अँटी ऑक्सिडंट (Antioxidant) हा शब्द तुम्ही अनेकवेळा ऐकला असेल. पण ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय? अँटी ऑक्सिडंट तत्व आपल्यासाठी इतके महत्वाचे का आहे ? असे कोणते अन्नपदार्थ, फळं व भाज्या आहेत ज्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट तत्व भरपूर प्रमाणात असते. ह्याची माहिती आज आपण थोडक्यात घेऊया
अँटी ऑक्सिडंट (Anti-oxidant) हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते. हृदयाशी संबंधित आजार व विकार, कॅन्सर ह्यासारख्या आजारांपासून बचाव करणे असो किंवा आपले तारुण्य अधिक काळ टिकवून ठेवणे असो, अँटी ऑक्सिडंट ह्यात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे जर तुम्ही आपले आरोग्य टिकवून ठेवू इच्छित असाल तर तुम्ही असे अन्नपदार्थ, फळे व भाज्यांचे योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट तत्व जास्त प्रमाणात असते.
अँटी ऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत असणारे पदार्थ, फळं व भाज्या ह्यांची माहिती खालीलप्रमाणे
राजमा
राजमा ज्याला आपण बीन्स म्हणूनही ओळखतो. तर असा हा राजमा अँटी ऑक्सिडंट (Antioxidant)चा उत्तम स्रोत म्हणून ओळखला जातो, जो तुम्हाला विविध आजार, हृदय विकार, तसेच कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारांपासून वाचवतो. आठवड्यातून किमान दोन वेळा तुम्ही बीन्सचे सेवन निश्चितच केले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला अँटी ऑक्सिडंटची कमतरता भासणार नाही.
ब्लूबेरी
Anthocyanins नावाचं एक अत्यंत उपयोगी रसायन ज्यात असतं असं फळ म्हणजे ब्लूबेरी. अँटी ऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत असणाऱ्या ब्लूबेरीमध्ये Anthocyanins नावाचं केमिकल असतं जे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास अत्यंत उपयोगी आहे, तसेच ह्यामुळे डायबिटीज, कॅन्सर ह्यापासून स्वतःचा बचाव करणे शक्य आहे. पुरेश्या प्रमाणात ब्लूबेरीचे सेवन करणे तुमच्या आरोग्यसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
पिंटो बीन्स
ह्यात फॅट्सचे प्रमाण अतिशय कमी असतेच, ह्याशिवाय शरीराला हानिकारक समजल्या जाणाऱ्या सॅच्युरेटेड फॅट्स व ट्रान्सफॅट्सचे प्रमाणही ह्यात कमी असते. अँटी-ऑक्सिडंटचा उत्तम स्रोत असणाऱ्या पिंटो बीन्सला प्रोटीन, फायबर, फॉलिक ऍसिड इत्यादी उपयोगी घटकांचा उत्तम स्रोत म्हणूनही ओळखले जाते.
ब्लॅकबेरी
ब्लॅकबेरी नावाचा फोन काही वर्षांपूर्वी अत्यंत लोकप्रिय झाला होता. साहजिकच ब्लॅकबेरी हा शब्द ऐकून तुम्हाला त्या फोनचीच आठवण येऊ शकते पण तुम्हाला हे माहित आहे का कि ह्या नावाचे एक फळ आहे ज्यात अँटी-ऑक्सिडंट (Antioxidant) भरपूर प्रमाणात सापडतं. ह्यात अँटी ऑक्सिडंट्स बरोबरच फायबर व व्हिटॅमिन सी सुद्धा असते जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवते व शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्व प्रदान करते.
लसूण
आपल्या किचनमध्ये असलेल्या लसूणला जर तुम्ही एखादा साधासुधा पदार्थ मानात असाल तर तुम्ही चुकताय. लसूण हा अँटी-ऑक्सिडंटचा एक उत्तम नैसर्गिक स्रोत तर आहेच पण ह्यात असे काही प्रभावी घटक आहेत जे शरीराला हानिकारक असणाऱ्या बॅक्टरीयाचा नाश करतात. त्याचबरोबर लसूण हा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानला जातो.
टोमॅटो
लहान मुलं व मोठे सुद्धा टोमॅटो केचअप आवडीने खातात. पण तुम्हाला कदाचित हे माहित नसेल कि टोमॅटोमध्ये लाइकोपिन (lycopene) नावाचा कॅन्सर विरोधी घटक असतो जो तुमच्या शरीराची कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारापासून रक्षा करतो.
ग्रीन टी
आजकाल अनेकजण आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नेहमीच्या चहा ऐवजी ग्रीन टी वापरू लागले आहेत. पण ह्या ग्रीन टी चे इतरही अनेक फायदे आहेत. ह्यात असलेले अँटी ऑक्सिडंट तत्व शरीरातील ऑक्सिडंट्समुळे होणाऱ्या पेशींचा नाश रोखण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावते. ज्यामुळे आपले अनेक आजारांपासून संरक्षण तर होतेच शिवाय तुमचे तारुण्य अधिक काळापर्यंत टिकून राहण्यास ह्यामुळे मदत होते.
मासे
जर तुम्ही मासे खाण्याचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी हि बातमी नक्कीच चांगली आहे असे म्हणावे लागेल. मासे खाण्यामुळे तुमच्या ह्रदयाचे आरोग्य उत्तम राहते. सालमन, ट्यूना ह्या प्रकारच्या माश्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट व ओमेगा थ्री भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे तुमचे विविध आजारांपासून संरक्षण होऊ शकते.
अँटी-ऑक्सिडंट्सचे फायदे व महत्व वाचून तुम्ही वरील पदार्थांचे पुरेश्या प्रमाणात सेवन केले तर तुमचे आरोग्य चांगले राहण्यात निश्चितच मदत होईल.
आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी info@uniksone.com वर ई-मेल करा.