Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

मेट्रोसाठी जंगलतोड केली म्हणून सरकारवर टीका करण्याआधी हे नक्की वाचा

सरकारच्या अनेक धोरणांचा सामान्य जनतेच्या दैनंदीन आयुष्यावरती मुलगामी परिणाम होत असतो अर्थात त्यासाठी काही कठोर निर्णय सरकारला घ्यावे लागत असतात. कुठल्याही विकास कामासाठी या गोष्टी विचारात घेऊन सरकार निर्णय घेत असते. या सर्व गोष्टी आठविण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेला ‘आरे मिल्क कॉलनी’चा विषय. अशी कुठली गोष्ट आहे ज्यामुळे हा सर्व विषय एवढा वादग्रस्त ठरत आहे ? जाणून घेऊयात या लेखामध्ये……

मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढणारे ट्रॅफिकचे प्रमाण बघता त्याला काहीतरी पर्यायी मार्ग भविष्याच्या दृष्टीने तयार करणे हे सरकारचे अग्रक्रमाने धोरण असायलाच हवे होते. दिवसेंदिवस शहरांमध्ये वाढणारी लोकसंख्या आणि त्यामुळे वाढणारी चार चाकी गाड्यांची संख्या यामुळे मुंबईमध्ये चांगले रस्ते आणि सुसज्ज वाहतूक व्यवस्था असतानाही ती व्यवस्था कमी पडत होती म्हणून शहरांमध्ये ट्रॅफिकचे प्रमाण भयंकर वाढले होते. लोकल ला मुंबईचे लाईफ लाईन असे म्हटले जाते पण खरी परिस्थिती बघता लोकल प्रचंड गर्दी साठीच प्रसिद्ध आहे.

(Source – Scroll)

असे म्हटले जाते की, “गर्दीच्या काळात तुम्हाला ट्रेनमध्ये चढण्याची किंवा उतरण्याची देखील गरज पडणार नाही कारण गर्दीच तुमचे हे काम सुकर करून टाकते.” मग या सर्वांमधून पर्याय करण्यासाठी जर शासनाने पर्यायी मार्ग म्हणून मेट्रो सेवा सुरू करण्याचे आयोजिले असेल तर त्यामध्ये गैर ते काय? कारण कुठल्याही शासनासाठी नागरिकांची सुरक्षा ही महत्त्वाची असते. रेल्वेचा विचार करता रेल्वेचे अनेक पूल हे मोडकळीला आलेले आहेत अर्थात आपले सरकार त्या पुलांची वेळोवेळी डागडुजी करत असल्यामुळे आजही ते वापरात आहेत पण कधीकधी दुर्दैवाने एलफिस्टन सारख्या घटना होऊ नयेत आणि त्यामध्ये सामान्य नागरिकांचा नाहक बळी जाऊ नये म्हणून सरकारने पर्यायी व्यवस्था उभी करणे हे अपेक्षितच होते. त्यामध्ये वादग्रस्त ठरला तो मुद्दा म्हणजे मेट्रो प्रकल्प उभा करण्यासाठी शासनाला कुठेतरी “मेट्रो उभारणी प्रकल्प” सुरू करणे गरजेचे होते. ज्याला “मेट्रो कारशेड” असे म्हणतात.

शासनाने मुंबई मधील आरे मिल्क कॉलनी मध्ये मेट्रो प्रकल्प उभा करायचे ठरवले. आरे मिल्क कॉलनी मध्ये हे जेव्हा प्रकल्प उभा करायचं ठरवलं तेव्हा अर्थातच तेथील काही झाडं ही कापली जाणारच होती. खरे पाहता आरे मिल्क कॉलनी जवळपास 1280 हेक्‍टरवर पसरलेली आहे. यापैकी केवळ 33 हेक्टर्स एवढीच जागा सरकारला मेट्रो कार शेड तीन तयार करण्यासाठी देण्यात आली होती. जी एकूण जागेच्या 2.5 टक्के एवढी देखील नाही. माहितीनुसार आरे मिल्क कॉलनीची जागा 1949 पासून इतर कामांसाठी बिनबोभाटपणे वापरली जात आहे. या 33 हेक्टर मध्ये जवळपास 3691 झाडे आहेत यापैकी 2700 झाडे या मेट्रोच्या कन्स्ट्रक्शन साठी पाडण्यात आली.

