Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

पुण्यातील प्रसिद्ध पेठा आणि त्यांच्या नावामागचा माहित नसलेला इतिहास

पुण्यातील पाट्या आणि पुण्यातील पेठा ह्या जगप्रसिद्ध आहेत. या पेठांचा स्वतःचा एक विशिष्ठ इतिहास आहे.

प्रत्येक शहराची स्वतःची अशी एक खासियत असतेच, म्हणजे प्रत्येक शहराची एक स्वतःची अशी संस्कृती असते आणि पुणे तर संस्कृती आणि सभ्यतेचे माहेरघर आहे असं म्हटलं जातं. पुण्यातील पाट्या आणि पुण्यातील पेठा ह्या जगप्रसिद्ध आहेत. जर तुम्हाला जुने वाडे आणि जुनी वास्तुकला बघायची आवड असेल तर तुम्ही पुण्यात नक्कीच चक्कर मारायला हवी. सदाशिव पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ, गुरुवार पेठ, नाना पेठ अशा अनेक पेठा पुण्यात आहेत. या पेठांचा स्वतःचा एक विशिष्ट इतिहास आहे. चला तर मग जाणून घेऊयात या इतिहासाबद्दल….

कसबा पेठ (Kasba Peth)

शिवाजी महाराज पुण्यात येईपर्यंत पुणे हे कसबा पेठेपर्यंतच मर्यादित होतं. त्याकाळी पुण्याची फारच दुरावस्था झाली होती. 1662 रोजी शिवाजी महाराजांनी, जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला असे म्हटले जाते. म्हणजेच पुण्याला परत भरभराटीचे दिवस आणले. याच कसब्यातील लाल महालात शिवाजी महाराजांचे बालपण गेले त्यामुळेच हा लाल महाल आज जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणारं कसबा गणपती मंदिर ह्याच भागात आहे आणि म्हणूनच या पेठेला कसबा पेठ नाव पडलं.

नारायण पेठ (Narayan Peth)

नारायणराव पेशव्यांच्या राजवटीत ही पेठ वसवली गेली होती. 1773 साली या पेठेची स्थापणा केली होती. पुण्यातील महत्वाच्या घडामोडी या पेठेने बघितल्या आहेत. सुप्रसिद्ध केसरीवाडा देखील याच नारायण पेठेत आहे. याच भागात आता पुस्तकाची फार मोठ्या प्रमाणात बाजारपेठ अस्तित्वात आहे. या भागात अनेक पुरातन अशी मंदिरं देखील आहेत.

गंज पेठ/महात्मा फुले पेठ (Ganj Peth/Mahatma Phule Peth)

सवाई माधवराव पेशवे यांनी या गंजपेठेची स्थापना केली. याच पेठेत महात्मा फुले देखील वास्तव्यास होते. अस्पृश्यांची पहिली शाळा देखील महात्मा फुले यांनी याच पेठेत चालू केली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर ह्या पेठेचं नामांतर महात्मा फुले पेठ असं करण्यात आलं. भवानी मार्केट आणि टिंबर मार्केट या पेठेत प्रसिद्ध आहे.

भवानी पेठ (Bhavani Peth)

पूर्वी या भागात बोराची झाडं खूप मोठ्या प्रमाणात होती म्हणूनच या भागाला बोरवन देखील म्हटलं जायचं. पुढे या भागात भवानी मंदिराची स्थापना करण्यात आली आणि त्यामुळे या पेठेला भवानी पेठ असे नाव देण्यात आले. आता या पेठेत हार्डवेअर, टिंबर आणि स्टीलचे मोठे व्यवसाय आहेत. हे व्यवसाय नाना फडणवीस यांनी सुरू केले होते. कालांतराने या व्यवसायांना मोठे स्वरूप प्राप्त झालं आज देखील असे अनेक व्यवसायिक इथे वास्तव्यास आहेत.

Rare photo of Bhavani Peth, Pune

नवापुरा पेठ (Navapura Peth)

जीवन घनशाम यांनी 1788 झाली पेशव्यांकडून नवापुरा पेठ वसवण्याची परवानगी मागितली परंतु परवानगी मिळून देखील काही करणास्तव ते ही पेठ वसवू शकले नाहीत. पुढे माधव रामचंद्र यांनी देखील या भागात पेठ वसवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील अपयश आले. कालांतराने जशी लोकसंख्या वाढू लागली तशी ही पेठ आपोआपच वसत गेली. भवानी पेठेच्या पूर्वेला नवापुरा पेठ वसलेली आहे.

