Kanhoji Angre : पोर्तुगीज, सिद्दी आणि मुघल ह्या तीनही शत्रुंना शह देणारा मराठ्यांचा समुद्राचा राजा
आलेल्या प्रत्येक शत्रूवर त्यांनी असा विजय मिळवला की शत्रूनेही मराठा आरमाराची कौतुकास्पद दखल घेतली. डच, पोर्तुगीज, मुघल मिळूनही त्यांना हरवू शकले नाही.
ज्याच्या हाती समुद्राची सत्ता त्याच्या हाती जगाची सत्ता; हे वाक्य आपण बरेचदा वाचतो. कोणत्याही राज्याच्या भरभराटीसाठी, संरक्षणासाठी व विस्तारासाठी त्या राज्याच्या सैन्याची समुद्री मार्गावर पकड असणे फार महत्त्वाचे असते. मराठे याला अपवाद नाहीत. इतिहासाच्या पानांवर असे शेकडो वीर आहेत ज्यांनी आपल्या कार्याने येणार्या अनेक पिढ्यांना चकीत करून सोडले आहे. अशाच एका वादळाची कहाणी आज आपण इतिहासाच्या पानांतून उलगडून पाहूया.
दर्या सारंग
कान्होजी आंग्रे हे इतिहासातील एक आदराचे नाव. शिवरायांनी स्वराज्याच्या नौदलाची स्थापना केली आणि पुढे कान्होजींनी याच नौदलातून समुद्रावर खर्या अर्थाने राज्य केले आणि इतिहासात आपले नाव अजरामर केले. तब्बल ४ दशके त्यांनी पश्चिम किनार्यावरील सागरी सत्तेवर स्वत:चा दरारा निर्माण केला आणि आपल्या नौदलाला एका मागून एक विजयाचे नजराणे देऊन महाराष्ट्राच्या नौदलाला अभूतपूर्व उंचीवर नेले.
कान्होजींचा जन्म १६६९ साली झाला. अंबाबाई आणि तुकोजी हे त्यांचे आई-वडील. त्या काळात शिवरायांनी कोंकणात २०० बंदरांवर ताबा मिळविला होता. या २०० बंदरांवर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने शिवरायांनी सुवर्णदुर्गावरील तुकोजी यांना अधिकारी नियुक्त केले. याच किल्ल्यात कान्होजींचा जन्म झाला. कान्होजींनी लहानपणापासूनच आगरी, कोळी अशा समुद्राच्या सतत संपर्कात येणार्या समाजातील मित्रांशी आपले संबंध घट्ट केले आणि त्यांच्याकडून समुद्रात डावपेच करणे, होड्या चालविणे अशा अनेक कला आत्मसात केल्या. याचा फायदा त्यांना आपल्या पुढील कारकिर्दीत झाला.
सुमारे १६८९ पासून Kanhoji Angre मराठ्यांच्या नौदलात सामील झाले. १६९८ मध्ये सातार्याहून आलेल्या आदेशानुसार त्यांना दर्या सारंग किंवा सरखेल या पदावर नियुक्त करण्यात आले. या पदामुळे आता मुंबई ते वेंगुर्ला येथ पर्यंतचा पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आला. या प्रदेशात त्यांनी मराठा आरमाराचा असा दरारा निर्माण केला की त्यांच्या विरुद्ध आलेला प्रत्येक शत्रू पराभूत होऊनच परतला.
कान्होजी आंग्रे यांना समुद्राचा राजा म्हटले जायचे. त्यांच्या कारकिर्दीतील घटना, त्यांनी आखलेल्या योजना, मोहिमा, त्यांचे नियम त्यांच्या महानतेची साक्ष देतात. खालील काही घटनांचा आढावा घेऊन आपल्याही लक्षात येईल की त्यांना समुद्राचा राजा का म्हटले जायचे.
कान्होजी आंग्रे यांना समुद्राचा राजा का म्हटले जायचे ?
नौदलाचे व्यवस्थापन
नौदलात कान्होजींनी आरमाराची अतिशय भक्कम व उत्तम प्रणाली सज्ज केली. आरमार हा शब्द अर्माडा (म्हणजे युद्धात वापरल्या जाणार्या नौका) या पोर्तुगीज शब्दापासून निर्माण झाला आहे. त्यांनी बांधलेल्या नौका मुद्दाम अरूंद आणि उथळ असायच्या, त्यामुळे शत्रूच्या नौकांचा वेगाने पाठलाग करणे आपल्याला सहज शक्य होई.
