अंबानी Vs अंबानी…एक अब्जाधीश तर एक कर्जबाजारी ! असं काय घडलं ?
२००५ साली रिलायंसचं विभाजन झालं तेव्हा मुकेश व अनिल अंबानी हे दोघे भाऊ जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत अनुक्रमे ५ व ६ व्या स्थानी होते. पण आज एक भाऊ अब्जाधीश तर एक कर्जबाजारी, अनिल अंबानींचं गणित नेमकं बिघडलं कुठे ?
आपला भारत हा परंपरावादी देश म्हणून ओळखला जातो. एखादा कोणी काही छोट्या किंवा मोठ्या प्रमाणावर काही तरी करून जातो, मग तो प्रघात पडतो, परंपरा बनते. हजारो वर्षांची संस्कृती असल्यामुळे समृद्ध परंपरा आपल्या देशाला लाभल्या आहेत. काळ बदलला, परिस्थिती बदलली तरी या परंपरांचं पालन आपण भारतवासी पिढ्या दर पिढ्या मन लावून करत आलो आहोत. लडाख ते कन्याकुमारी व गुजरात – अरुणाचल प्रदेश अशा खंडप्राय प्रदेशात परंपरांचं वैविध्य पहायला मिळतं. अशीच एक परंपरा आहे उद्योग – व्यवसायाची. शिक्षण कमी असो किंवा उच्चशिक्षित पण वडिलोपार्जित व्यवसाय चालवणं ही परंपरा पाळणारे खूप लोक आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो.
परंपरागत उद्योग-व्यवसाय सांभाळणे, तो वाढवणे, बाप से बेटा सवाई या प्रमाणे वागणे व संपत्तीमध्ये भर टाकत राहणे कुटुंबाचा नाव लौकिक वाढवणारी अशी काही प्रसिद्ध उद्योजक घराणी आपल्या देशात आहेत. त्यात जे महत्वाचं आणि देशातील श्रीमंतांच्या यादीतील सर्वात वरचं नाव असणारं कुटुंब म्हणजे ‘अंबानी’. पण केवळ मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब देशातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखलं जातं. मग अनिल अंबानींचं काय? या श्रीमंतच्या यादीत ते कुठं आहेत? नक्की काय परिस्थिती जाणून घेऊयात.
‘अंबानी’ (Ambani) या उद्योजक घराण्याचे मूळपुरुष हे धीरजलाल हीरालाल उर्फ धीरूभाई अंबानी, त्यांना व्यापाराची कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती, कारण त्यांचे वडील शिक्षक होते. त्यांनी केवळ माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं, पण व्यवसाय करण्याचं ठरवलेल्या त्यांनी भजी विकण्याचं काम सुरू केलं, नंतर ते येमेन या देशात एडन शहरात पेट्रोल पंपावर काम पण केले, नंतर ते मायानगरी मुंबईमध्ये आले, तेंव्हा फक्त ५०० रुपये त्यांच्या खिशात होते. पण त्यांच्याकडे दूर दृष्टी आणि धाडसी वृत्तीच्या बळावर त्यांनी उत्तरोत्तर प्रगती केली, त्यांनी अब्जो रुपयांचं साम्राज्य उभं केलं. त्यांची दोन मुलं मुकेश व अनिल हे रिलायन्स समूहाच्या थेट मोठ्या हुद्द्यांवर येणं साहजिक होतं. इतका मोठा कारभार पहाताना मतं – मतांतरं येत असतात, धीरूभाईंच्या हयातीत या दोन बंधूंचे मतभेद मनभेदाकडे झुकू लागले होते.
