लंडनमधील नोकरी सोडून दहशतवादा विरोधात तरुणांची फौज उभी करणारा आयपीएस अधिकारी

लंडनमध्ये मिळालेली नोकरी, पैसा व आरामदायी जीवन सोडून कुणी जर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करण्यासाठी भारतात येत असेल तर तुम्ही अश्या व्यक्तीला काय म्हणाल ? तुम्ही म्हणाल कि असं करणारी व्यक्ती एक तर बावळट आहे किंवा त्या व्यक्तीच्या डोक्यात समाजसुधारणेचं खूळ भरलंय.
आपण सामान्य माणसं फक्त एवढाच विचार करू शकतो पण काही असामान्य माणसं अशी असतात ज्यांना समाजामध्ये सकारात्मक बदल घडवायचा असतो व त्यासाठी ते सर्व भौतिक सुखावर पाणी सोडण्यास तयार असतात. अश्याच एका असामान्य व्यक्तीचं नाव आहे हर्ष पोद्दार. पश्चिम बंगालमधील कोलकाताचे रहिवाशी असलेले हर्ष ह्यांनी शहरातील नामांकित अश्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशियल सायन्सेस मधून आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर युके सरकारकडून मिळणारी प्रतिष्ठित अशी शेव्हनिंग स्कॉलरशिपही त्यांना मिळाली.
उच्च शिक्षणासाठी हर्ष ह्यांनी थेट लंडन गाठलं व ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी ‘इंटरनॅशनल अँड कॉन्स्टिट्यूशनल लॉ’ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना लंडनमधील एका बड्या कंपनीत कॉर्पोरेट वकील म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पण हर्ष या नोकरीत खुश नव्हते.
अखेर त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला व लंडनमधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून ते २०१० साली भारतात परतले ते एका निर्धारासोबतच. तो निर्धार होता सिव्हिल सर्व्हिस जॉईन करून समाजाची सेवा करण्याचा. हर्ष भारतात परतले व त्यांनी सिव्हिल सेर्व्हीसेसची तयारी चालू केली.
सुरुवातीला त्यांना आईआरएस सर्विस मिळाली पण त्यांचं ध्येय होतं आयपीएस बनण्याचं. हर्ष ह्यांनी पुन्हा नव्याने आयपीएसची तयारी सुरु केली व २०१३ मध्ये ३६१ वी रँक मिळवून आयपीएसची परीक्षा उत्तीर्ण केली. आयपीएस उत्तीर्ण होऊन ते महाराष्ट्र केडरमध्ये रुजू झाले.
हर्ष ह्यांच्या ह्या नवीन प्रयोगामुळे हजारो तरुणांमध्ये झाला सकारात्मक बदल
हर्ष पोद्दार ह्यांनी अगदी बरोबर हेरले होते कि जर समाज गुन्हेगारीमुक्त करायचा असेल तर मुलांना समाजातील गुन्हेगार व गुन्हेगारीपासून परावृत्त करणे आवश्यक आहे, तरंच समाज खऱ्या अर्थाने सुधारू शकेल व हे करण्यासाठी हर्ष ह्यांनी एक नवीन कल्पना प्रत्यक्षात आणली. काय होती ती अभिनव कल्पना ?
या नवीन उपक्रमाचे नाव होते “युथ पार्लमेंट चॅम्पिअनशिप”
त्यावेळी हर्ष हे करवीरचे एएसपी (ASP) होते आणि ह्या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता मुलांना समाजातील गुन्हे व गुन्हेगारांबद्दल जागरूक बनवणे. कारण ह्याच वयामध्ये मुले वाईट मार्गाला लागण्याचा धोका जास्त असतो व गुंड, माफिया सुद्धा अश्याच कोवळ्या वयाच्या मुलांच्या शोधात असतात. एकदा का ह्या गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले कि त्यातून बाहेर येणे अत्यंत कठीण असते हे हर्ष ह्यांना माहित होते. म्हणूनच त्यांनी “युथ पार्लमेंट चॅम्पिअनशिप” सारख्या उपक्रमाची सुरुवात केली.
काय आहे “युथ पार्लमेंट चॅम्पिअनशिप” ?
औरंगाबादच्या नाथ वॅली स्कुल आणि औरंगाबाद पब्लिक स्कुलमध्ये हा उपक्रम राबवला गेला. ह्यात शाळेतील काही निवडक मुलांना तीन गटांमध्ये विभागण्यात आले व त्यांना भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार, नक्षलवाद, आतंकवाद असे काही विषय देण्यात आले, तिन्ही गटांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. कुणाला पोलीस, कुणाला सरकार तर कुण्या गटाला सामान्य जनतेची जबाबदारी देण्यात आली.
म्हणजे ह्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मुले काय विचार करतात व कोणते उपाय सांगतात हे पाहण्यात आले व त्या प्रत्येक गटातील एका वक्त्याला बोलण्यास सांगण्यात येत असे. म्हणजेच समस्यांचे निराकरण कश्याप्रकारे करता येईल हे तो वक्ता सांगत असे. हे अभियान जिथे जिथे राबविण्यात आले त्याभागातील मुलांचे गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण कमी झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर हर्ष पोद्दार ह्यांची हि संकल्पना अन्य जिल्ह्यांमध्येही राबविण्यात आली.
ह्या अभियानांतर्गत जवळजवळ ४२,००० मुले ह्या उपक्रमात समाविष्ट झाली व त्यामुळे मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्तींना लगाम घालण्यात पोलिसांना मोठे यश मिळू लागले. काही काळापूर्वी पुण्याजवळील भीमा कोरेगावला उसळलेल्या दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उमटले पण राज्यातील अत्यंत संवेदनशील असलेल्या मालेगावमध्ये मात्र पूर्ण शांतता होती. इथे मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कारण मालेगावचे तत्कालीन एसपी असलेल्या हर्ष पोद्दार ह्यांनी आपले काम चोख बजावले व शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवली.
भारताला, महाराष्ट्राला अश्याच कर्तबगार व समाजाप्रती तळमळ असणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज आहे.