‘कुछ कुछ होता है’ चं रिलीझ रद्द करण्यासाठी करण जोहरला अंडरवर्ल्डकडून धमकी मिळालेली

अबू सालेमचा करण जोहरच्या आईला फोन आला, तो म्हणाला ‘कुछ कुछ होता है’चं रिलीझ रद्द करून पुढच्या आठवड्यात प्रदर्शित करा नाहीतर करणला संपवून टाकू
बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचे वडील यश जोहर सुद्धा एक एक निर्माता होते. त्यांचा १९८० साली रिलीझ झालेला ‘दोस्ताना’ चांगलाच हिट झाला. परंतु आपल्या कार्यकाळात त्यांना विशेष काही यश आले नाही. करण जोहरने लिहिलेल्या An Unsuitable Boy ह्या पुस्तकात सांगितलंय कि करणने सिनेमा क्षेत्रात करिअर करू नये अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. आपल्याला आलेले अपयश करणला सुद्धा येऊ नये अशी यश जोहर यांची इच्छा होती. परंतु करण जोहरला सिनेमा क्षेत्रातच करिअर करायचे होते.
करणने आपल्या करिअरची सुरवात शाहरुखच्या DDLJ ह्या सिनेमात Assistant Director म्हणून काम करत केली. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः आदित्य चोप्रा करत होता. शूटिंग वेळी शाहरुख आणि करणची चांगलीच गट्टी जमली. जेव्हा शाहरुखला कळालं कि करणला सुद्धा स्वतःचा सिनेमा तयार करायचा आहे तेव्हा त्याने करण जोहरला केवळ प्रोत्साहित केले नाही तर त्याच्या पहिल्या चित्रपटात काम करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं. शाहरुखने करणला २ वर्षांचा वेळ दिला आणि सिनेमासाठी कथा लिहायला सांगितली.
करणला शाहरुखची असा रोल लिहायचा होता जो त्याने आधी केला नसेल आणि त्याच्या डोक्यात एका चांगल्या कथेची कल्पना आली. त्याने ऐकवलेली कथा शाहरुखला सुद्धा आवडली. शाहरुखने काजोलला सुद्धा सिनेमात काम करण्यासाठी तयार केलं. आदित्य चोप्राने ह्या सिनेमाला ‘कुछ कुछ होता है’ असं नाव दिलं. चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरु होणार होत पण ‘टीना’च्या रोल साठी कुठलीही अभिनेत्री तयार होत नव्हती. शेवटी शाहरुख आणि आदित्य चोप्रा ह्यांनी राणी मुखर्जीला तयार केलं.
‘कुछ कुछ होता है’ ह्या चित्रपटातील प्रेमच्या रोलसाठी सैफ अली खान पासून चंद्रचुर सिंग पर्यंत सगळ्यांनीच नकार दिला. चित्रपटाची शूटिंग सुरु झालेली आणि प्रेमचं पात्र कोण साकारणार हे निश्चित होत नव्हतं. शेवटी शाहरुख आणि करणच्या मदतीला सलमान खान धावून आला. सलमानने साकारलेलं प्रेम हे पात्र सगळ्यांनाच भावलं.
शेवटी अनेक अडथळ्यानंतर सिनेमा रिलीझ होण्याकरता तयार झाला. करणचा पहिलाच सिनेमा असल्याने तो फार उत्साहित होता परंतु सर्वात मोठा प्रॉब्लेम तर आता समोर येणार होता. फिल्म रिलीजच्या अगोदर अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा करण जोहरच्या आईला फोन आला आणि त्याने कुछ कुछ होता है सिनेमाचा प्रीमिअर शो रद्द करून सिनेमा पुढच्या आठवड्यात प्रदर्शित करायला सांगितला. तसे न केल्यास करणला संपवण्याची धमकी अबू सालेमने दिली होती.
अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या धमकीने करण जोहर आणि त्याच्या परिवारातील सदस्य चांगलेच घाबरले होते. त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी सिनेमाचे प्रदर्शन रद्द न करता ठरल्याप्रमाणेच सगळं करण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी करण जोहरला संरक्षण देण्याचंही आश्वासन दिलं. परंतु तरीही करणसहित त्याच्या घरचे चांगलेच घाबरलेले होते. अश्यावेळी शाहरुख खान पुढे आला आणि म्हणाला,
‘करण आपला सिनेमा ठरल्याप्रमाणेच रिलीझ होणार, मी तुझ्याबरोबर उभा आहे, बघुयात कोण काय करतं.’
शाहरुखने करणच्या आईलाही समजूत घातली आणि कुछ कुछ होता है ठरलेल्या दिवशीच रिलीझ करण्यात आला. परंतु आपल्या पहिल्या सिनेमाच्या प्रिमिअर शोला मात्र करणला स्वतःला हजर राहता आलं नाही. करण जोहरला सुरक्षेच्या कारणास्तव एका खोलीत बंद करण्यात आले आणि बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला. अंडरवर्ल्डला करणच्या ‘कुछ कुछ होता है’ सिनेमाचं प्रदर्शन का रोकायचं होतं ह्याचं कारण मात्र काही समोर आलं नाही.