बोटं मोडण्याची सवय असेल तर वेळीच त्याचे परिणाम सुद्धा जाणून घ्या

माणूस सवयींचा गुलाम असतो असे म्हणतात. कित्येक लोकांना वेगवेगळ्या सवयी असतात आणि याच सवयींचे चांगले वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतात. आपल्याला लागलेल्या ९०% सवयी ह्या नकळत आणि कधी पासून लागलेल्या आहेत हे आपण स्वतःही सांगू शकत नाही. बोटं मोडणे ही अतिशय सामान्य सवय आहे, आपल्या पैकी प्रत्येकाने कित्येकदा नकळत बोटे मोडलेली असतीलच. बोटांबरोबर मान मोडण्याची सवय सुद्धा अनेकांना असते.
झटका देऊन मान डावी कडे नाही तर उजवी कडे फिरवून त्यातून कडकड असा आवाज आला की एकदम मोकळे वाटते असा बऱ्याच लोकांचा समज आहे. बऱ्याचदा एका जागी बसून कॉम्प्युटर, टाइपिंग किंवा लेखन केल्यानंतर हात आकडून जातात, हात पाय ताणून दिले की आलेला ताण जातो आणि मोकळं वाटतं, अगदी नकळत हाताची पायाची पण बोटे मोडले जातात.
ह्या सवयीचा खोलात जाऊन आपण कुणीच कधी विचार केलेला नसतो, बऱ्याच सवयी जश्या अपायकारक ठरू शकतात तशी ही सवय सुध्दा अपायकारक आहे का ह्याचा आपण शोध घेऊया.
का येतो कडकड असा आवाज हाडांमध्ये ?
बऱ्याच वेळा बसलेले वृद्ध लोक उभे राहत असताना, चालताना त्यांच्या गुढग्यातून, कंबरेतून कटकट आवाज येतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे दोन हाडांच्या सांध्यामध्ये एक चिकट द्रव असतो जो वंगण म्हणून काम करतो. दोन हाडांचे एकमेकांवर घर्षण होऊ नये आणि होणारी झीज हा द्रव थांबवतो.
वयोमानानुसार हा द्रव शरीरात कमी होत जातो आणि दोन हाडांचे एकमेकांवर घासल्या गेल्याचा आवाज अधिक यायला लागतो. परिणामी सांध्याजवळ हाडांची झिज होते, आसपासच्या ज्या पेशी असतात त्या पण दुखावल्या जाऊन सूज सुद्धा येते. पण वयोमानानुसार होणारी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.
आता बोटं मोडण्याच्या सवयीमुळे काय वाईट परिणाम होतात ते बघूयात
जेव्हा आपण बोटे मोडतो तेव्हा आपल्या सांध्यात स्नायू जवळ असलेला सॅननोव्हियल द्रवामधून (Synovial Fluid) वायूचा एक फुगा तयार होतो आणि त्यातूनच हा आवाज येतो. काही संशोधकांच्या मते बोटांना कोणत्याही प्रकारचे नुकसान बोटं मोडल्यामुळे होत नाही.
मात्र, काहींच्या संशोधनामध्ये असे निष्कर्ष निघाले की पुन्हा पुन्हा वेळी-अवेळी बोटं, मान मोडल्याने, सांध्यांना जोडणाऱ्या ज्या नाजूक पेशी असतात त्या दुखावल्या जाऊन खराब होऊ शकतात. तसेच आतून सूज येऊन वारंवार दुखण्याची समस्या होऊ शकते. बोटांना आणि अंगठ्याजवळ दुखापती झाल्याच्या काही घटना झालेल्या आहेत, असंही डॉक्टर सांगतात.
मुळात “अति तिथे माती” ही म्हण आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलीच आहे त्यामुळे कोणत्याही सवयीचा अतिरेक होऊ नये ह्याचीच काळजी घेतली तर आरोग्याच्या समस्या आपल्या पासून दूर राहतील.
म्हणजे इथून पुढे “दुसऱ्याच्या नावाने पण बोटं मोडणे” कमी केलं तर आपल्याच हाडांचे नुकसान होणार नाही मंडळी.