आणि मुख्यमंत्र्याने स्वतःच्या अंगातील शर्ट काढून कार्यकर्त्याला देऊन टाकला !
ज्यावेळी विषय राजकारणाचा असतो त्यावेळी महाराष्ट्र नेहमीच नवा आदर्श घालून देत आलाय.
आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात चढउतार हे येतच असतात. आणि त्यातल्या त्यात राजकारण म्हंटलं की यश अपयश हे आलंच. अपयश आल्यानंतर जसं खचून जायचं नसतं. अगदी त्याचप्रमाणे यश मिळाल्यावर हुरळूनही जायचं नसतं.
आपण ज्यांच्या सहकार्याने विजयापर्यंत पोहचलो किंबहुना ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करत आपल्याला निवडून आणलं, त्यांना मात्र कधीच विसरायचं नसतं.
सध्याची राजकीय स्थिती पाहिली तर पूर्वीच्या राजकारण्यांसारखा कार्यकर्त्यांप्रतीचा प्रेम, जिव्हाळा आजकाल फारसा पाहायला मिळत नाही. पाहायला मिळतो तो फक्त स्वार्थ, निवडणूक जिंकण्यापुरतीचा.
मात्र ज्यावेळी विषय राजकारणाचा असतो त्यावेळी महाराष्ट्र नेहमीच नवा आदर्श घालून देत असतो. मी हे असं का म्हणतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. चला तर मग जराही विलंब न करता तुमच्या प्रश्नाचं उत्तरही जाणून घ्या.
‘वसंतदादा पाटील’ यांचा जन्म आणि पार्श्वभूमी
१९६० साली संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून या वैभवशाली महाराष्ट्राच्या उभारणीत अनेक नेत्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. यातील काही नेत्यांचे योगदान इतके भरीव होते की आजही महाराष्ट्र त्याची फळे चाखत आहे.
अशाच भरीव योगदान देण्याऱ्या नेत्यांपैकी एक म्हणेज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील. सांगलीतील मिरजेत १३ नोव्हेंबर १९१७ साली जन्माला आलेले वसंतदादा म्हणजे स्वातंत्र्य चळवळीतून तयार झालेले एक उमदा नेतृत्व.
वसंत दादा म्हणजे निडर, लढवैये, कधीही जिवाची पर्वा न करता इंग्रजांविरुद्ध संघर्ष करणारे. त्यांच्या याच संघर्षामुळेच लोक त्यांच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहत.
स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक असलेले वसंत दादा पुढे राजकारणातही सक्रिय झाले. प्रगतीशील दृष्टिकोन आणि सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणाऱ्या वसंतदादांनी १९७७ ते १९८५ या कालखंडात दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले.
मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळतच आपल्या कार्यकर्तृत्वाची चुणूक दाखवत वसंतदादांनी सहकार, शेती, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रांत अतिशय भरीव काम केले. सहकाराच्या माध्यमातून विविध संस्थांचे जाळे उभारत महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने एक संस्थात्मक राज्य बनवण्याचे काम वसंतदादांनी केले.
कार्यकर्त्यांनी भरलेला ट्रक गावाहून थेट वसंतदादांच्या बंगल्यावर
वसंतदादा जेवढे विकासाभिमुख होते, तेवढेच ते लोकाभिमुख देखील होते. आपल्या जनतेची, कार्यकर्त्यांची ते अगदी पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेत. लोकांनी हाक दिली आणि वसंतदादा त्यांच्या हाकेला धावले नाही, असं कधी झालंच नाही. म्हणूनच कार्यकर्ते असो वा जनता दोघेही त्यांच्यावर मनापासून प्रेम करायचे.
एकदा झालं असं की वसंत दादा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भरलेला एक ट्रक विजयाच्या घोषणा देत त्यांचे अभिनंदन करायला मुंबईकडे निघाला होता. तेवढ्यातच फाटकी बंडी आणि मळकं धोतर घातलेला एक माणूस ट्रकच्या दिशेने धावला आणि हातवारे करत विचारु लागला.
“काय रं कुठं चालला समदी”. तेवढ्यात ट्रकमधून एकजण उत्तरला “आरं आपले दादा मुख्यमंत्री झाल्यात, त्यांनाच भेटायला चालोय मुंबईला”.
“काय सांगतो, दादा मुख्यमंत्री झाल्यात. चल मग म्या भी येतो”, असं म्हणत तो फाटकी बंडी आणि मळकं धोतर घातलेला माणूस मुंबई जायला ट्रकमध्ये चढू लागला.
त्याचे असे कपडे बघून ट्रकमधला व्यक्ती पुन्हा बोलली “आरं पण तुझ्या अंगावर ही रानातली कापडं हायती”.
यावर “त्याला काय हुतंय, आपल्याला दादास्नीच भेटायचं हाय. दादा आपलंच हायती” असं म्हणत तो थेट ट्रकमध्ये जाऊन बसला.
कार्यकर्त्यांवर जीव ओवाळून टाकणारे ‘वसंतदादा’
शेकडो मैल प्रवास करुन ट्रक मुंबईला वसंत दादांच्या बंगल्यावर पोहचला. दादा घरी नसल्याने सारी मंडळी वाट पाहत बैठकीच्या खोलीत बसली होती. काही वेळातच दादा आले. आणि खोलीत शिरताच क्षणी त्यांची नजर नुसत्या बंडीवर आलेल्या आपल्या कार्यकर्त्याकडे गेले.
वसंत दादांनी आश्चर्यचकित होतं विचारलं “काय रं हरिबा असा कसा आलायस, शर्ट कुठे तुझा”.
यावर हरिबा उत्तराला “तुम्ही मुख्यमंत्री झाल्याचं रस्त्यात कळलं. आता कवा घरी जावू, कवा कापडं घालू ? तवर ही माणसं निघून आली असती. म्हणून हाय तसाच आलू”.
आपल्या कार्यकर्त्याचं हे निस्सीम प्रेम पाहून वसंत दादा अक्षरशः गहिवरले. त्यांनी लगेचच तिथल्या तिथे स्वतःच्या अंगातील शर्ट काढून हरिबाला दिला आणि आत जाऊन स्वतः दुसरा शर्ट घातला.
एका नेत्या आणि कार्यकर्त्यामधील हे नातं बापलेकाच्या नात्यापेक्षा मुळीच कमी नव्हतं. आपल्या कार्यकर्त्याला मुलाप्रमाणे वागवणारे वसंतदादा आजही लोकांच्या स्मरणात आहेत, ते त्यांच्या याच स्वभावामुळे.
आज राजकारणात कार्यकर्त्यांप्रतीचा हा जिव्हाळा आणि प्रेम फारसा पाहायला मिळत नाही. कारण वसंतदादा पाटलांसारखं नेतृत्व सध्या कुठे दिसत नाही.
वसंतदादांच्या साधेपणाचे आणि निखळ प्रेमाचे असे बरेच किस्से आहेत. पण त्यातले काही सुद्धा या एका लेखात सामावणे म्हणजे अथांग समुद्राला ओंजळीत घेण्याचे नसते धाडस केल्यासारखे होईल. शेवटी वसंतदादा ते वसंतदादाच!