इंदिरा सरकारसाठी गाणं म्हणायला नकार दिला म्हणून किशोरदांचे गाणे बॅन केलेले

लहान असताना किशोरदांचा आवाज एखाद्या फाटक्या स्पिकरसारखा होता परंतु त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेने बेसूर असलेले किशोरदा सुरात गाऊ लागले….
ध्रुव बाळाला जेव्हा त्याच्या हक्काची जागा नाकारण्यात आली तेव्हा त्याने तपस्या करून अढळस्थान मिळवलं… आणि तेही थेट गगनात!! जो आज “शुक्रतारा” म्हणून ओळखल्या जातो.
सुरुवातीला त्यांनाही नकार मिळत गेला….. परंतु नंतर मात्र स्वतःचं असं खास स्थान मिळवण्यात ते यशस्वी झाले. प्रसिद्ध गायक – किशोर कुमार…. सर्वांचे लाडके किशोरदा! आज ते या भौतिक जगात नसले तरी सगळ्यांच्या आत्मिक जगात ते अढळस्थान मिळवून आहेत.. आपल्या गाण्यांनी अमर झाले आहेत.
आभास कुमार गांगुली ह्या वल्लीचे गुण काही औरच! फिल्म इंडस्ट्रीने त्यांना “किशोर कुमार” हे नाव दिलं जे प्रचंड लोकप्रिय झालं.
सुरुवातीच्या काळात त्यांना कुणी गांभीर्याने घेतलं नाही. “मोठा भाऊ अशोककुमारने ऍक्टर म्हणून चांगला जम बसवला आहे तेव्हा हा देखील त्याच्या पाठोपाठ आलाय” असा काहीसा तर्क त्यावेळचे दिग्गजही लावत. परंतु हिऱ्याला ओळखण्यासाठी योग्य पारखीचीच नजर हवी… आणि एस. डी. बर्मन यांनी हेरलं – हे पाणी काही वेगळंच आहे !
सुरुवातीच्या काळात दुर्लक्षित राहिलेलं हे अनमोल रत्न नंतर असं काही लकाकू लागलं की सगळ्यांचे डोळेच दिपले ! मुकेश, मन्ना डे, रफी ह्यांसारख्या मातब्बरांमध्ये जाऊन बसण्याचा मान किशोरदांना मिळाला. आपण काय आहोत हे प्रथम त्यांना स्वतःलाही ठाऊक नसावं.. त्यामुळेच की काय, ऍक्टर म्हणून काम करतांना काही काळ खुद्द रफीने त्यांना आवाज दिला !
मोठे भाऊ अशोक कुमार यांनी एका मुलाखतीत किशोरदांचा लहानपणाचा किस्सा सांगितलेला. लहान असताना किशोरदांचा आवाज एखाद्या फाटक्या स्पिकरसारखा होता म्हणजेच ते फार बेसूर होते. एका दिवशी त्याच्या पायाला गंभीर जखम झाली आणि म्हणून त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी कुठलं तरी औषध किशोरदांना दिलं आणि या औषधामुळे ते ३ दिवस सतत रडत होते आणि यामुळेच त्यांचा गळा साफ झाला. परिणामी बेसूर किशोरदा सुरात गाऊ लागले.
किशोरदांकडून भूमिका करवून घेतली ती त्यांच्या मोठ्या भावाने म्हणजेच अशोककुमारने ! किशोरदांनी ऍक्टिग पासून स्वतःला लांब ठेवण्यासाठी बऱ्याच खटपटी-लटपटी केल्या. डायलॉग विसरण्याचं नाटक कर, सेटवरून पळूनच जा, कसलेतरी बहाणेच बनव… एक ना दोन ! परंतु ह्या दादामुनींनी किशोरकडून ऍक्टिग करवूनच घेतली. त्यावेळी आजच्यासारखी घराणेशाही नव्हती की घरातला “माल” फिल्म्सच्या बाजारात “खपवायचा” नव्हता.
अशोककुमार आपल्या ह्या धाकट्या भावाचे विविधांगी गुण जाणून होते. तो गायक तर होऊ शकतोच परंतु त्याचबरोबर एक उत्तम नटही होऊ शकतो हे त्यांनी जोखलं होतं.. आणि म्हणूनच केवळ त्यांच्या हट्टापायी किशोरदा ऍक्टर झाले. ..एवढंच नव्हे तर स्वतःला सिद्धही केलं ! जबरदस्त अभिनय करण्यात त्यांनी कसलीच कसूर सोडली नाही. अत्यंत दुःखी नटाची भूमिका असो की मुलखाचा विनोदवीर, शांत व्यक्तिमत्व असो की फारच बडबडा… प्रत्येक चरित्रात त्यांनी जीव ओतला !
खरंच, त्यांना त्यांच्या कुठल्या गुणामुळे ओळखावं असा प्रश्न पडतो.. उत्तम नट, प्रभावशाली गायक, गुणी निर्देशक-निर्माता, जाणता संगीत निर्देशक की एक हृद्य कवी ? ते सगळं काही होते…
किशोरदांचे अनेक किस्से सांगितल्या जातात…. त्यातले बरेच “ते विचित्र होते” असं सांगणारेच आहेत. खरं म्हणजे एखादी व्यक्ती जगावेगळी वागली की ती विचित्र अथवा बं-डखोरच असते असं अजिबात नाही. तिच्या तसं वागण्याला तिचे काही पूर्वानुभव कारणीभूत असतात. पण एवढा विचार कोण करतो ? वरपांगी विचार करणाऱ्या ह्या समाजाला अशा गोष्टी कधी समजल्या नाहीत, कधीच समजणार नाहीत..