नौकांवरील तोफा आणि बंदुका सुद्धा अशा तर्हेने बसविल्या होत्या की त्या गरज पडेल तशा कोणत्याही दिशेला फिरविता येतील. याचप्रकारे अनेक वेगळ्या प्रकारच्या नौका सर्व साधन व शस्त्रसाठा घेऊन बंदरांवर तैनात असायच्या. इतकेच नव्हे तर त्यांनी मुंबई ते गोवा मार्गात येणारा प्रत्येक किल्ला, नद्या, जलवाहिन्या आणि बंदरे यांच्याभोवती नौदलाच्या नौका सज्ज करून तसेच भक्कम तटबंदी करून सुरक्षेत भर टाकली.
नौदलात असलेल्या युद्ध नौकांच्या बांधणीच्या उत्तम गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत केले. कान्होजींनी सैनिक आणि खलाशी अतिशय उत्तम, शूर आणि कामास पात्र असतील असेच निवडले. याचबरोबर मराठ्यांच्या नौदलात होकायंत्र, दुर्बीण, सक्षम नौदल अधिकारी, कुशल कामगार व तंत्रज्ञ, सुतार यांच्या गुणवत्तेवर तसेच त्यांच्या हक्कांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले.
सुमारे १७१९ मध्ये पोर्तुगीज, सिद्दी आणि मुघल हे तीनही शत्रू मराठ्यांवर हल्ला करण्यास आले.
Kanhoji Angre यांच्या उत्तम नियोजनाने त्यांना असा धडा शिकविला की, मराठ्यांनी हे तीनही शत्रू पराभूत केले आणि मग इथेच न थांबता त्यांनी याच तिघांचे प्रदेश जिंकण्यास सुरुवात केली.
हे प्रदेश जिंकून पोर्तुगीज, सिद्दी आणि मुघलांना कर लादला आणि त्यांना जेरीस आणून तो कर वसूल देखील केला.
अष्टागार
अष्टागार हा कान्होजींच्या नौदल व्यवस्थापनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हे अष्टागार म्हणजे ८ आगरांच्या सीमा एकमेकांना जोडल्या गेलेल्या होत्या. यामध्ये अलिबाग, थळ, चौल, नागाव, सखर, ससावणे, अक्षी आणि किहीम असे एकूण ८ आगार समाविष्ट आहेत. हे मराठ्यांचे एक भक्कम कवच होते आणि या ठिकाणी आपले आरमार देखील कायम युद्धासाठी सज्ज केलेले होते. हे अष्टागार स्वराज्यात अबाधित राहावे म्हणून कान्होजींनी शत्रूंना कडवा प्रतिकार केला. सिद्दी, पोर्तुगीज, मुघल यांनी अनेकवेळा हे प्रदेश हिसकावण्याचे प्रयत्न केले परंतु, मराठ्यांनी सर्वांना पळता समुद्र थोडा केला.
Kanhoji Angre यांच्या अधिपत्याखाली मराठा नौदल सर्वोच्च का होते ?
- मराठा नौदलाला खरे नावलौकिक, मराठा नौदलाचा दरारा हा कान्होजी आंग्रे यांच्या अधिपत्याखाली मिळाला. त्याची कारणे देखील महत्त्वपूर्ण आहेत, ती अशी:सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मराठा नौदलात कान्होजींनी अतिशय कुशल सैनिकांची भरती केली होती. यासोबतच कोळी समाजातून मोठ्या प्रमाणात सैनिक घेतले जायचे कारण ते समुद्राच्या सतत जवळ असून त्यांना समुद्रातील दिशा, डावपेच, रस्ते यांची माहिती असते.
- मराठा आरमार आधुनिक शस्त्र आणि यंत्रांनी सज्ज असण्यावर जास्त भर दिला गेला. दुर्बीण, होकायंत्र यांसारखी आधुनिक यंत्र आणून त्यांनी आरमाराला अद्ययावत केले. कान्होजी स्वत: त्यांच्या आरमारावरील तोफा बनवत असे.
- समुद्रातील दिशा, रस्ते, वेगवेगळे डावपेच तसेच आसपासच्या प्रदेशांचे उत्तम भौगोलिक ज्ञान स्वत: कान्होजींना होते.
