पॉलिटिकल थ्रिलर असलेले हे ६ चित्रपट तुमचा कंटाळा अगदी क्षणार्धात घालवतील !

सध्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वांवरच घरी बसायची वेळ आल्याने, दिवसभर घरी बसून वेळ काढायचा तरी कसा हा यक्ष प्रश्न आपल्या सर्वांसमोरच ‘आ’ वासून उभा आहे. टिव्ही पाहावा म्हंटलं तर अनेक मालिकांचे लॉकडाऊनमुळे शूटिंगच होत नसल्याने चॅनलवाल्यांनी देखील मालिकांचे जुने भाग पुन्हा पुन्हा दाखवायला सुरवात केली आहे. त्यातच कुटुंबातील सर्व मंडळी घरीच असल्याने टिव्हीवर लावायचं काय यावरून वेगळच वाक्ययुद्ध रंगतं.
चित्रपट पाहावा म्हंटलं तर कित्येकदा पाहिलेले आणि अक्षरशः तोंडपाठ झालेले चित्रपट दाखवण्याचं काम चॅनलवाले करत आहेत. त्यामुळे पाहावं तरी काय हा देखील तेवढाच मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा ठाकला आहे.
पण आता काळजी नको. तुमचा कंटाळा घालवण्यासाठी आणि रोमांचक मनोरंजनाचा आनंद देण्यासाठी, आम्ही आपल्याला सांगणार आहोत त्या ६ ‘पॉलिटिकल थ्रिलर’ चित्रपटांची (Political Thriller Films) नावं जे पाहून आपला विलग्नवास (क्वारंटाइन) अगदी आरामात पार पडेल. मग चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते ६ चित्रपट.
१) न्यू देल्ही टाइम्स (New Delhi Times)
आपल्या या ६ चित्रपटांच्या यादीमध्ये प्रथम स्थानी आहे ‘न्यू देल्ही टाइम्स’. १९८६ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता. चित्रपटात विकास पांडे नावाचा न्यू देल्ही टाइम्सचा एक प्रामाणिक पत्रकार दाखवला गेला आहे. एकदिवस त्याला राजकीय हेतून प्रेरित एका हत्येची माहिती मिळते. मुख्यमंत्री पदासाठी मोठी रस्सीखेच सुरु असते, त्यातच विषारी दारूमुळे अनेक लोक दगावतात. विकास त्याचा तपास करत, अनेक मोठ्या लोकांचा यामध्ये हात असल्याचे त्याच्या लक्षात येते.
हा चित्रपट एवढा वादग्रस्त होता की डिस्ट्रिब्युटर्स आणि टिव्हीवाल्यांनी हा चित्रपट दाखवण्यास नकार दिला होता. शशी कपूरचा अभिनय आणि रमेश शर्मांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. हा चित्रपट तुम्ही युट्युबवर पाहू शकता.
२) झी (Z)
यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे १९६९ साली प्रदर्शित झालेला ‘झी’ चित्रपट. या चित्रपटाची सुरवात होते उजवी विचारसरणी असलेल्या सरकारच्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या भाषणाने. जो डाव्या घटकांशी लढण्यासाठी सरकारच्या असलेल्या कार्यक्रमाबद्दल सांगत असतो. एक रॅली सुरु असते ज्यात अण्वस्त्रांच्या विरोधात भाषणं सुरु असतात, पोलीस गुंड पाठवून रॅलीमध्ये तोडफोड करवतात आणि भाषण देणाऱ्या कार्यकर्त्याची हत्या घडवून आणली जाते.
लोकांना सांगितले जाते की त्याचा कार्यकर्त्याचा मृत्यू अपघाताने झाला. मात्र एक डॉक्टर असतो जो खोटं बोलायला नकार देतो, एक फोटो जर्नालिस्ट असतो जो पुरावा म्हणून फोटो सादर करतो. त्या कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणात २ उजव्या विचारांच्या कट्टरतावाद्यांसोबतच ४ मिलिटरी अधिकारी सुद्धा चौकशीच्या घेऱ्यात येतात. शेवटी प्रकरणात न्यायाधीशसमोर येतं, तेव्हा हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल की न्यायाधिक इमानदार राहील की विकला जाईल.
फ्रेंच भाषेतील या चित्रपटाने त्यावेळी कान फिल्म फेस्टिवलमध्ये २ पुरस्कार जिंकले होते. कोस्टा गाबरास यांनी दिगदर्शित केलेला हा चित्रपट ‘वसीलीस वसीलीकोस’ नावाच्या कादंबरीवरी आधारित आहे. २०१२ साली दिवाकर बॅनर्जींनी बनवलेला शांघाई चित्रपटीही यावरच आधारित होता. हा चित्रपटदेखील तुम्हाला युट्युबवर मिळून जाईल.
३) सीरियाना Syriana (२००५)
एका अमेरिकन कंपनीची गल्फ किंग्डम मधील ऑइल फिल्डवरची पकड सुटत चाललेली असते. या कंपनीवरती भ्रष्टाचाराचे प्रकरण देखील सुरु असते. अशा परिस्थतीत ही कंपनी कझाकिस्तानमधील एका छोट्या कंपनीसोबत मर्जर करते, जिच्याकडे त्या भागातील ऑइल फ्लिड्सचे राईट्स असतात. चित्रपटात अरबचा प्रिन्स असलेला नासीर चीनमधील एका कंपनीला नॅचरल गॅस काढण्याचे कॉन्ट्रॅक्ट देतो. यामुळे अमेरिकी सरकारची चिंता अधिकच वाढते.