धीरूभाईंच्या निधनानंतर हा वाद विकोपाला गेला खरंतर त्यांनी मृत्यूपत्र मागे न सोडल्यामुळे ही भाऊबंदकी उफाळून आली व त्याच कारण होतं की कोणाच्या वाट्याला कोणती कंपनी येणार ? रिलायन्स पेट्रोलिअम सारखी महत्वाची कंपनी की ज्याच्या मुख्य पाताळगंगा कारखाना उभा करणं व त्याच्या व्यवसायाचं अ ते ज्ञ समजून घेण्यासाठी व मुकेश यांनी खूप कष्ट घेतले होते, म्हणून ते त्यांना मिळणं साहजिकच होतं त्यासोबत RCOM ही टेलीकॉम क्षेत्रातील कंपनी उभी करण्यातही Mukesh Ambani यांचा पुढाकार होता म्हणून त्यांना आता मालकी हक्क हवा होता पण अनिलना ही कंपनी हवी होती, असा वाद होता. २००५-०६ च्या दरम्यान रिलायन्स उद्योग समूहाची विभागणी करण्यात आली, आई कोकिलाबेन यांनी चार्टर्ड अकाऊंटंट एस्. गुरुमुर्ती व के. वी. कामत या हीत चिंतकांच्या सहाय्याने हे घडवून आणलं. यातून कुणाच्या वाट्याला काय काय आलं ?
अनिल यांना मिळालेल्या कंपन्या RCOM, Reliance Capital, Energy, Natural Resources Ltd., Broadcast Network Ltd. या नव्या अर्थव्यवस्थेचे मार्ग खुले करणार्या होत्या, त्यांनी याचं नवीन नामकरण केलं ‘अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप’, तर मुकेश (Mukesh Ambani) यांच्या वाट्याला आलेल्या कंपन्या Reliance industries Ltd, Reliance Petroleum, Indian Petrochemicals Corporation Ltd, Reliance Industrial Infrastructure Ltd. या जुन्या अर्थव्यवस्थेवर आधारित होत्या. हे दोन्ही बंधू श्रीमंतांच्या जागतिक क्रमवारीत अनुक्रमे ५ व्या व ६ व्या स्थानी होते. आणि संपत्तीचा विचार करता मुकेश हे ४३ बिलियन तर अनिल हे ४२ बिलियन डॉलर्स इतक्या संपत्तीचे मालक होते.
एकाच झाडाच्या शाखा असूनही उद्योग जगतातल्या साम्राज्यविस्तारासाठी त्या दोघांच्यामध्ये जोरदार चढाओढ सुरू झाली होती. सनराइज इंडस्ट्री म्हणजे अशा प्रकारचं उद्योगक्षेत्र की ज्यामध्ये नजीकच्या भविष्यकाळात त्याचं महत्व वाढतच जाणारं असेल, तर या क्षेत्रात पाऊल ठेवल्यामुळे व वाट्याला आलेल्या नवीन अर्थव्यवस्थेवर आधारित कंपन्यांमुळे अनिल यांचा वारू थोरल्या बंधूंपेक्षा आघाडीवरच राहील, असा तज्ज्ञ मंडळींचा कयास होता.
२००५ साली अनिल यांनी ‘अॅडलॅब्स फिल्म्स’ ही कंपनी विकत घेतली. त्याद्वारे त्यांनी ‘बिग सिनेमाज्’ ही मल्टीप्लेक्स थिएटर्स उभी केली, २००८ पर्यन्त ७०० मल्टीप्लेक्सेस् असलेली देशातील सर्वात मोठी थिएटर साखळी झाली होती.
त्याच वर्षी हॉलीवुडचे प्रख्यात निर्माते – दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग यांच्या DreamWorks या चित्रपट निर्माण कंपनी बरोबर १.२ बिलियन डॉलर्सचा करार अनिल यांनी केला, Reliance Entertainment आणि DreamWorks यांच्या सहयोगातून Bridge of the spies, Lincoln, Warhorse, 1917 यासारखे ऑस्कर पुरस्कार प्राप्त सिनेमे बनवले गेले.
