कलाकारांची नावे लोकांना कळाली. साहजिकच कलाकारांची एवढी तगडी फौज पाहून प्रेक्षकांनाही ह्या चित्रपटाबद्दल कुतूहल वाटू लागले. धर्मेंद्र, संजीव कुमार, हेमा मालिनी, अमिताभ, जया भादुरी हे कलाकार शोलेमध्ये असतील हे निश्चित झाले. इकडे चित्रपटाशी संबंधित सर्व प्रमुख व्यक्ती म्हणजेच सलीम -जावेद, रमेश सिप्पी व शोलेतील मुख्य कलाकार असे सर्वजण चित्रपटाच्या पटकथा वाचनासाठी एकत्र जमले.
सकाळी ९ वाजता प्रत्यक्ष वाचनास सुरुवात झाली. सलीम -जावेद ह्यांनी पटकथेचे वाचन अश्या प्रकारे केले कि सर्व कलाकार अक्षरशः तहान, भूक विसरून पटकथा ऐकण्यात गुंग झाले. ह्या सर्व कलाकारांसमोर खाण्यापिण्यासाठी विविध पदार्थ ठेवण्यात आले खरे पण कुणाचेच त्याकडे लक्ष नव्हते. वाचता वाचता सलीम – जावेदने १० मिनिटांसाठी वाचन थांबवले पण कलाकार त्यात एवढे गुंग झाले होते कि त्यांना वाचन थांबवल्याचे लक्षातच आले नाही. अखेर सर्व कलाकार आपापल्या तंद्रीतून बाहेर आले. सर्वांना कथा प्रचंड आवडली खरी पण एक नवीनच प्रश्न रमेश सिप्पी ह्यांच्यापुढे उभा राहिला.
त्याचं झालं असं कि चित्रपटातील प्रत्येक कलाकाराला दुसऱ्या कलाकाराचा रोल जास्त आवडला होता.
धर्मेंद्र बोलला मी वीरूचा रोल नाही करणार मला ठाकूर बलदेवसिंगचं साकारायचा आहे. धर्मेंद्रचा हा हट्ट असतानाच संजीव कुमारने वेगळेच म्हणणे मांडले. त्याला ठाकूर बलदेवसिंग नको होता, त्याला हवा होता डाकू गब्बरसिंगचा रोल आणि अमिताभला ठाकूरचा रोल आवडलेला.
रमेश सिप्पी ह्यांना कळेचना कि ह्यांना कसं समजावून सांगावं.
ह्यावर रमेश सिप्पी ह्यांनी एक आयडिया केली त्यांनी आपला मोर्चा आधी संजीव कुमारकडे वळवला. सिप्पी त्याला बोलले “तुला डाकू गब्बरसिंग करायचाय का, पण अशी भूमिका तू करणार असशील तर तुझ्या पुढच्या कारकिर्दीत तुला कुणी वेगळ्या भूमिका ऑफर करेल का ? सिप्पीचा बाण बरोबर लागला होता. त्यांच्या ह्या बोलण्यावर संजीव कुमार निरुत्तर झाले व ठाकूर बलदेवसिंग साकारण्यास राजी झाले.
पटकथा ऐकल्यानंतर गब्बरसिंग ह्या रोलच्या प्रेमात पडलेला अमिताभसुद्धा रमेश सिप्पीच्या ह्या बोलण्यामुळे आपला हट्ट सोडून जय हे आपलं पात्रं साकारण्यास राजी झाला. आता बारी होती धर्मेंद्रला समजावून सांगण्याची. सिप्पी त्याला बोलले “तुला ठाकूर बलदेवसिंग साकारायचा आहे ना तर तू तो खुशाल साकार, मी तुझा वीरू हरीभाईला देतो, पण एक ध्यानात ठेव कि उद्या जर आपला शोले हिट झाला आणि हरीभाईची आणि हेमाची जोडी जमली तर आम्हाला जबाबदार धरू नकोस”. बस ! सिप्पी ह्यांचं काम फत्ते झालं होतं. हि मात्रा बरोबर लागू पडली होती आणि धर्मेंद्र आपला हट्ट सोडून पुन्हा आपल्या वीरू ह्या मूळ भूमिकेकडे परतला.