त्यातच अमेरिकी सीआयए एजंट हत्यारांच्या तस्करीचा तपास करत असतो आणि तेव्हाच या कथेचे सारे कंगोरे उघडतात. स्टीफन गेगन या चित्रपटाचे दिग्दर्शक असून हा चित्रपट तुम्हाला हंगामा डॉटकॉमवर पाहता येईल.
४) आयुदा इडत्तु (२००४)
आपल्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेला आयुदा इडत्तु हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला. तीन तरुणांची कथा असलेल्या या चित्रपटात पहिला तरुण आहे मायकल, जो मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी नेता असतो आणि त्याचा प्रभावही बऱ्यापैकी असतो. त्याला कोणाचीही भीती नसते, नेत्यांच्या खराब राजकारणाची त्याला चीड असते आणि विदयार्थी अधिकारांबद्दल तो नेहमी जागृत असतो.
दुसऱ्या तरुणाचे नाव आहे अर्जुन जो एका आयएएस अधिकाऱ्याचा मुलगा असतो. त्याचे आयुष्यात काहीच ध्येय नसते. त्याला फक्त अमेरिकेला जायचे असते आणि अमेरिकेला जायच्या आधी तो एका मुलीच्या प्रेमात पडतो पण मुलगी काही त्याच प्रेम कन्फर्म करत नसते. असच एकदा लिफ्ट घेण्याचा कारणाने त्याची मायकलसोबत ओळख होते, ओळखीचं रूपांतर मैत्रीत होतं आणि अर्जुन त्याच्या भविष्याबाबत गंभीर होतो.
तिसऱ्या तरुणाचं नाव आहे इवा, जो एक स्थानिक गुंड असतो. ज्यावेळी मायकल त्याच्या सहकाऱ्यांसोबत निवडणूक लढवत असतो त्यावेळी एक नेता त्यांना घाबरवण्यासाठी इवाला पाठवतो. निवडणूक जिंकण्यासाठी सर्व हातखंडे वापरले जातात आणि यामध्ये विजय कोणाचा होतो हे शेवटी कळते. चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले. नंतर त्यांनी हा चित्रपट नवीन कलाकारांसोबत युवा नावाने देखील बनवला. या दोघांमध्ये फरक फक्त एवढाच आहे की आयुदा इडत्तु मध्ये चेन्नईमधील कथा दाखवली आहे तर युवामध्ये कोलकात्याची. हा चित्रपट तुम्हाला युट्युबवर सहज उपलब्ध होईल.
५) एनिमी ऑफ दी स्टेट Enemy of the state (१९९८)
आपल्या यादीतील पाचवा चित्रपट आहे एनिमी ऑफ दी स्टेट. अमेरिकन सरकार दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी एक नवीन बील आणणार असते. या बिलाने नॅशनल सिक्युरिटी एजन्सीला नागरिक आणि समूहांवर नजर ठेवण्याचे बेसुमार अधिकार मिळणार असतात. या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीचा प्रमुख असतो रेनॉल्ड्स ज्याची इच्छा असते की हे बील पास व्हावे जेणेकरून त्याचा फायदा व्हावा. पण एक अमेरिकन सांसद त्याचा विरोध करतो आणि एक दिवस अचानक त्याचा मृत्यू होतो. त्याच्या मृत्यूचा पुरावा एका वाईल्डलाईफ रिसर्चरच्या कॅमेरामध्ये कैद होतो. त्यामुळे हत्यारे त्या रिसर्चरच्या मागे लागतात, तो पळत राहतो आणि त्याची टक्कर रॉबर्ट डीन म्हणजेच्या चित्रपटाच्या नायकाशी होते.
तो रिसर्चर त्याच्या कॅमेरामधील पुरावा असलेली टेप त्याच्या बॅगेत लपवतो आणि सारी संकट रॉबर्ट डीन वरती जातात. ती टेप मिळवण्यासाठी त्याच्यावर खुनाचा खोटा गुन्हा दाखल केला जातो आणि मग स्वतःला निर्दोष सिद्ध कारण्यासाठी काय काय करतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत टोनी स्कॉट आणि हा चित्रपटसुद्धा युट्युबवर उपलब्ध आहे.
६) आईड्स ऑफ मार्च Ides of March (२०११)
अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली पद म्हणजे राष्ट्राध्यक्षाचे पद. जर तुम्हाला अमेरिकेचे राष्ट्रपती व्हायचे असेल तर तुम्हाला डेमोक्रेटिक किंवा रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी लागते. आणि ही उमेदवारी मिळवण्यासाठी सेनेटर्स आणि काँग्रेसमॅनमध्ये कशी चुरस होते, पॉलिटिकल मॅनेजर यामध्ये काय भूमिका निभावतात, पडद्यामागे कशा गोष्टी घडतात हे तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल. रायन गॉसलिंगने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून जॉर्ज क्लोनी हे या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत.
जोपर्यंत लॉकडाऊन संपून परिस्थिती पूर्वरत होत नाही तोपर्यंत आम्ही सुचवलेले हे चित्रपट आपले पुरेपर मनोरंजन करतील याब्ब्दल आम्हाला जराही शंका नाही.
Source – The Lallantop