१००० रुपये दिले नाही म्हणून त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले
ही गोष्ट आहे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ, पाकिस्तान जनरल याह्या खान आणि एक लाल मोटारसायकलची. डेअर डेव्हील सॅम माणेकशॉ यांचे काही अतरंगी किस्से…
काही वर्षांपूर्वी पुलवामा येथे झालेल्या कृत्याला उत्तर म्हणून भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करून जवळ जवळ तीनशे जणांना संपवलं आणि पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं. तसेच गलवान खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या चीनी सैनिकांना सुद्धा भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर दिलं. या पार्श्वभूमीवर अशाच एका घटनेची आठवण ताजी करायला हवी जेव्हा भारतीय सैन्याने पाकिस्तानला दणका दिला होता आणि पाकिस्तानचं विभाजन होऊन बांगलादेशची निर्मिती झाली. ते होत १९७१ चं युद्ध (1971 Bangladesh War) आणि हे युद्ध जिंकण्याचं श्रेय जातं एका धुरंधराला ,ज्याचं नाव आहे सॅम माणेकशॉ.
त्यांचं संपूर्ण नाव, सॅम होर्मुसजी फ्रेमजी जमशेदजी माणेकशॉ (Sam Hormusji Framji Jamshedji Manekshaw). त्यांचा जन्म ३ एप्रिल १९१४ साली झाला. आधी खरंतर त्यांचं नाव सायरस ठेवलं होत, पण त्यांच्या आत्याने हे नाव अपशकुनी आहे म्हणून बदलवून सॅम ठेवलं. त्यांच शिक्षण नैनिताल येथे सेंटवूड कॉलेजमध्ये झालं. सॅम यांना खरतर लंडनला जाऊन डॉक्टर व्हायच होत पण एवढ्या लहान वयात त्यांना तिथे एकटं पाठवायला त्यांच्या वडिलांनी नकार दिला.
तेव्हा बंडखोर स्वभावाचे माणेकशॉ सैन्यात भरती झाले. दुसऱ्या महायुद्धात जपान विरुद्ध लढताना त्यांना नऊ बुलेट लागल्या पण त्याही परिस्थितीत त्यांच्या तुकडीने पॅगोडा हिल सर केले. त्यांचा पराक्रम पाहून मेजर जनरल डी.टी. कोवनने तिथल्या तिथे स्वतःचा मिलिटरी क्रॉस त्यांच्या छातीवर लावला. त्यांची अवस्था बघून हॉस्पिटलमध्ये भरती करून घ्यायला सुरुवातीला डॉक्टरनी नकार दिला.

जेव्हा उपचार करण्यासाठी डॉक्टरवर दबाव आणण्यात आला, तेव्हा डॉक्टरनी Sam Manekshaw यांना विचारलं की युद्धाच्या वेळेस तिथे काय झालं होत ? खरंतर त्या डॉक्टरांना परिस्थिती समजून घायची होती पण त्याही अवस्थेत माणेकशॉ यांनी उत्तर दिल, “काही नाही, एका गाढवाने लाथ मारली.” त्यांचं उत्तर ऐकून डॉक्टरांना त्यांच्या जिगरी स्वभावाचे कौतुक वाटलं.
फील्डमार्शल हा खिताब मिळवणारे सॅम माणेकशॉ हे पहिले भारतीय आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत पाच लढाया लढल्या. दुसरं महायुद्ध, १९४७ साली जेव्हा पाकिस्तानने काश्मीरवर स्वारी केली ते युद्ध, १९६२ चं चायना वॉर, १९६५ आणि १९७१ ची पाकविरुद्धची युद्ध. त्यांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे.
ते म्हणायचे, “कोणी सैनिक म्हणत असेल की तो मरणाला घाबरत नाही तर एकतर तो खोटं बोलतोय किंवा तो गोरखा आहे.”
१९७१ साली पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारण्यापूर्वी पंतप्रधान इंदिरा गांधींनी Field Marshal Sam Manekshaw यांना बोलावून विचारलं की आपण युद्धाला तयार आहोत का ?
तेव्हा इंदिराजींना माणेकशॉ यांनी हसून उत्तर दिलं, “I am always ready Sweety”
इंदिरा गांधींशी बेधडकपणे बोलणारे ते एकमेव लष्करप्रमुख असावेत. त्याच सुमारास इंदिरा गांधींना असा संशय आला की माणेकशॉ सैन्याच्या मदतीने त्यांची सत्ता उलथवून टाकायचा प्रयत्न करत आहेत. त्या अस्वस्थ झाल्या. ही बातमी जेव्हा माणेकशॉना कळली तेव्हा ते Indira Gandhi ना भेटायला गेले आणि म्हणाले, “तुम्हाला वाटत नाही का की मी देश चालवू शकत नाही. तुमचं नाक लांब आहे आणि माझंही नाक लांब आहे पण मी दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसत नाही. मी राजकारणात ढवळाढवळ करणार नाही, तुम्ही माझ्या कामात करू नका.” असे होते डेअर डेव्हिल माणेकशॉ.

१९६२ च्या युद्धात मिझोरामच्या एका बटालियनने युद्धापासून लांब राहायचा प्रयत्न केला तेव्हा माणेकशॉनी त्यांना बांगड्या पाठवल्या आणि चिठ्ठी पाठवून लिहिलं की युद्धाची एवढी भीती वाटत असेल तर बांगड्या घाला. नंतर त्या बटालियनने युद्धात चांगली कामागिरी बजावली, तेव्हा माणेकशॉनी त्यांना पुन्हा चिठ्ठी पाठवली आणि कळवलं की आता त्या बांगड्या परत द्या. ते हजरजबाबीही तेवढेच होते.
१९७१ च्या युद्धानंतर Sam Manekshaw यांना कुणीतरी विचारल की फाळणीनंतर तुम्ही पाकिस्तानात गेला असता तर काय झालं असतं ? माणेकशॉ पटकन म्हणाले की मग पाकिस्तान जिंकलं असतं. पाकिस्तानी जनरल याह्या खान आणि माणेकशॉ दोघेही सर ऑचिनलेक ह्यांच्या हाताखाली होते.
त्यावेळी मानेकशॉकडे लाल जेम्स मोटारसायकल होती. ती याह्या खाना यांना आवडायची. जेव्हा फाळणी झाली तेव्हा याह्या खानने ती मोटरसायकल माणेकशॉकडून विकत घेण्याची मागणी केली आणि त्याबदल्यात १००० रुपये देण्याचं कबूल केलं. पाकिस्तानात गेल्यानंतर Yahya Khan यांच्याकडून ते पैसे द्यायचे राहून गेले.
१९७१ च युद्ध जिंकल्यानंतर माणेकशॉ म्हणाले, त्या १००० रूपयांच्या बदल्यात मी याह्या खानकडून अर्धा पाकिस्तान घेतला.
अश्या ह्या धडाकेबाज सेना अधिकाऱ्यावर बॉलिवूडमध्ये सिनेमा तयार झाला नाही तर नवलंच, नाही का ? दिग्दर्शिका मेघना गुलजार माणेकशॉ यांच्या जीवनावर ‘Sam’ नावाचा सिनेमा घेऊन येत आहेत. ह्या चित्रपटात विकी कौशल Field Marshal Sam Manekshaw यांचे पात्र साकारताना दिसणार आहे.