बरं २००८ मध्ये जेंव्हा Reliance Power कंपनीने जेंव्हा आपले भाग/शेअर्स खुले केले तेंव्हा काही क्षणातच ते खरेदी केले गेले, हा भारतीय शेअर बाजारातील एक विक्रम ठरला. एकंदरीत उद्योग जगतामध्ये अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचा चांगलाच दबदबा निर्माण झाला. सिनेक्षेत्रातील बड्या कलाकारांशी त्यांचे चांगले स्नेहसंबंध तयार झाले, बच्चन परिवाराचं अनिल (Anil Ambani) यांच्या कुटुंबाशी असलेलं नातं सर्वश्रुत आहे. त्याचबरोबर राजकीय नेते मंडळींशीही त्यांची जवळीक वाढली. समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह यांच्यामुळे तर त्यांना राज्यसभा खासदारकी मिळाली.
एकदा त्यांना एका अमेरिकन गुंतवणूकदार व्यक्तीनं सल्ला दिला की आपल्या उद्योग समूहाच्या सुदृढतेबरोबरच शारीरिक सुदृढता ही जपावी, हा सल्ला फारच मनावर घेतला आणि धावायला सुरूवात केली, फिटनेसच्या बाबतीत ते फारच सजग राहू लागले. त्यांची प्रसिद्धी ही फक्त उद्योगपती अशी न राहता फिटनेस प्रेमी, राजकारणी असं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ते मान्यता पावले. मुकेश यांनी जेंव्हा त्यांचं ‘एण्टिलिया’ हे घर बांधलं, जी आशिया खंडातील सर्वात महागडी वास्तू आहे, त्याची किंमत आहे तब्बल ६००० करोड रु. मग अनिल यांनीही वांद्रे पाली हिल भागात आपल घर बांधण्याचं ठरवलं त्या अलीशान बंगल्याचं नाव अबोड असं ठेवलं, त्याची किंमत ही ५००० करोड रु. इतकी असावी. तर भावाशी स्पर्धा करणं हे त्यांच्या डोक्यातून काही जात नव्हतं.
अफाट संपत्ती, पैसा जवळ आहे, कीर्ती आहे, म्हणून अनिल हे आपलं स्थान अबाधित ठेवतील असं बहुतेक लोकांना वाटलं पण काळाच्या पोटात काय दडलेलं असतं कोणी सांगू शकत नाही. २००५ मध्ये आईच्या समोर दोन्ही भावांमध्ये वाटणी होताना सामंजस्य करार झाला होता, त्याप्रमाणं मुकेश यांच्या Reliance Industries Ltd. ने अनिल यांच्या Reliance Natural Resources Ltd. ला २.३४ डॉलर्स/ MMBtu
MMBtu – Metric Million British Thermal Unit हे एक पारंपरिक वैश्विक एकक आहे, ज्याद्वारे नैसर्गिक वायु हा ऊर्जेच्या स्वरूपात मोजला जातो.) या दराने नैसर्गिक वायु देण्यासाठी होकार दिला होता, पण नंतर २०१० सालात आंतरराष्ट्रीय बाजारात तो दर ४.२४ डॉलर्स/ MMBtu इतका झाला होता, म्हणून मुकेश यांनी अनिल यांना जुन्या दराने देण्यास नकार दिला. हे प्रकल्प कृष्णा – गोदावरी या नद्यांच्या खोर्यात होते. बरं गोष्ट व्यावहारिक बाबींशी सबंधित असली तरी कौटुंबिक होती, चार भिंतीत हे सोडवण्याच्या ऐवजी अनिल यांनी मुकेश यांना कोर्टात खेचलं. सर्वोच्च न्यायालयानं गॅस उपभोक्तांच्या नियमानुसार Mukesh Ambani यांच्या बाजूनं निकाल दिला. कोर्टाच्या आदेशाप्रमाणं आता दर ४.२० डॉलर्स/ MMBtu असा निश्चित करण्यात आला. हा अनिल यांना बसलेला पहिला धक्का होता.
