Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

जलयुक्त शिवारमुळे पिकांना मिळाली संजीवनी

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जायचा, पाण्याअभावी आलेले पीकही करपून जायचे आणि आपला बळीराजा हवालदिल व्हायचा. शासनाने बळीराजाची हि अडचण कायमची सोडवण्यासाठी जलयुक्त शिवार हि योजना राबवण्याचे निश्चित केले. शासनाच्या ह्या योजनेचा अत्यंत सकारात्मक परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागला आहे. आता निसर्गाचा लहरीपणा सुद्धा शेतकऱ्यांच्या हक्काचं पीक हिरावून घेऊ शकत नाही.

जलयुक्त शिवार योजनेचे यश आणि ह्या योजनेचा शेतकऱ्यांना झालेला फायदा ह्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे साखरा येथील केशव देवराव चौधरी. हातातोंडाशी आलेले पीक पावसाअभावी जाते कि काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना जलयुक्त शिवारने केशव देवराव चौधरी ह्यांना दिलेला मदतीचा हात त्यांच्या शेतातील कापूस व तूर ह्या पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला. वर्षानुवर्षे लहरी पावसाशी दोन हात करत शेती करणाऱ्या ह्या बळीराजाच्या चेहऱ्यावरील भाव हे स्पष्टपणे सांगत होते कि शासनाची जलयुक्त शिवार हि योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात अतिशय सकारात्मक बदल घडवत आहे.

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या साखरा शिवारातील केशव देवराव चौधरी ह्यांची हि सत्यकथा तुम्हा-आम्हाला जलयुक्त शिवार योजनेचे यश सांगून जाते. साखरा येथील केशव देवराव चौधरी यांच्याकडे साडेपाच एकर शेती आहे. यावर्षी त्यांनी कापूस आणि तूर लावली. सुरवातीला चांगला पाऊस झाला. शेतात पीकेसुध्दा डोलू लागली. मात्र उत्पादन येण्याच्या वेळी परतीच्या पावसाची आवश्यकता होती. मात्र निसर्गाचा लहरीपणा पुन्हा एकदा आडवा आला.
सुरुवातीला चांगला बरसलेला पाऊस उत्पादन घेण्याच्या ऐनवेळी मात्र दडी मारून बसला. केशव देवराव चौधरी व शिवारातील बाकीचे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले. परतीचा पाऊस झाला नाही तर शेतात उभी असणारी पिकं मरून जाणार होती. खूप दिवस पावसाची वाट बघितली पण पाऊस काही आलाच नाही. आता काय करायचं हा प्रश्न साखरा शिवारातील तमाम शेतकऱ्यांना पडला होता.

rain,cm devendra fadanvis, desert, water crisis, farmer, जलयुक्त शिवार,संजीवनी,महाराष्ट्र दुष्काळमुक्त
(source-farming)

पाऊस नाही आला तर हाती आलेला तूर व कापूस जाणार होता. केशव देवराव चौधरी ह्यांना काय करावे तेच सुचेना. विचार करता करता एक कल्पना सुचली. साखरा शिवारात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत नाला खोलीकरणाचे काम झाले होते. नाल्यातील साचलेला गाळ काढल्यामुळे त्यात चांगला पाणीसाठा तयार झालेला. हे पाणी आपल्या पिकाला जीवनदान देईल असे केशव देवराव चौधरी ह्यांना वाटले व तात्काळ त्यांनी इंजिन लावून हे पाणी आपल्या शेतातील कपाशीला व तुरीला दिले. बरेच दिवस पाणी न मिळाल्यामुळे पिकं मान टाकणारच होती पण नाल्यातील पाण्याने त्यांना जीवनदान दिले. ह्या पाण्यामुळे केशव देवराव चौधरी ह्यांना ५० क्विंटल कापूस आणि ७ क्विंटल तुरीचे उत्पादन घेणे शक्य झाले.

जेव्हा केशव चौधरी ह्यांच्या गावी जाऊन त्यांची भेट घेतली तेव्हा ते अतिशय आनंदात दिसले. ते म्हणाले “यावर्षी गुलाबी किंवा शेंद्री बोंडअळी आली नाही पण आमची सर्व शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून होती. दीड महिन्यापासून बेपत्ता झालेल्या पावसामुळे पीक जाण्याची भीती होती. मागल्या वर्षी बोंडअळी जास्त होती त्यामुळे फार नुकसान झालं होतं. म्हणून यावर्षी शेतात राशी 659 ही प्रजाती लावली, परिणामी बोंडअळी तर आली नाही पण पिकांना पाणी मिळालं नसतं तर गतवर्षी प्रमाणे याही वर्षी पीक हातचं गेलं असतं. पण शासनाच्या जलयुक्त शिवारचा उपयोग शेतीला झाला अन पिकं वाचली.”

वर्षानुवर्षे पाणी टंचाईचा मारा झेलणारा व दुष्काळाचे चटके सहन करणारा महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा ह्या निर्धारानेच जलयुक्त शिवार हि योजना जन्मास आली आणि ४ वर्षांत ह्या योजनेची झालेली व्याप्ती पाहता महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे शासनाचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरेल असे वाटू लागले आहे. यवतमाळ जिल्ह्यापुरतं बोलायचं झाल्यास जलयुक्त शिवारमुळे जिल्ह्यातील तब्बल ९८ हजार हेक्टर जमिनीवर सिंचनाची सोय झाली. गत चार वर्षांत मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात सन 2015-16, 2016-17 आणि 2017-18 मध्ये जलयुक्त शिवारची एकूण 40 हजार 516 कामे पूर्ण करण्यात आली. ज्यामुळे 98 हजार 58 हेक्टरवर सिंचनाची सुविधा निर्माण झाली.

rain,cm devendra fadanvis, desert, water crisis, farmer, जलयुक्त शिवार,संजीवनी,महाराष्ट्र दुष्काळमुक्त
(source-toi)

लहरी मान्सूनवर अवलंबून राहणे हे अत्यंत धोक्याचे असल्याचे शासनाने हेरले व मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले. पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, सिंचन क्षेत्रात वाढ करणे, विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या परंतु निकामी झालेल्या जलस्त्रोतांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पाणी अडविणे आणि जिरविणे याबाबत नागरिकांना प्रोत्साहित करून लोकसहभाग वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

सन 2015-16 मध्ये 413 गावांमध्ये 23 हजार 377 कामे, सन 2016-17 मध्ये 225 गावांमध्ये 3 हजार 541 कामे तर 2017-18 मध्ये 16 हजार 54 अशी तीन वर्षात एकूण 42 हजार 972 कामे हाती घेण्यात आली. यापैकी 40 हजार 516 कामे पूर्ण झाली असून एकूण 1 लक्ष 14 हजार 17 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाल्याने जिल्ह्यात 98 हजार 58 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागावर भर देण्यात आला व लोक सहभागातून 10 लक्ष 77 हजार घनमिटर गाळ काढण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेची हि प्रगती बघितली तर हि खात्री वाटू लागते कि दुष्काळयुक्त महाराष्ट्र हे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More