Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

छत्रपती शंभूराजांनी लढलेल्या १० महत्वाच्या लढाया – भाग २

नमस्कार मंडळी, सध्या आपण नजर टाकत आहोत आपल्या शंभूराजांनी (shambhu raje) प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या आणि नेतृत्व केलेल्या काही निवडक लढाया. पहिल्या भागात आपण काही लढायांचा आढावा घेतलाच आहे. या दुसऱ्या भागात आपण अजून काही महत्वाच्या आणि साहसपूर्ण लढाया पाहणार आहोत. शंभूराजेंच्या उल्लेखनीय लढाया – भाग १

चिक्कदेवरायावर हल्ला

प्रथम आपण पाहुया चिक्कदेवराय याच्यासोबत झालेली लढाई. शंभूराजे कर्नाटक मोहिमेवर असतांनाची हि गोष्ट. शंभूराजांनी चिक्कदेवरायावर हल्ला करण्याचे योजिले परंतु, आपले सैन्यबळ कमी म्हणून शंभूराजांनी कुतुबशाही आणि बसप्पा नाईक यांच्याशी तह करून त्यांच्या फौजांचा आधार घेतला आणि या एकत्रित फौजा घेऊन शंभूराजांनी बाणावर येथे तळ ठोकला. चिक्कदेवरायावर हल्ला करण्याचा मनसुबा मनात होताच आणि त्याच दृष्टीने सगळी योजना होत होती आणि एकाएकी अचानक चिक्कदेवरायानेच शंभूराजांच्या फौजांवर आक्रमण केले.

shambhu raje, sambhaji maharaj history, sambhaji raje history in marathi, ganoji shirke, battles fought by sambhaji maharaj, sambhaji maharaj photo, sambhaji maharaj images, shambhu raje war, sambhaji maharaj battles, शंभूराजेंच्या लढाया, संभाजी महाराजांनी लादलेली युद्ध, संभाजी महाराज इतिहास, संभाजी महाराज माहिती, शंभूराजे फोटो
(Source – Quora)

सैन्याची एकच दाणादाण उडाली आणि बऱ्याच सैन्यांनी माघार घेतली, कुतुबशाही सैन्यदेखील पळते झाले आणि शंभुराजांना येऊन मिळणारे एकोजीराजांचे सैन्यदेखील अजून पोहोचले नव्हते. परिणामी मराठी सैन्य एकटे पडले आणि शंभूराजांनी माघार घेत त्रिचनापल्ली गाठली पण चिक्कदेवरायाचे सैन्य तेथेही आले. अशातच एकोजीराजांचे सैन्य शंभुराजांना मिळाले आणि मग या एकत्रीत फौजांनी चिक्कदेवरायाच्या फौजेचा धुव्वा उडविला आणि खुद्द चिक्कदेवरायलाच कैद केले. कैदेत असलेल्या चिक्कदेवरायाला पुढे मग खंडणीच्या बदल्यात सोडून देण्यात आले.

श्रीरंगपट्टणमची लढाई

दुसरी लढाई जी आपण पाहणार आहोत ती सुद्धा चिक्कदेवराया विरुद्धच आहे. चिक्कदेवरायाविरुद्ध झालेल्या पहिल्या लढाईत खंडणी घेऊन त्याला सोडून देण्यात आले होते परंतु, शंभुराजांना इथेच थांबायचे नव्हते. कर्नाटक मोहिमेवर असतांनाच शंभूराजांनी कर्नाटकातील स्थानिक नाईकांची साथ मिळविली आणि चिक्कदेवरायाविरुद्ध मदतीचे आश्वासन घेतले. अखेर शंभूराजांनी हल्ला करायचे ठरविले आणि श्रीरंगपट्टणम येथे हल्ला केला. हि श्रीरंगपट्टणमची मोहीम राजांच्या कर्नाटक मोहिमेतील दुसरी सर्वांत मोठी आणि महत्वाची लढाई गणली जाते.

हि श्रीरंगपट्टणम ची लढाई साधारण महिनाभर सुरु असेल आणि एवढ्यातच चिक्कदेवरायाला हि लढाई लढणे जड जाऊ लागले. लढाई म्हटली कि आगाऊ रसद, शस्त्रसाठा आणि अशा अनेक गोष्टी आल्याच आणि त्यासोबतच अमाप खर्च देखील आलाच. म्हणूनच हा खर्च भरून काढण्यासाठी चिक्कदेवरायाने चक्क त्याच्या जनतेवर लढाईचा अतिरिक्त कर बसविला. चिक्कदेवरायाच्या या करवाढीचा त्याच्याच जनतेकडून जोरदार विरोध झाला आणि जनतेनेच चिक्कदेवरायांविरुद्ध उठाव करत मराठी फौजांशी संधान बांधले आणि चिक्कदेवरायालाच घेरले. चिक्कदेवरायाने मदतीसाठी त्याच्या मदुरेच्या किल्ल्यातील सैन्याला बोलाविले. या सर्व युद्धप्रसंगातच शंभुराजांना खबर लागली कि औरंगझेबाने विजापूरची मोहीम आटोपली आणी पुढे तो पन्हाळा गडाला वेढा देण्याच्या बेतात आहे. याच खबरीमुळे शंभुराजांना हि चिक्कदेवरायाची मोहीम सोडून नाईलाजाने स्वराज्यात माघारी यावे लागले.