जेंव्हा RCom ची स्थापना झाली होती तेंव्हा CDMA (Code Division Multiple Access) हे स्वस्त तंत्रज्ञान वापरलं, त्यानुसार ग्राहकाकडे मोबाइल व त्यातील सिम कार्ड हे दोन्ही RCom चेच असायचे. तर Airtel, Idea सारख्या कंपन्यांनी GSM (Global System Mobile Communication) हे तंत्रज्ञान वापरलं आता CDMA च्या तूलनेत ते महाग होतं. तेंव्हाच्या 2G व 3G साठी CDMA खूप छान होतं, पण तंत्रज्ञानात प्रगती होत जाते, त्याप्रमाणे जग 4G, 5G कडे वाटचाल करत होतं, त्यासाठी CDMA हे उपयुक्त नव्हतं म्हणून ते तग धरू शकलं नाही. २०१५ मध्ये मुकेश यांनी Jio ची स्थापना केली, यामुळं भारतीय दूरसंचार क्षेत्रात क्रांतीच झाली, त्याचा चेहरा-मोहराच बदलला. त्यामुळे R-Com ची अधोगती सुरू झाली.
२०१८ पर्यन्त R-Com ची किंमत ९८% नी घसरली. ज्या कंपनीची किंमत १.६५ लाख कोटी रु. इतकी होती, तिचं मे २०१८ मध्ये दिवाळं निघालं. हा दूसरा धक्का बसला.
यानंतर अनिल यांचे बाकी उद्योग ही एकेक करून डबघाईला आले. कर्जाची रक्कम वाढत चालली होती. २०१४ मध्ये त्यांनी आपली बिग सिनेमाज् ही कंपनी ७१० कोटी रु. ना विकून टाकली. त्यानंतर झी एंटरटेंमेंट ला आपले बिग टीव्ही व बिग एफएम मधले काही भाग/शेअर्स १८७२ कोटी रु. किंमतीला विकले. अभियांत्रिकी/इंजीनीरिंग क्षेत्रातील आपली हुकूमत गाजवण्यासाठी त्यांनी वांद्रे-वरळी समुद्री पूल (सी लिंक) त्याचबरोबर वर्सोवा-घाटकोपर ही मुंबई मधील एकमेव मेट्रो असे मोठे प्रकल्प एकूण खर्चापेक्षा कमी रकमेत पूर्ण केले, पण तेंव्हा दिवस चांगले होते. पण आता सर्व ठिकाणाहून नुकसान होत होते, तरीही आता अनिल यांनी अजिबात अनुभव नसलेल्या संरक्षण क्षेत्रात पाऊल ठेवले.
२०१६ मध्ये Pipavav Marine & Offshore Engineering ही कंपनी विकत घेतली. ही कंपनी आधीच नुकसानीत होती. हा व्यवहार अनिल यांना नुकसानकारक ठरला. २०१९ RNAVAL च्या किंमतीत ९०% ची घसरण पाहायला मिळाली, कंपनीचं मूल्य १ बिलअन् वरुन थेट १०० मिलिअन् डॉलर्स झाली. संसदेमध्ये फ्रांस कडून खरेदी करून नंतर भारतात त्यांचं उत्पादन केलं जाईल त्या रफाएल विमान सौद्याचा खूप गदारोळ झाला, त्यामुळं RNAVAL च्या समस्या अधिकच वाढत गेल्या. कर्जे फेडण्यासाठी अनिल यांनी २०१७ मध्ये Reliance Energy Ltd. नफा मिळवून देणारी कंपनी असून देखील अदानी समूहाला १८००० कोटी रु. ना विकून टाकली.