रास्ता पेठ (Rasta Peth)

सरदार आनंदराव लक्ष्मणराव रास्ते यांच्या नावावरून या पेठेला रास्ता पेठ असे नाव देण्यात आले आहे. 1775 साली वसवण्यात आलेल्या या पेठेला आधी शिवपुरी असं नाव देखील देण्यात आलं होतं.

नाना पेठ (Nana Peth)

सध्या पुण्यात ज्या ठिकाणी घरगुती वस्तूंचा बाजार भरवला जातो त्याच भागाला नानापेठ असे म्हणतात. नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर या पेठेला नाना पेठ असे नाव देण्यात आलेले आहे. त्याआधी या पेठेला निहाल पेठ असे म्हटले जाई.

सदाशिव पेठ (Sadashiv Peth)

पुण्याच्या अगदी मध्यभागी वसवलेली पेठ म्हणजे सदाशिव पेठ. एका अर्थाने या पेठेला पुण्याचं हृदय देखील म्हटलं जातं. ह्या पेठेत ब्राम्हण समाज जास्त प्रमाणात वास्तव्यास आहे. पानिपतच्या लढाईत तुफान शौर्य गाजवून वीर मरण प्राप्त केलेल्या सदाशिवराव पेशवे यांच्या नावावरून या पेठेला सदाशिव पेठ असे नाव देण्यात आले आहे.

पुण्यातील असंख्य जुने वाडे येथे आज देखील बघायला मिळतात. या भागात राहणाऱ्या नागरिकांनी स्वतःची एक नवीन शैली तयार केली आहे या शैलीमुळे मराठी मध्ये “सदाशिव पेठी” हे विशेषण तयार झाले आहे. सारसबाग, विश्रामबागवाडा, भारत इतिहास संशोधन मंडळ इत्यादी विविध महत्वाची स्थळं आपल्याला येथे पाहायला मिळतात.

सोमवार पेठ (Somvar Peth)

थोरले बाजीराव पेशवे यांनी सन १७७३ रोजी शहराच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी शाहूपुरा पेठ नव्याने विकसित केली आणि पुनर्बांधणी केलेल्या ह्या पेठेचं नाव सोमवार पेठ ठेवण्यात आलं.

मंगळवार पेठ (Mangalwar Peth)

विविध व्यवसायांमुळे मंगळवार पेठ तशी प्रसिद्ध आहेच. संपूर्ण पेठ एकदा पुरामुळे उध्वस्त झाली होती, पण कालांतराने हि पेठ पुन्हा वसवण्यात आली. येथील जुन्या बाजारामुळे ही पेठ प्रचंड प्रसिद्ध आहे.

बुधवार पेठ (Budhwar Peth)

बुधवार पेठेत पुण्यातील सर्वात प्रसिद्ध असं श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर आहे. याच भागात पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मातेचे मंदिर देखील आहे. ह्या पेठेत अनेक पुरातन मंदिर अस्तित्वात असल्याचे तुम्हाला बघायला मिळेल. बुधवार पेठेत चालणार वेश्याव्यवसाय देखील ख्यातनाम आहे.

Budhwar Peth, Old Pune

शुक्रवार पेठ (Shukravar Peth)

ह्या पेठेचं पूर्वी विसापूर असं नाव होतं. १७३४ साली जिवाजीपंत अण्णा खासगीवले कोतवाल यांनी स्वतः हि पेठ विकसित केली. पेशवे बाळाजी बाजिराव यांच्या सांगण्यावरून विकसित करण्यात आलेल्या भागाचं नामांतर शुक्रवार पेठ करण्यात आलं. १८८५ साली उभारण्यात आलेली मंडई देखील ह्या शुक्रवार पिठेतच आहे.

शनिवार पेठ (Shaniwar Peth)

1730 साली शनिवार वाडा या भागात बांधला गेला. चिमाजी अप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली बांधलेला हा शनिवार वाडा प्रसिद्ध होऊ लागला. थोरले बाजीराव पेशवे हे देखील याच वाड्यात वास्तव्याला होते आणि याच वाड्यावरून या भागाला शनिवार पेठ असे नाव देण्यात आले.

रविवार पेठ (Raviwar Peth)

ह्या पेठेत आधी मलकापूर असं नाव होतं परंतु ह्या भागातील व्यवसाय रविवारी बंद असतात म्हणून पेठेचं नामांतर रविवार पेठ झालं. बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या काळातच हे नामकरण करण्यात आलेलं.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.