Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

जेव्हा चवताळलेल्या अनिल कुंबळेने जबडा तुटलेला असतानाही बँडेज बांधून बॉलिंग केलेली

वेस्ट इंडिजच्या डील्लनचा एक बॉल अनिलच्या जबड्यावर आदळला. एक्स रे काढण्यात आला आणि त्यात जबड्याला फ्रॅक्चर असल्याचं दिसलं!

क्रिकेट हा खेळ अगदी जगदविख्यात ! लहानथोर सगळ्यांच्याच आवडीचा ! केवळ आवडीचाच नव्हे तर अगदी जीव ओतून तो बघणारे, प्रसंगी “शाब्बास”, “व्वा”, भले “अरे अरे मूर्खा”, “असं कशाला केलंस”, अशा अनेक अति उत्साही कमेंट्स करणारा प्रेक्षकवर्ग लाभलेला हा खेळ खरंच नशीबवान !

इतर कुठल्याच खेळाच्या नशिबी एवढं अफाट प्रेम, एवढी अलोट लोकप्रियता आली नसावी ! नाही म्हणायला फुटबॉल या खेळाचं प्रस्थही मोठं आहे. परंतु गल्ली बोळात खेळलं जाणारं क्रिकेट हे त्याच्या या वैशिष्ट्यामुळेही वेगळं ठरतं !

इंग्रजांनी क्रिकेटला भारतात आणलं. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत क्रिकेटची लोकप्रियता टिकून आहे; किंबहुना ती वाढतेच आहे. अगदी टेस्ट मॅचेस असोत, वन डेज असोत की आजचं IPL असो…क्रिकेट या प्रकारात मोडणाऱ्या या प्रत्येकाचा थाट वेगळा, शान वेगळी, रुबाब वेगळा !

कुणीही उठावं आणि क्रिकेट खेळावं एवढा हा खेळ जनमानसांत रुजला आहे. अगदी नव्वदीच्या पार गेलेल्यांनी देखील दातांच्या कवळ्या सांभाळत, जोरजोरात आरडाओरडा करत, जल्लोष करत बघावा असा हा अगदी तनामनात रुतून बसलेला खेळ आहे.

अर्थात आपल्याला एखादा खेळ आवडतो म्हणजे काय तर तो खेळ खेळणारे खेळाडू आपल्याला आवडत असतात. भारतासारख्या देशात, जिथे संवेदना, भावभावना याचा उत्कट साक्षात्कार वेळोवेळी बघायला मिळतो, अशा ठिकाणी हे क्रिकेटर्स म्हणजे जणू देवच !

हिरो-हिरॉइन्सना जेव्हढं ग्लॅमर लाभलं आहे, तेवढंच किंवा त्याहून काकणभर जास्तच ग्लॅमर या क्रिकेटवीरांना लाभलंय. मग हे क्रिकेटवीर कुठल्याही देशाचे का असेना, त्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं.

लोकांचं बॅट्समनच्या प्रत्येक फटक्यावर प्रेम असतं, बॉलरने घेतलेल्या प्रत्येक विकेटवर प्रेम असतं. एवढंच नव्हे तर या क्रिकेटर्सच्या लकबी, त्यांची प्रत्येक सवय, त्यांचं बोलण्याचं टोनिंग कॅमेऱ्यात जसं कैद केल्या जातं तसंच ते फॅन्सच्या मनातही कैद होत जातं.

आणि अशातच आपल्या आवडत्या खेळाडूला तिकडे खेळताना गंभीर दुखापत झाली तर इकडे फॅन्सच्या हृदयाचे ठोके चुकतात. तो खेळाडू जर भारतीय असेल तर भारतीय अस्वस्थता बघायलाच नको !

२००२ मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या टेस्ट मॅचच्या दरम्यान अशीच एक घटना घडली. टेस्ट मॅचचा तिसरा दिवस होता. अनिल कुंबळे बॅटिंग करत होता. जरी तो बॉलर असला तरी बॅटिंग करायला जाणं नियमाप्रमाणे भाग होतं.

वेस्ट इंडिज कडून डील्लनचा एक बॉल येऊन तो अनिलच्या जबड्यावर आदळला. खेळ म्हटलं की लागणं, जखमा होणं हे आलंच. अनिलनेही त्यावेळी या गोष्टीला गांभीर्याने घेतलं नाही. अगदी पहिल्या एक्स-रे च्या रिपोर्टमधेही काहीही दिसलं नाही.

anil kumble stats, Anil Kumble broken jaw story, anil kumble bowling, anil kumble Antigua test, fractured jaw, indian cricketer, अनिल कुंबळे माहिती, अनिल कुंबळे अँटिग्वा टेस्ट मॅच, तुटलेला जबडा, क्रिकेट, cricket kisse

त्यामुळे केवळ दुखणं असेल असं समजून ही गोष्ट दुर्लक्षिल्या गेली. म्हणायला केवळ एक ‘साधा बॉल’ असणारी ही गोष्ट मुळात अतिशय टणक असते. लेदर, लाकूड अशा कठीण गोष्टींनी बनलेला हा बॉल अत्यंत कडक असतो.