जुवे बेटावरील स्वारी

आता आपण पाहूया जुवे बेटावरील स्वारी. गोव्यानजीक असलेल्या या बेटावरील किल्ल्यावर हल्ला करण्याचे राजांनी ठरविले. या मनसुब्यानुसार दिनांक २४ नोव्हेंबर १६८३ रोजी शंभूराजांच्या नेतृत्वाखाली मराठी फौजांनी जुवे बेटावरील किल्ल्याला वेढा दिला. वेढा दिल्यानंतर देखील प्रतिउत्तर म्हणून किल्ल्यावरून काहीही हालचाल झालीच नाही शेवटी आपल्या मराठी सैनिकांची एक छोटी तुकडी रात्रीच्या सुमारास किल्ल्यात शिरली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे किल्ल्यातील सैनिकांना साधी खबरही नव्हती कि ते मराठ्यांच्या वेढ्यात अडकले आहेत. मग मात्र हा किल्ला घेणे सहज शक्य झाले आणि मग लगेचच पुढल्या दिवशी गोव्याचा व्हॉइसरॉय त्याचे जवळपास ४०० सैन्य घेऊन मराठ्यांवर चालून आला.

कितीही संकटे आली तरी आपल्या मराठी फौजा काही माघार घेणार नाही हे तर वेगळे सांगायला नकोच, अखेर आपले मराठी सैन्य गनिमी काव्याने लढले आणि पोर्तुगीझ सैन्याची पूर्ण दाणादाण उडविली. मराठ्यांचा वार इतका जबरदस्त होता कि शत्रूसैन्य जीव मुठीत घेऊन पळू लागले, इतकेच कशाला अहो खुद्द व्हॉइसरॉय सैन्यासोबत पळ काढत होता.

व्हॉइसरॉय पळतोय हे पाहून शंभूराजे अजूनच खवळले आणि आपल्या घोड्यावर स्वार होऊन खुद्द शंभूराजे त्याचा पाठलाग करू लागले. व्हॉइसरॉयने त्याचा घोडा पाण्याच्या दिशेने नेला आणि नेमकी त्याच दिवशी पाण्याला भरती आली होती परंतु, त्याची परवा न करता आपले शंभूराजे त्यांचा घोडा घेऊन स्वतः पाण्यात उतरले आणि कसलीही तमा न बाळगता पुढे जात राहिले. मागून आपल्या फौजादेखील पाण्यात उतरत होत्या.

शंभूराजांचा घोडा आता खोल पाण्यात पोहोचला आणि त्याचा तोल जाऊ लागला परंतु, लगेचच खंडो बल्लाळांनी पाण्यात उडी घेऊन शंभुराजांना सावरले. शत्रूसैन्य त्या भरतीचा फायदा घेऊन पसार झाले. इतिहासात या घटनेचा उल्लेख करताना म्हटले जाते कि, ‘त्या दिवशी गोवा तर घेतलेच असते पण, फिरंग्यांचे दैव समुद्राने राखले.’ पुढे मुअज्जम दक्षिण कोकणात येत असल्याने फार वेळ न दवडता शंभूराजांनी जुवे बेट दोन दिवसात सोडले आणि कोंकणात रवाना झाले.

फोंडा किल्ल्यावर झालेला हल्ला

चौथी गोष्ट आहे १६८३ दरम्यानच्या फोंडा किल्ल्यावर झालेल्या हल्ल्याची. मराठ्यांनी उत्तरफिरंगाणात चांगलाच वचक बसविला होता; रेवदंडा, चौल आणि अशी बरीच ठाणी मराठ्यांनी काबीज केली होती. या प्रकारामुळे पोर्तुगीझांनी ०१ नोव्हेंबर १६८३ रोजी एकाएकी मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यावर हल्ला केला. त्या वेळी फोंडा किल्ल्याचे किल्लेदार येसाजी कंक होते आणि त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हे देखील हल्ल्यास प्रतिउत्तर देत होते. सतत ८-९ दिवस फोंडा किल्ल्यावर जोरदार तोफांचा मारा चालू होता तरीही गड खंबीर होता परंतु, हळूहळू तोफांच्या हल्ल्याने फोंडा किल्ला ढासळू लागला आणि गडाच्या तटाला खिंडार पडले तसे फिरंगी सैन्य किल्ल्यात शिरू पहात होते.

