मशाल उद्धव ठाकरेंची राजकीय वाटचाल उजळवणार?

राज्याच्या राजकारणात मोठं बंड झाल्यापासून उद्धव ठाकरे यांची परिस्थिती राजकीय दृष्टीकोनातून काहीशी अवघड होत गेली आहे.एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने सत्ता तर स्थापन केलीच. त्याचबरोबर आमचीच ‘शिवसेना’ (Shivsena) मूळ असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे (Election Commission of India) गेलं आणि त्यांनी ‘धनुष्यबाण ‘ हे चिन्ह गोठवून टाकलं. आता अंधेरी विधानसभा जागेची पोटनिवडणूक तोंडावर आलेली आहे. ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नवं नाव देण्यात आलं. त्याचबरोबर दोन्ही गटांनी चिन्हांसाठी सादर केलेल्या पर्यायांमधून आधी ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह मिळालं. शिंदे गटाने जे पर्याय सोपवले होते, ते उपलब्ध नसल्याने पुन्हा मागवलेल्या नवीन पर्यायांमधून त्यांना ‘ढाल – तलवार’ देण्यात आलं आहे. या पोटनिवडणुकीत हे नवं चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान दोन्ही गटांना असणार आहे. पण उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आलेल्या ‘मशाल’ या चिन्हाचा त्यांच्या पक्षाला फायदा होऊ शकेल? हेच आपण पाहूयात.
आणि ठाकरेंना मिळाली मशाल
धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह जाणार याची मानसिक तयारी उद्धव ठाकरे यांनी फार आधीच केली असावी. मागेच त्यांनी धनुष्यबाण या व्यतिरिक्त अन्य चिन्हाची तयारी ठेवा असं जाहीर भाष्य केलच होतं. जेव्हा धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवलं तेव्हा बाकी जणांना आश्चर्य वाटलं पण ठाकरे गट आधीपासूनच तयार होता. निवडणूक आयोगाने जेव्हा दोन्ही गटांकडे चिन्हासाठी पर्याय मागवले होते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी उगवता सूर्य, त्रिशूल आणि मशाल हे पर्याय दिले होते. त्याचबरोबर शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळावं, अशीही मागणीही ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्या तीन पर्यायातील मशाल हा पर्याय आयोगाने त्यांना दिला. आयोगाने नावाच्या बाबतीतही त्यांची मागणी मान्य केली नाही. ‘मशाल’ चिन्ह मिळाल्यावर ठाकरे गटाने जल्लोष केला.
मशाल ठरू शकते फायदेशीर

उगवता सूर्य, त्रिशूल आणि मशाल हे तिन्ही पर्याय ठाकरे गटाकडून अतिशय विचारपूर्वक देण्यात आले होते. त्यातील ही मशाल चिन्ह मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला फायदा होऊ शकतो. यामागचं कारण पाहण्यासाठी आपल्याला भूतकाळात जावं लागेल. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा पेटला होता. मुंबई ही महाराष्ट्राचीच यासाठी जोरदार आंदोलने होत होती. महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, कला अशा क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्वांनी या लढ्यात सक्रीय सहभाग घेतला होता. केशव सीताराम अर्थात प्रबोधनकार ठाकरे हेही या लढ्यात अग्रभागी होते. त्यांनी आपल्या शब्दांनी या लढ्याला धारदार बनवलं. त्याच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं प्रतिक म्हणजे ही धगधगती मशाल. या जाज्वल्य इतिहासाची पार्श्वभूमी सांगत मतदारांनी आपल्या पारड्यात मतांचं दान द्यावं, हे आवाहन उद्धव ठाकरेंकडून केलं जाऊ शकतं.
मराठीचा मुद्दा
येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हातात घेताना दिसतील. सेनेची सुरुवात मराठी अस्मितेवरून झाली होती. भाजपसारखा मोठा विरोधक जरी असला तरी भाजपमध्ये गुजराती नेत्यांचं वर्चस्व आहे. गुजराती लोकांचं भलं व्हावं यासाठीच भाजप सदैव प्रयत्नशील असतो. म्हणून बऱ्याच खाजगी कंपन्या, सरकारी संस्था, कार्यालये ही महाराष्ट्रातून गुजरातला हलवली, हा महाराष्ट्रावर केला जाणारा अन्याय आहे. हे शिवसेना आता वरचेवर म्हणत आहे. फॉक्सकॉन प्रकरण ताजं आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मुद्दयाचं भांडवल ठकारे गटाकडून नक्कीच केलं जाऊ शकतं.
मशाल ही जुनी सोबती
उद्धव ठाकरे गटाला आता जरी निवडणूक आयोगाकडून मशाल हे चिन्ह नव्याने मिळालं असेल तरीही सेनेची मशालीशी असणारी सोबत जुनीच आहे. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या काळातही सेनेने मशाल हाती धरली होती. हा काल तेव्हाचा आहे जेव्हा सेना ही एक संघटना होती अजून एक राजकीय पक्ष म्हणून सेनेला मान्यता मिळाली नव्हती. म्हणून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेला वेगवेगळी चिन्हे मिळाली त्यापैकी उगवता सूर्य, रेल्वे इंजिन आणि मशालही होती. मशाल हे चिन्ह घेऊन बाळासाहेबांच्या नेतृत्वात सुरुवातीच्या निवडणुकांमध्ये सेनेने विजय मिळवला आहे. जेव्हा छगन भुजबळ (Chagan Bhujbal) १९८५ पहिल्यांदा सेनेचे आमदार म्हणून विधानसभेत गेले ते मशाल याच चिन्हावर. म्हणून मशाल हे सेनेसाठी केवळ चिन्ह नसून शुभ चिन्ह आहे असंचं म्हणायला पाहिजे.
एकूणच काय तर मशाल या चिन्हामुळे उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह खूपच वाढलेला आहे. मशाल या चिन्हासह आपली विजयाची परंपरा शिवसेना राखेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.