काही दिवसांपूर्वी प्रकाशात आलेला येस बँकेचा घोटाळा हा सर्वांना माहीत आहे, त्या बँकेकडून अनिल यांनी १२८०० कोटी रुं. चं कर्ज घेतलं होतं. अनिल अंबानी यांच्या मालकीच्या असणार्या कंपन्या दूरसंचार, पायाभूत सुविधा, संरक्षण व वीज उद्योग अशा विविध क्षेत्रातील होत्या, यामुळं त्यांच्यावर झालेल्या ४३,८०० कोटी रु. रकमेचं कर्ज फेडण्यासाठी असमर्थता दर्शवली, त्यांच्या कर्जप्रकरणामुळे त्यांचे बाकी प्रकल्पही रखडले गेले, त्यामध्ये दिल्ली मेट्रो, सिंगरौली मध्यप्रदेश येथील वीज प्रकल्प यांचा समावेश होता.
२०१९ मध्ये एरिक्सन या कंपनीने ४५३ करोड रु. साठी अनिल यांच्यावर दावा लावला, त्यांच्याकडे एकतर पैसे देणे किंवा तुरुंगात जाणे असे दोनच पर्याय होते, तेंव्हा मुकेश त्यांच्या मदतीला धावून आले कारण २०१५ मध्ये त्यांच्यातले वाद-विवाद संपले होते. २०२० मध्ये ही परत तेच झालं, R-Com वर चीनी बँकांची २२०० कोटी रु.ची थकबाकी आहे. आता ते दिवाळखोर झाले आहेत. मुकेश (Mukesh Ambani) यांच्या संपत्तीमध्ये बरेच चढ-उतार पहायला मिळाले, मागच्या आर्थिक वर्षात त्यांच्याकडे निव्वळ संपत्ती होती ४३.१ बिलियन डॉलर्स तर अनिल यांच्याकडे १.७ बिलियन डॉलर्स.
योग्य रणनीतीचा अभाव, अतिआत्मविश्वास, चुकीचं व्यवस्थापन, अति बुद्धीमानीपणा करून अनुभव नसलेल्या क्षेत्रात हात घालणे अशा चुका अनिल अंबानी यांनी केल्या. पर्यायाने मुकेश यांनी मिळालेल्या कंपन्या योग्य सांभाळल्या, त्याच्यासोबत Reliance Market व Jio या नवीन क्षेत्रात नशीब आजमावून ते यशस्वी होताना दिसत आहेत. अनिल यांच्यासारखेच बाकी बरेच नावाजलेले उद्योगपती आता दिवाळखोर आहेत. २०१२ मध्ये R-Com साठी चीनी बँकांकडून स्वतःच्या हमीवर घेतलेले ६८० मिलिअन् डॉलर्स अनिल आता फेडू शकत नाहीत. त्यांची एकमेव फायद्यात असणारी कंपनी Reliance Capital त्याच्यावर ही जागतिक मंदी व कोरोना यांचा परिणाम होत आहे, हे ही दुर्दैवच म्हणावं लागेल.
मुकेश या चढाओढीत पुढे गेले आहेत. त्यांच्यावरही कर्जाचा भार होता, पण आता Jio आणि Facebook ची ४३००० हजार कोटी रु चा करार झाला आहे, मार्च ते जून २०२० या काळात Reliance Industries ने राइट्स इश्यू व Reliance Jio मधील भागीदारी विकून आज मुकेश पूर्णतः कर्जमुक्त झाले असून फोर्ब्सच्या नुसार त्यांची सध्याची निव्वळ संपत्ती ही ६२.४ बिलियन डॉलर्स, तर त्यांच्या प्रगतीचा वेग अजून वाढेल. पण पिछाडीवर असलेल्या अनिल व त्यांच्या अनिल धीरुभाई अंबानी समूहाचं भविष्य काय ? त्यांचे बंधु त्यांना मदत करतात का ? हे आता येणारा काळच ठरवेल.
Kadakk…. Perfectly explained…
Classic information 👌
Happy to see that you have collected all information and written a very good article