shambhu raje, sambhaji maharaj history, sambhaji raje history in marathi, ganoji shirke, battles fought by sambhaji maharaj, sambhaji maharaj photo, sambhaji maharaj images, shambhu raje war, sambhaji maharaj battles, शंभूराजेंच्या लढाया, संभाजी महाराजांनी लादलेली युद्ध, संभाजी महाराज इतिहास, संभाजी महाराज माहिती, शंभूराजे फोटो
(Source – Youtube)

परंतु आपल्या मराठी सेनेने शेवटची ढाल म्हणून काही लाकडी फाळ घेऊन त्यांचा तट उभारला आणि काही काळापुरता शत्रूला रोखले पण अखेर शत्रू गडात शिरले आणि बरोबर अशाच वेळी शंभूराजे स्वतः ८५० घोडदळ आणि १५०० सैन्य घेऊन मदतीला दाखल झाले आणि शंभूराजांचे हे सारे सैन्य अगदी ताज्या दमाचे होते आणि इकडे फिरंगी सैन्य लढून दामले होते यामुळेच, फिरंग्यांना हि लढाई चांगलीच महागात पडली आणि शेवटी फिरंगी सैन्याने हार पत्करून माघार घेतली आणि पळून गेले. या लढाईत आपण विजयी झाला पण किल्लेदाराचा मुलगा कृष्णाजी कंक जखमी होऊन मरण पावले.

गोव्याची लढाई

आपली शेवटची स्वारी आहे गोव्याची. शंभूराजांनी अनेकदा गोव्यावर स्वारी केली पण त्यांना बरेच वेळा अर्ध्यातूनच माघारी यावे लागत होते हे आपण पहिलेच आहे. या आधी जुवे बेटावर सुद्धा शत्रूला पूर्ण धडा शिकविता आला नव्हता आणि फोंडा किल्ल्यावर केलेल्या हल्ल्याची परतफेडही राहिली होती. याचसाठी शंभूराजांनी पुन्हा गोवा मोहिम हाती घेतली आणि ६००० स्वार आणी १०,००० सैन्य घेऊन शंभूराजे आगेकूच करते झाले. वाऱ्याच्या वेगाने जात शंभूराजांनी डिसेंबर १६८३ दरम्यान बारदेश आणि साष्टी येथे हल्ला केला, सोबतच मडगाव, रचोळ वगैरे ताब्यात घेतले आणि पुढे रायतूरच्या किल्ल्याला वेढा घातला.

एवढ्यावरच न थांबता मराठ्यांनी शापोरा, थिये वगैरे ठिकाणे आपल्या अधिपत्याखाली आणली. एक, दोन नव्हे तर तब्बल २६ दिवस शंभूराजांच्या नेतृत्वाखाली मराठी फौजांनी हलकल्लोळ माजविला होता, संपूर्ण गोवा मराठ्यांच्या प्रभावाखाली होता आणि या काळात मराठ्यांना विरोध करत आलेल्या प्रत्येक शत्रूची मराठ्यांनी अशी काही दाणदाण उडविली कि सारेच फिरंगी सैन्य जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळत सुटले. मराठ्यांवर फिरंग्यांनी केलेल्या आधीच्या प्रत्येक हल्ल्याची परतफेड मराठी सैन्यांनी व्याजासकट केली असे म्हणायला हरकत नाही. हा सगळा धुमाकूळ घालून मुअज्जमचा बंदोबस्त करण्यासाठीं शंभूराजे स्वराज्यात रायगडावर पोहोचले.

तर, या दोन भागांत आपण ज्या लढायांचा आढावा घेतला त्या लढाया तर शंभूराजांच्या जीवनातील एक छोटासा भाग आहे. शंभूराजांनी आपली सारी कारकीर्दच अशी धावत, पळत, लढत आणि स्वराज्य रक्षण व विस्तारात घालविली. मराठ्यांच्या प्रत्येक शत्रूला शंभूराजांनी वेळोवेळी पूर्ण ताकदीनिशी धडा शिकविला आहे. शिवरायांनी स्वराज्य घडविले आणि शंभूराजांनी स्वराज्य पुढे त्याच जिद्दीने, मेहेनतीने आणि निष्ठेने जपले, वाढविले आणि बळकट केले. शंभूराजांच्या या शौर्याबद्दल बोलावे, लिहावे तेवढे कमीच पण या सर्व लढायांवर नजर फिरविली कि एक मात्र नक्की समजते कि शंभूराजांसारखे आदर्श व्यक्तिमत्त्व या जगात पुन्हा होणे नाही.


हे हि वाचा –

1 Comment
  1. Nishant khade says

    खूप छान ऐतिहासिक माहिती सांगितली आहे छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द खूपच वाखाण्याजोगी आहे

Leave A Reply

Your email address will not be published.