ही झाडे पाडली म्हणून विरोध करणाऱ्या विरोधकांना हे माहिती आहे का की “एम एम आर सी” या संस्थेने जवळपास 21 हजार झाडे आधीच संजय गांधी राष्ट्रीय वनामध्ये लावलेली आहेत. 2947 झाडे MMRC ने आरे मिल्क कॉलनी च्या परिसरामध्ये लावलेली आहेत. तसेच 11400 झाडे त्यांनी मुंबईच्या आजूबाजूला लावून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या मुद्यावरून विरोध करणाऱ्या व्यक्तींनी या गोष्टीची देखील दखल घेणे गरजेचे आहे. आणि खरे बघायला गेले तर याच आरे मिल्क कॉलनी परिसरात याआधी फिल्म सिटी तयार करण्यात आली होती जी 210 हेक्टर परिसरात पसरलेली आहेत आणि इथेच रॉयल पाम यासारखा प्रकल्प देखील प्रस्थापित केला आहे जो 97 हेक्टर एवढ्या प्रचंड परिसरामध्ये लावलेला आहे. तरीही ही फक्त मेट्रोला विरोध का ? मेट्रोला विरोधामागे राजकीय कारणे आहेत का ? याचा विचार देखील सामान्य जनतेने करणे गरजेचे आहे.

मेट्रो मुळे मुंबईकरांच्या आयुष्यामध्ये काय बदल होतील ?

मेट्रो प्रकल्प 1आणि 2 हे अत्यंत यशस्वी प्रकल्प राहिलेले आहेत ज्यामुळे आज यातायात सुकर व जलद गतीने होण्यास मदत होत आहे आणि याचा अनुभव देखील मुंबईकरांनी घेतलेला आहे. मेट्रो मुळे मुंबईच्या ट्राफिकवर तर परिणाम होणारच आहे त्यासोबतच मुंबईकरांसाठी एक सुरक्षित पर्याय देखील उपलब्ध होणार आहे. एका सर्वेक्षणानुसार आज मुंबईच्या रस्त्यांवरती रोज 4.5 लाख गाड्या यातायात करतात, मेट्रो झाल्यानंतर या गाड्यांची संख्या कमी होऊन 2.5 लाखांवरती येईल असे सर्वेक्षणात सांगितलेले आहे, यामुळे पेट्रोलची तर बचत होईलच पण पर्यावरण रक्षण देखील होईल या मुद्द्याला विरोधक जाणून-बुजून बाजूला करत असल्याचं लक्षात येत आहे.

मेट्रो झाल्यामुळे यातायात जलद गतीने होईल यामध्ये शंका नाही पण यामुळे उद्योगांनाही चालना मिळेल अनेक उद्योजक मुंबईमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढे येतील यामध्येही शंका नाही. जेव्हा मेट्रोचे काम चालू होईल तेव्हा आणि मेट्रोचे काम झाल्यानंतरही खूप मोठ्या प्रमाणावर ती उद्योगांची तसेच नौकऱ्यांची निर्मिती होईल या गोष्टीचा विचार सामान्य जनतेने करणे गरजेचे आहे. मेट्रो मुळे असे अनेक बदल सामान्य जनतेच्या रोजच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. रेल्वेमध्ये रोजचा गर्दीचा प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मेट्रोचा निर्णय पटेल आणि तो नागरिक मेट्रोच्या बाबतीत सरकारच्या पाठीशी उभा राहील यामध्ये तिळमात्र शंका नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.