- नौदलात वापरण्यात येणार्या प्रत्येक प्रकारच्या नौकांच्या बांधणीवर कान्होजी स्वत: लक्ष द्यायचे. अतिशय उत्तम कारागीर, उच्च प्रतीची सामुग्री वापरण्यावर त्यांचा आग्रह होता.
- कान्होजींच्या अधिकार क्षेत्रात येणार्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्व किल्ले, बंदरे आणि महत्त्वाची ठिकाणे त्यांनी अतिशय कडक बंदोबस्तात सुरक्षित केली होती.
- कान्होजींनी स्वतःचे आरमार बनवण्याचे कारखाने स्थापन केले. अलीबाग, साखरखडी, कुलाबा, सुवर्णदुर्ग अशा अनेक ठिकाणी हे कारखाने होते. याचप्रकारे अशी अनेक कारणे कान्होजींचे नौदल सर्वोत्तम का होते हे दर्शवितात.
समुद्राचा खरा राजा
शिवरायांनी दूरदृष्टी ठेऊन मराठ्यांच्या आरमाराची स्थापना केली. कान्होजींनी शिवरायांचा आदर्श घेऊन हेच आरमार जगात दखल घेतली जाईल अशा दर्जाचे केले. विविध प्रकारच्या युद्धनौका, अद्ययावत शस्त्र आणि सुविधा, कुशल कारागीर, भक्कम तटबंदी, सुयोग्य नियोजन, विविध युद्ध कौशल्ये आणि प्रकार इत्यादी गोष्टी मराठा आरमाराला आदर्श बनवितात.
कान्होजींनी ज्या प्रकारे आरमार सुधारले त्याचप्रकारे काही प्रदेशांत शिक्षणावर सुद्धा भर देऊन लागेल ती तरतूद केली. मराठ्यांचा किनारपट्टीचा विस्तार करून व्यापारामध्ये बढत शक्य केली. गुन्हेगारांना योग्य त्या शिक्षांचा अंमल करून आपली शिस्त कायम ठेवली. अतिशय उत्तम दर्जाची गुप्तहेर व्यवस्था स्थापन केली.
इतकेच नव्हे तर कान्होजींनी टाकसाळाचे कंत्राट मिळवून अलिबाग येथे स्वतःचे टाकसाळ सुद्धा सुरू केले. आलेल्या प्रत्येक शत्रूला असा प्रतिकार केला आणि असा विजय मिळविला की शत्रूनेही मराठा आरमाराची कौतुकास्पद दखल घेतली. ४ जुलै १७२९ रोजी पोटशूळाने कान्होजींचा मृत्यू झाला. कान्होजींनी एक सशक्त आरमार उभे केले आणि त्यांच्या कार्याची भारताबाहेर सुद्धा दखल घेतली गेली. शिवरायांनी जे उभे केले कान्होजींनी त्याचे सोने केले.
१५ सप्टेंबर १९५१ रोजी भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे नामकरण आय.एन.एस आंग्रे (INS Angre) असे करण्यात आले.
याच कान्होजींना मानवंदना म्हणून अलिबाग येथे त्यांची समाधी बांधण्यात आली. एप्रिल १९९९ साली भारतीय टपाल खात्याने कान्होजींना आदरांजली म्हणून तीन रुपयांचे टपाल तिकीट जारी केले आणि त्यावर मराठ्यांच्या युद्धनौकेचे चित्र सुद्धा आहे. याचप्रमाणे, खांदेरी बेटावरील दीपगृहाचे नामकरण आता कान्होजी आंग्रे दीपगृह असे करण्यात आले. कान्होजी आंग्रे स्वतःला समुद्राचा राजा असे संबोधत असत, त्यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यास आपल्याला देखील हे तंतोतंत जाणवते आणि मुखातून हेच शब्द येतात की, “हाच खरा समुद्राचा राजा होय.”
लेखनाचे संदर्भ:
१) अर्लि करियर ऑफ कान्होजी आंग्रीया अँड अदर पेपर्स, सुरेन्द्र नाथ सेन, प्रकाशक: कलकत्ता विद्यापीठ, १९४१
२) मराठी रियासत खंड १
३) कान्होजी आंग्रे रिसर्च पेपर