Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

टाटांनी भारतीय सैन्याला अशा गाड्या दिल्या आहेत की ज्यांना बॉम्बस्फोटात सुद्धा काही होणार नाही.

आपण घरात शांत झोपतो कारण तिकडे सैनिक टक्क जागे राहून सीमांचं रक्षण करत असतात. हे वाक्याबाबत कुणाचंच दुमत नसेल. अशी अभिमानस्पद कामगिरी करणाऱ्या सैनिकांना वीरमरण येणं आणि त्यांना बंदुकांची सलामी देऊन त्याना निरोप देणं हे खूपच दुखःदायक असतं. भारतीय सैन्यावर (Indian army) शत्रूंकडून खासकरून पाकी अतिरेक्यांकडून असे आकस्मिक हल्ले झालेले आहेत, आणि त्यातच आपल्या शूर वीर देशबंधूंना वीरगती प्राप्त झालेली आहे. आपल्याकडे त्यांच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक शस्त्रात्रे आहेत, बुलेटप्रूफ जॅकेट आहेत, परंतु स्फोटापासून रक्षण करणारी वाहने नव्हती. देशाला हरेक संकटातून बाहेर काढणाऱ्या भारतीय सैन्याचा संकटमोचक होण्याचं काम टाटा मोटर्सने केलेलं आहे.  

काय आहे क्यू.आर.एफ.व्ही.?

भारतीय सैन्य दलाच्या क्षमतांना बळ देण्यासाठी, टाटा समूहाच्या एरोस्पेस आणि डिफेन्स आर्म असणाऱ्या टाटा अॅडव्हांस सिस्टम लिमिटेड (Tata Advanced Systems Limited-TASL) ने भारतीय सैन्याला स्वदेशी बनावटीची जी वाहने दिली आहेत, त्यांना क्विक रिअॅक्शन फायटिंग व्हेईकल-मीडियम (QRFV) असं म्हणलं जातं. ही प्रगत वाहने भविष्यातील संघर्ष आणि युद्धासारख्या परिस्थितीत भारतीय सैन्याच्या कार्यक्षमता वाढवतील. क्विक रिअ‍ॅक्शन फायटिंग व्हेईकलच्या समावेशामुळे भारतीय लष्कराला बळकटी आली, तसेच भारत सरकारने देशात संरक्षण उपकरणे विकसित करण्यासाठी आणि निर्मितीसाठी घेतलेले अनेक उपक्रम विस्ताराच्या योग्य मार्गावर आहेत, हे ही समजलं.

क्विक रिअ‍ॅक्शन फोर्स ही काय भानगड आहे?

हे तर याच्या अगदी नावाप्रमाणेच काम करणाऱ्या लष्करी तुकडीला कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीजन्य परिस्थितीला साधारणत: दहा मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत प्रतिसाद देण्यासाठी सज्ज असणे आवश्यक आहे. क्विक रिअॅक्शन फोर्स ही लष्करी विज्ञानामधील एक अशी संकल्पना आहे ज्यात एक सशस्त्र लष्करी तुकडी असते, जी मदतीची आवश्यकता असलेल्या सहयोगी तुकड्यांना मदत करण्यासाठी आणि विपरीत परिस्थितीमध्ये वेगाने प्रतिसाद देण्यास सक्षम आहे.

क्यू.आर. एफ. व्ही.ची वैशिष्ट्ये काय आहेत?

या क्विक रिअॅक्शन फायटिंग व्हेईकल हे खाण संरक्षणासह चिलखती कर्मचारी वाहक आहे. हे वाहन ४X४ कॉन्फिगरेशनमध्ये येते. म्हणजे आपल्या सर्वसाधारण चारचाकी गाड्या असतात त्यांच्या दोनच चाकांना खेचण्याची शक्ती इंजीनकडून प्राप्त होते. पण इथे चारही चाके इंजिन कडून खेचली जातात. क्विक रिअॅक्शन फायटिंग व्हेईकल हे माइन-प्रूफ ट्रूप ट्रान्सपोर्ट व्हेईकल म्हणून विकसित केले गेले आहे. म्हणजे या वाहनाच्या खाली भूसुरुंगाचा स्फोट जरी झाला तरी याला काहीही होणार नाही. टाटा दावा करते की त्यांची ही वाहने १४ किलो आणि २१ किलो स्फोटकांपासून चतुर्थ स्तरीय संरक्षण देते. 