डोक्यावर याचा जोराचा फटका बसला तर ते जीवावरही बेतू शकतं. आणि असा हा लेदरचा कडक गोळा अनिलच्या जबड्यावर आदळला होता.

दुखणं असह्य झाल्याने दुसरा एक्स रे काढण्यात आला. आणि त्यात जबड्याला फ्रॅक्चर असल्याचं दिसलं! अनिल कुंबळे सारखा दिग्गज, होतकरू बॉलर खेळणार नाही म्हटल्यावर भारतीय टीमचं निराश होणं स्वाभाविक होतं.

परंतु Anil Kumble ला बसून राहणं मंजूर नव्हतं. कारण वेस्ट इंडिजचे ब्रायन लारा, हुपर, चंद्रपॉल सारखे पक्के बॅट्समन टिपणं अजून बाकी होतं. आत्यंतिक वेदना व प्रतिस्पर्धी टीमचा बळी मिळत नाहीये म्हटल्यावरचा राग अनिलच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

इतक्या प्राणांतिक वेदना होत असतानाही केवळ आणि केवळ देशासाठी खेळणं म्हणजे खरंच हॅट्स ऑफ ! अनिलला वेस्ट इंडिजमध्ये शस्त्रक्रिया करवून घेणं जमण्यासारखं होतं, ते सोपंही होतं. परंतु त्याला भारतात परतूनच शस्त्रक्रिया करवून घ्यायची होती. आणि त्याआधी तो वेस्ट इंडिजचा बळी मिळवण्याचा प्रयत्न करणार होता.

टीमचा फिजिओथेरपिस्ट अँड्र्यू लिपसकडून भलंमोठं बँडेज बांधून घेऊन हा बहाद्दर मैदानावर उतरला. सलग १४ ओव्हर्स खेळून त्याने टीमसाठी अत्यंत महत्वाचा असा ब्रायन लाराचा बळी मिळवला. त्याच्या सुजलेल्या दुखऱ्या चेहऱ्यावर समाधान दिसलं !!

त्याच्या या बाण्यावर भारतीय जनतेने त्याला डोक्यावर घेतलं नसेल तर नवलच !!

केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही अनिल एक साधं, शांत व्यक्तिमत्त्व आहे. त्याच्यातल्या गुणांमुळे त्याचं वेगळेपण सिद्ध होतं. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी जिंकवून देणं त्याच्या नावावर आहे.

कसोटीत एका डावात १० बळी घेणारा तो भारताचा पहिला तर जगातला दुसरा खेळाडू आहे. २००८ मध्ये कसोटीत ६०० बळी मिळवणारा Anil Kumble हा जगातला तिसरा खेळाडू बनला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही अनिल सक्रिय आहे. २०१० मध्ये कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अनिल कुंबळे हे होते तर २०१६ मध्ये भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदीही अनिलच होते. IPL च्या १३ व्या सिझनचा पंजाबचा मुख्य प्रशिक्षकही अनिलच आहे.

anil kumble stats, Anil Kumble broken jaw story, anil kumble bowling, anil kumble Antigua test, fractured jaw, indian cricketer, अनिल कुंबळे माहिती, अनिल कुंबळे अँटिग्वा टेस्ट मॅच, तुटलेला जबडा, क्रिकेट, cricket kisse

एक खेळाडू जेव्हा त्याच्या खेळण्याच्या क्षमतेसोबतच इतर गुणांतही सिद्ध होतो, तेव्हा त्याला योग्य सन्मान, यथोचित मान आपोआपच मिळत जातो. दुखऱ्या जबड्यासह खेळणं कठीण होतं, त्यात प्रतिस्पर्धी टीमचा बळी मिळवणं महाकठीण होतं.

परंतु ते अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी केलं व त्यांचं वेगळेपण आपोआप सिद्ध झालं.. ज्यायोगे त्यांना जनमानसांत प्रेमासोबतच एक वेगळी प्रतिष्ठा लाभली, एक निराळा आदर लाभला ज्याचे ते मानकरी होते !!

Leave A Reply

Your email address will not be published.