‘आपल्या आवाजाला येथे नाकारल्या जातंय, आपला अव्हेर होतो आहे’, हे किशोरदांना कळत होतं. ते निराश होत चालले असतांना एस. डी. बर्मन यांनी त्यांना संधी दिली आणि त्यांची ‘आराधना’ ही फिल्म सुपरडुपर हिट ठरली आणि राजेश खन्ना हा पहिला सुपरस्टार !
या फिल्मपासून किशोरदांना खरी ओळख मिळाली. लोक त्यांच्या आवाजावर फिदा झाले….मोठमोठे निर्माते त्यांना आपल्या फिल्मच्या गाण्यांसाठी साइन करू लागले. परंतु किशोरदा जुने दिवस विसरले नव्हते. आपल्यावर नाही, आपल्या किर्तीवर प्रेम केल्या जातंय हे त्यांना पक्कं ठाऊक होतं. म्हणूनच की काय, त्यांना कुणी मित्र नव्हते, त्यांच्या बंगल्यावरही कुणी यायचं नाही. ह्याविषयी त्यांना एकदा विचारण्यात आल्यावर ते म्हणाले,
“मी माझ्या बंगल्याच्या आवारात अनेक झाडं लावली आहेत. त्यांच्याशी मी गप्पा मारतो. तेच माझे सोबती….मला अजिबात एकटं वाटत नाही”
झाडांशी बोलणाऱ्या ह्या खऱ्या माणसाला अवलिया म्हणून उपाधी देण्यात आली ! परंतु खरं सांगायचं तर अशी वेडीच माणसं असतात ! ‘सुज्ञ’ माणसं म्हणजे केवळ मुखवटे !!
१९७५ मध्ये इंदिरा गांधींनी देशात आ-णीबाणी लागू केली होती. सरकारच्या कार्यक्रमाची माहिती गाण्याच्या स्वरूपात देण्यासाठी किशोदांना आमंत्रण दिल्या गेलं. कसलाही मुलाहिजा न बाळगता त्यांनी सरळ नकार कळवला. परिणामी, त्यांचे आकाशवाणीवरचे – दुरदर्शनवरचे गाण्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले, तसंच पुढील काही काळासाठी त्यांच्यावर बॅ-नही लावण्यात आला. त्या काळातले त्यांचे काही चित्रपटही थंड बस्त्यात टाकण्यात आले !
आपल्याला होणाऱ्या नुकसानाची तमा न बाळगता, कसल्याच परिणामांची चिंता न करता, आपल्या तत्वांशी तडजोड न करता खुल्या दिलानं सगळं स्वीकारणारा हा माणूस खरंच अवलिया होता ! परंतु अशी जगावेगळी, वेडी माणसंच मोठी कामं करून जातात !! स्वतःचं नाव ‘रशीको रमाको’ (किशोर कुमार) असं सांगणारं हे अजबगजब व्यक्तिमत्व ह्यापुढे होणं केवळ अशक्य !
“खंडवावाला किशोर कुमार” अशी स्वतःची ओळख करून देणाऱ्या किशोरदांचं आपल्या मध्य प्रदेश येथील खांडवा गावावर निस्सीम प्रेम होतं. केवळ भावावरच्या प्रेमाखातर नट म्हणून काम केलं. मोकळंढाकळं, जोशीलं, स्वतंत्र आयुष्य ते जगले. पटलं नाही ते ठामपणे सांगितलं, आवडलं त्याची भरभरून दाद दिली.
परमेश्वराचा न्यायही अजब आहे. एखाद्याला तो जेव्हा असं सर्वार्थाने गुणी बनवतो ना, तेव्हा तो त्या व्यक्तीला सुखी मात्र ठेवत नाही…. अनेक गुण देऊन त्या व्यक्तीला हवं असं सुख मात्र स्वतःकडे ठेऊन घेतो.
जे वाटतं ते बोलणारा, मनापासून हसणारा-हसवणारा, जीव तोडून प्रेम करणारा…. निखळ, निर्व्याज अश्या ह्या माणसाचं व्यक्तिगत आयुष्य मात्र काही सुखकर नव्हतं…एखादा माणूस सुखी होण्यासाठी वारंवार प्रयत्न करतो. जेव्हा त्याला ते मिळतं तेव्हा कदाचित त्याची “लांबच्या प्रवासाला” जायची वेळ झालेली असते. किशोरदांच्या बाबतीत हेच घडलं..
रोमा गुहा ह्या महत्वाकांक्षी बंगाली नटीशी त्यांनी लग्न केलं. तिच्याशी मतभेद झाल्यामुळे ते दोघे वेगळे झाले. मधुबाला त्यांच्या आयुष्यात आली. तिला हृदयाचा गंभीर आजार आहे हे माहीत असूनही किशोदांनी तिच्याशी लग्न केलं. तिला वाचवण्यासाठी प्राणांतिक प्रयत्न केले. परंतु तिची साथही अल्पकाळ टिकली.
त्यानंतरच्या काळात त्यांनी अनेक दर्दभरी गाणी गायली, ज्यांच्यावर त्यांच्या मनातली व्यथेची छाप दिसते. योगीता बालीशी केलेला विवाहही अल्पकाळ टिकला.
लीना चंदावरकर मात्र किशोरदांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याबरोबर होत्या. लिनाबरोबर ते खुश होते…. परंतु ह्यावेळी नियतीने त्यांचे प्राणच घेतले. परिपूर्ण सुखाचा असा काळ ह्या माणसाला अतिशय कमी लाभला. आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आपल्या मोठ्या भावासाठी – अशोककुमार यांच्या वाढदिवसासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीच्या दिवशीच किशोरदांचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला मृत्यू सर्वांच्याच मनाला चटका लावून गेला !!!