सहा गिअर असणाऱ्या या वाहनाला टर्बोडिझेल इंजिन असून त्याची क्षमता २४० एचपी इतकी आहे. लांबीला २१ फूट आणि ८ फूट रुंदी असणाऱ्या या वाहनाला रन-फ्लॅट टायर बसवले आहेत. या टायरची खास गोष्ट म्हणजे हे पंक्चर जरी झाले तरी गाडी चालण्यासाठी काहीच अडचण येत नाही. याचं वजन १४ टन इतकं असून हे वाहन कमांडर आणि ड्रायव्हरसह १४ जणांना व एकूण २ टन वजन वाहून नेऊ शकते. याची जमिनी पासूनची उंची म्हणजेच ग्राऊंड क्लिअरन्स ३१५ मिमी आहे, याचा फायदा असा होतो की सपाट पृष्ठभागासह खाच खळग्यांमधून जाताना हे वाहन सहज प्रवास करेल. याचा वेगही तसाच आहे, इतकं अवजड असूनही ८० किमी/ तास या वेगाने हे वाहन जाऊ शकेल.

तसेच स्फोट झाल्यावर विषारी वायू हवेत पसरला जातो. म्हणून जवानांना असे एअर फिल्टर असणारे मास्क घालावे लागतात. त्याचीही काळजी इथे घेतली गेली आहे. या वाहनाला फिल्टर बसवले आहेत, ज्यातून विषारी वायू वाहनाच्या आत येऊ शकत नाही. हवा फिल्टर होऊनच आत जाते. म्हणजे एअर फिल्टर मास्कचीही आवश्यकता नाही.

ही वाहने बुलेट प्रुफ ही आहेत. जवळपास १० मी अंतरावरून जरी या गाडीवर गोळ्या चालवल्या तरीही याला काहीही होत नाही. जिथे सैनिक बसतील तिथल्या भागाचं आच्छादन बनवण्यासाठी वापरलेला पत्रा एकसंध आहे, तो कुठेही जोडलेला नाही. इथेच १० बंदुका बसवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर याच्या वरच्या भागात एक मशीन गनही बसवलेली आहे. ती ३६० अंशात फिरून आपलं लक्ष्य वेधू शकते. त्याला कव्हरही बसवलेलं आहे. मागून दरवाजे बसवलेले आहेत. इथं हा विचार केला आहे की वरून कव्हरींग फायर केलं तरी तोवर गाडीतील सर्व सैनिक मागल्या बाजूने उतरून हल्ला करू शकतात.

त्याचबरोबर याला सॅटेलाइट कम्युनिकेशन अर्थात उपग्रहाद्वारे संभाषण करण्याची सुविधा देण्यात आली आहे. कारण युद्धजन्य परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी नेटवर्कची अडचण होते आणि निरोप पोहोचवता येत नाहीत. या वाहनांना थर्मल कॅमेरा बसवण्यात आला आहे. जिवंत व्यक्तींच्या हालचाली त्यांच्या शारीरिक तापमानावरुन टिपणं थर्मल कॅमेऱ्याचं काम आहे. तसेच नाईट व्हिजन कॅमेराही बसवलेला असल्याने अंधारातही कारवाई करणं अवघड नाही. त्यामुळे कुठेही लपलेल्या शत्रूचा खात्मा सहज शक्य होतो. 

भारतालाच नव्हे परदेशातही पुरवठा

टाटाने भारतीय सैन्यासाठी तर या वाहनांची निर्मिती पुण्यात सुरू केलीच आहे. गलवान खोऱ्यात ही वाहने पाठवून दिलीच पण त्याच बरोबर संयुक्त राष्ट्रांची (United Nations) जी शंतीसेना आफ्रिकेमध्ये कार्यरत आहे, तिच्या मदतीसाठी सुदान मध्ये ही या दोन वाहनांची निर्यात करण्यात आली आहे.

स्वदेशी बनावटीची अशी वाहने मिळाल्यामुळे आपल्या देशाला दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्याची गरज आता उरली नाही. जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यापैकी एक असणारं भारतीय आता अजून शक्तिशाली बनलं आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.