जगभरात १३ हा अंक अशुभ आणि धोकादायक का मानला जातो ?
ज्या दिवशी १३ तारीख असते आणि वार शुक्रवार असतो तेव्हा योगायोगाने अमेरिकेत किमान ९ अब्ज डॉलर किंमतीचे एकूण नुकसान होतेच होते
आज भारत प्रगतीच्या त्या वाटेवर उभा आहे जिथे प्रत्येक व्यक्ती हा केवळ जगण्याने स्वतंत्र्य, मतांनी मुक्त नसून तो पुरोगामी विचारांचा आहे असं आपण मानतो. पण सत्य इथेचं संपत नाही, आपण कितीही स्वत:ला विकसित आणि पुरोगामी म्हणवून घेत असलो तरी अदृश्य असलेल्या अनेक गोष्टी आजही आपण मानतो.
देवधर्म, भूतपिशाच्च, अंधश्रद्धेच्या विळख्यातून आपल्याला बाहेर पडायला वर्षानुवर्षे जाणार आहेत आणि ती वर्षे किती याचा नेमका अंदाज बांधणं आजच्या घडीला तरी खूपचं अवघड आहे. आपण कितीही शिक्षण घेतलं, मॉर्डन कल्चर स्वीकारलं तरी अंधश्रद्धा ओलांडून जाताना थोडी तरी पाल मनात चुकचुकतेचं आणि याच अंधश्रद्धेतून आपण छोट्या छोट्या गोष्टींचा संबंध पण या ग्रहावरून त्या ग्रहावर घेऊन जातो.
जसं की आपल्या रोजच्या जीवनातलचं उदाहरण घेऊयात, कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी आपण घरातून बाहेर पडत असू आणि मागून कोणी आपल्याला टोकलं म्हणजेचं थांबवलं किंवा रस्त्यात समोरून मांजर आडवी गेली तर आपलं लाखो- करोडोंचं नुकसान झालं तरी चालेल पण आपण काही पुढे जात नाही आणि या अंधश्रद्धेपलीकडे तर सर्वात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे शुभ-अशुभ !
आता पुढे लिहिलेलं वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे की देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मधील काही मोठ मोठ्या इमारतींना तेरावा माळाचं नसतो. फक्त भारतातचं नाही तर परदेशातही १३ नंबर हा अशुभ मानला जातो. आजवरची आकडेवारी सांगते की, ज्या दिवशी १३ तारीख असते आणि वार शुक्रवार असतो तेव्हा योगायोगाने अमेरिकेत किमान ९ अब्ज डॉलर किंमतीचे एकूण नुकसान होतेच होते. या दिवशी अचानक अमेरिकेतील विविध क्षेत्रांमध्ये घट सुरु होते.
मानसशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार १३ क्रमांकापासून लोकांना वाटणारी भीती म्हणजे एक मानसिक आजार असून ज्याला ‘ट्रिस्काइडेकाफोबिया’ म्हटले जाते. या भीतीने लोकांचा आत्मविश्वास कमी होतो. अजून एक अविश्वसनीय गोष्ट म्हणजे १३ तारखेला पश्चिमेकडील देशांत जास्त दुर्घटना होतात त्यामागचे कारण देखील हा मानसिक आजार असल्याचे म्हटलं जातं.
१३ अंक अशुभ मानण्याची सुरुवात ‘कोड ऑफ हम्मुराबी’ (Code of Hammurabi) पासून झाली असे म्हटले जाते. मेसोपोटेमिया संस्कृतीत पवित्र मानल्या गेलेल्या ‘कोड ऑफ हम्मुराबी’ या ग्रंथात त्या काळातील कायदेशीर नियमांचा आणि तत्वांचा उल्लेख आहे. पण १३ क्रमांकावर मात्र कोणत्याही नियमाचा उल्लेख नाही. १३ अंक हा पूर्णत: कोरा आहे म्हणून तेव्हा पासून १३ हा क्रमांक अशुभ मानला जातो. हिच गोष्ट सर्वत्र वा-यासारखी पसरली आणि समाजातील अनेक घटक १३ हा अंक अशुभ मानू लागले, पण आधुनिक इतिहासकार मात्र हा दावा खोटा ठरवतात. त्यांच्या मते १३ हा क्रमांक चुकीने कोरा राहिला असून त्याला अंधश्रद्धेशी जोडू नये.
जर आपण या अंकाला गणिताच्या दृष्टीकोनातून पाहिल तर हा अंक कमी उपयोगी आणि विचित्र घटना घडवून आणणारा मानला जातो. पण १३ या अंकाच्या आधीचा १२ अंक हा गणितीतज्ञांद्वारा शुभ मानला जातो. म्हणूनच, दिवसाचे तास १२ तर एका वर्षात १२ महिने असतात. मात्र १३ ही एक विषम संख्या आहे. या क्रमांकाचा वापरही तसा फार कमी केला जातो म्हणून देखील हा क्रमांक अशुभ मानला जाऊ लागला.
धार्मिकतेच्या दृष्टीने बघायचे झाल्यास पश्चिमेकडील देशात १३ क्रमांक अशुभ मानण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे बायबलच्या एका कथेत असा उल्लेख आहे की जेव्हा प्रभू येशूला अटक करण्यात आली होती बरोबर त्याच्या एक दिवस आधी सामुहिक भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. याच कार्यक्रमामध्ये जुडास नावाचा एक माणूसदेखील सहभागी होता जो की त्या सामुहिक भोजनातला १३ वा पाहुणा होता आणि त्यानेच प्रभू येशूंना धोका देऊन अटक करून दिलं होतं. दूस-याच दिवशी प्रभू येशूंना फासावर चढवलं गेलं. त्याचबरोबर पाश्चिमात्य देशातम अजून एक कथा अशी आहे की देवदेवतांसाठी एक भोजन कार्यक्रम आयोजित केला गेला होता. यामध्ये लोकी नामक दुष्ट आणि अनिष्ट शक्तींची एक देवता होती, ज्याने १३ व्या पाहुण्याच्या रुपात येतून उर्वरित १२ देवतांचा वध केला आणि तेव्हापासून १३ अंक अशुभ मानाला जाऊ लागला.
तर मंडळी असं आहे हे १३ क्रमांक अशुभ मानण्यामागचं गौडबंगाल ! पण आपण आज ज्या युगात वावरत आहोत, त्या अधुनिक युगात या सर्व गोष्टींना रंजकते पुरतंच मर्यादित ठेवून खतपाणी न घातलेलंच उत्तम ! शुभ अशुभ या गोष्टी केवळ आपल्या मनात भ्रम निर्माण करतात, त्या उलट मनापासून मेहनत करा त्यातून मिळणारं फळ हे जास्त सकारात्मक आणि आयुष्यभरासाठी आनंद देणारं असेल !