कोरोना व्हायरसने सध्या संपूर्ण जगभर थैमान घातलेलं आहे. या विषाणूच्या भीतीमुळे जवळपास अर्धं जग आज लॉक डाऊनच्या परिस्थितीशी सामना करत आहे. एकूणच या विषाणूमुळे खूपच भयावह परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. मानवी इतिहासात अशा प्रकारे एखाद्या व्हायरसमुळे संपूर्ण विश्व थांबण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. चीनमधून बाहेर आलेल्या या व्हायरसमुळे संपूर्ण विश्वामध्ये मानवी जातीचं अतोनात नुकसान होत आहे.
माणसाच्या आयुष्यातील अनेक घटकांवर या व्हायरस मुळे मर्यादा घातली गेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक कारखाने, इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणावरती बंद आहेत. त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीत अनेक जण असा प्रश्न उपस्थित करत आहेत की कोरोनानंतर त्यांच्या नोकऱ्यांना काही धोका आहे का ? तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेलो आहोत….
गेल्या अनेक दिवसांपासून लाॅकडाऊन असल्यामुळे अनेक प्रकारे नुकसान होत असल्याचे प्रत्येकालाच जाणवत असेल. कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानीच नव्हे तर आर्थिक हानी देखील होत आहे. सध्याच्या परिस्थितीत जरी आपल्याला हे व्हायरस संकट वैद्यकीय क्षेत्राशी निगडित वाटत असलं, तरी नजीकच्या भविष्यकाळात कदाचित या विषाणूमुळे फार मोठ्या आर्थिक संकटाला आपल्याला सामोरे जावे लागू शकते, याचं कारण म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून जगाची खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या त्यांच्या घरी बसून आहे. मोठ्या प्रमाणावरती इंडस्ट्रीज बंद आहेत.

मंडळी विचार करा जर मुंबई शहर एक दिवस बंद ठेवलं तर जवळपास 700 कोटींच दिवसाला नुकसान होतं, तर आजच्या या परिस्थितीत संपूर्ण जग एक प्रकारे बंद आहे मग अशा परिस्थितीत किती मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असेल याचा विचारंच केलेला बरा. आपण सर्वांनी उत्पादन आणि सेवा या गोष्टी बंद केल्यामुळे अनेक मोठे व्यवसाय ठप्प आहेत त्यामुळे रोज हजारो-लाखो डॉलरचे नुकसान सहज होत आहे. अशा परिस्थितीत काही अर्थतज्ञ नोकर कपातीची शक्यता वर्तवत आहेत. त्याचा आपल्या जीवनावरती किती परिणाम होऊ शकतो आणि या नोकर कपाती पासून स्वतःला कसं वाचवायचं याबद्दल आपण या लेखांमध्ये विस्तृतपणे जाणून घेणार आहोत.
लाॅक डाऊन झाल्यानंतर काही दिवसांमध्येच आपल्याला आर्थिक नुकसान आणि त्यामुळे होणाऱ्या अनेक तोट्यांबद्दल अनुभव येऊ लागले. उदाहरणार्थ, अनेक प्रतिष्ठित कंपन्यांनी त्यांच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली आणि काही काळाने असेच अनेक आर्थिक फटके अनेक कर्मचाऱ्यांना सहन करावे लागले. अनेक क्षेत्रातील कामगारांना टप्प्याटप्प्याने असे अनुभव येत गेले. जागतिक कामगार संघटनेच्या एका सर्वेक्षणानुसार जगभरामध्ये जवळपास अडीच कोटी नोकऱ्यांमध्ये कपात वर्तवण्यात आलेली आहे.
हा तोटा जास्तंकरून विकसनशील देशांना होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. ज्यांच्या नोकरी असतील त्यांच्या पगार कपातीची देखील शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे. याचाच अर्थ असा कि अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक घटकावरती या संकटाचा नक्कीच परिणाम होऊ शकतो. या आर्थिक संकटाचा सर्वात मोठा फटका मजूर कामगार आणि महिलांना होईल असा अंदाज जागतिक कामगार संघटनेकडून वर्तवण्यात आलेला आहे. म्हणूनच आपण आजपासूनच आपल्या अनावश्यक खर्चांवरती निर्बंध घालायला हवेत आणि येत्या आर्थिक संकटासाठी पैशांची जपणूक करायला हवे हे मात्र तेवढेच खरे.
आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि विकास दरावर देखील या संकटाचा मोठ्या प्रमाणावरती परिणाम वर्तविण्यात येत आहे. 2020 च्या सुरुवातीला भारताचा विकास दर जवळपास 5.3 एवढा होता असे लक्षात येते, परंतु येत्या काही दिवसांमध्ये भारताचा विकास दर 3 एवढा खाली येईल असे अनेक अर्थ तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. याचाच अर्थ, येत्या भविष्यात भारताला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो. त्यातच लॉकडाऊन किती वाढेल याची कोणालाही शाश्वती देता येत नाही. लॉकडाऊनचा काळ जेवढा वाढवण्यात येईल तेवढं आपलं आणि पर्यायाने देशाचं आर्थिक नुकसान होणार हे मात्र नक्की.

आरबीआय गव्हर्नर शशिकांत दास यांनी मध्यंतरी रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट यामध्ये कपात करत सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा देण्याचे काम केलेलं आहे. येत्या काळात आर्थिक संकट येऊ नये म्हणून भारत अनेक प्रकारच्या उपाययोजनांचा विचार करत असल्याचं देखील त्यांनी या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं होतं. आरबीआयने केलेल्या या उपायांमुळे उद्योजक आणि सामान्य जनतेसाठी कर्ज घेणे सोपे होईल आणि यामुळे अर्थव्यवस्थेला एक नवी उभारी मिळेल हे मात्र नक्की. अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक मोठं पाऊल ठरेल कारण यामुळे खर्चाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळणार आहे. त्यासोबतच जवळपास 3.7 लाख कोटी रुपये देखील भारताच्या बाजारामध्ये उपलब्ध होतील.
कोवीड विरोधात लढा देणे हे एक युद्ध आहे असे जागतिक स्तरावरील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे कि महायुद्धानंतर मंदी येत असते. 1930 मध्ये म्हणजेच पहिल्या जागतिक महायुद्धानंतर महामंदी आल्याचे आपल्याला माहिती आहे आणि या व्हायरस नंतर मंदी टाळण्यासाठी जागतिक कामगार संघटनेने काही उपाय सांगितलेले आहेत.
१. आपल्या कामगारांना संपूर्ण प्रकारे आर्थिक संरक्षण देणे
२. अर्थव्यवस्थेला उत्तेजना देण्यासाठी नवीन उद्योगांना प्रेरणा देणे.
संपूर्ण विश्वाला या उपाययोजनांची मदत घेऊन आर्थिक स्थिती परत बसवण्याची गरज वर्तवण्यात आलेली आहे.
तर मंडळी या आहेत काही उपाय योजना ज्या जागतिक स्तरावर करण्यात आल्या तर काही वर्षांमध्ये आपण झालेलं आर्थिक नुकसान भरून काढू शकू आणि आपल्या नोकऱ्या देखील वाचवू शकतो.