Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

तिरंगा फडकवायला संघाला का लागली इतकी वर्षे?

१५ ऑगस्ट २०२२ या दिवशी भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण होतील. यंदा नव्या दमाचा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi ka Amrit Mahotsav) साजरा करण्यासाठी एकदम उत्सुक आहे. याची पूर्वतयारी ही आता सुरु झाली आहे. याचे औचित्य साधून काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) या अभियानाची घोषणा केली. त्याचबरोबर आपल्या फेसबुक, ट्विटर (Facebook Twitter) या सोशल मिडिया अकाऊन्टच्या प्रोफाईलवरही ‘तिरंग्याचा फोटो लावण्याचं आवाहन केलं आहे. पण यावरून राजकारण झालं नसतं तरच नवल! विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ‘हर घर तिरंगा’ या अभियानावरून सत्ताधारी पक्षाला टोले लगावायला सुरुवात केली. प्रियांका व राहुल गांधी (Priyanka Gandhi, Rahul Gandhi) यांनी पं. नेहरूंचा तिरंगा हाती धरलेला फोटो ट्विटरवरून पोस्ट केला तर भाजपच्या (BJP) मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनी त्या फोटोवर बोलताना विरोधी पक्षाला राष्ट्रध्वजाच्या बाबतीतही पक्षीय राजकारण आणायचं आहे म्हणत फोटोची चेष्टा केली. यांवर ज्येष्ठ कॉंग्रेस (Congress) नेते पावन खेरा यांनी आरएसएस व मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी तरी अजून ट्विटरच्या डी.पी.वर तिरंगा लावला नसल्याबद्दल टीका केली व यापुढे जाऊन जयराम रमेश यांनी तर आता हर तिरंगा करत आहेत परंतु संघाला (RSS) तोच तिरंगा फडकवायला इतकी वर्षे का लागली? असा थेट सवाल विचारून सत्ताधारी पक्षाने केलेल्या टीकेचा समाचार घेतला. खरंच संघाने किती वर्षांनंतर तिरंगा फडकवला? काय आहे यामागची कहाणी? जाणून घेऊयात या घटनेबद्दल.

२१ व्या शतकात संघाने फडकवला तिरंगा 

होय, तुम्ही बरोबर वाचलंत. भारतीय राष्ट्रीय ध्वज हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsewak Sangha) नागपूर येथील मुख्यालयात फडकण्यासाठी ५२ वर्षे लागली. ही २००१ सालची गोष्ट आहे. त्यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला काही तरुण जबरदस्ती संघाच्या मुख्यालयात घुसले आणि तिथल्या ध्वजस्तंभावर जाऊन त्यांनी तिरंगा फडकवला. ते तीन तरुण राष्ट्रप्रेमी युवा दलाचे सदस्य असल्याचं नंतर समोर आलं. बळजबरीने केलेल्या वर्तनामुळे त्या तरुणांवर त्यांच्यावर खटला चालवला गेला आणि साधारणतः एका तपानंतर त्या तीन तरुणांची या खटल्यातून मुक्तता केली गेली. या घटनेनंतरच संघाकडून कायम तिरंगा ध्वज फडकवण्यात येऊ लागला. 

संघाला इतकी वर्षे का लगावीत?

१९४७ च्या जुलै मध्ये पिंगाली व्यंकैय्या यांनी बनवलेला झेंडा हा भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून स्विकारला गेला.

स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतिक म्हणजे हा तिरंगा झेंडा भारताच्या सार्वभौमत्वाची ओळख जगाला करून देणारा ठरला. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अधिकृत ध्वज हा भगवा आहे. संघ ही हिंदुत्ववादी विचारसरणीचा अवलंब करणारी संघटना आहे. म्हणून भगवा ध्वज हा हिंदुत्वाचं प्रतिक म्हणून अंगिकारला असल्याबद्दल संघाकडून सांगितलं जातं. संघाच्या स्वातंत्र्यावेळी असणाऱ्या नेत्यांनी या तिरंग्याचा विरोध केला होता. संघासोबत हिंदू महासभेसारख्या संघटनांना ही हा तिरंगा नको होता. भारतात पूर्वापार भगवा ध्वजच होता, आणि समृद्ध भारतीय इतिहासाची आणि धार्मिक परंपरेची ओळख करून देणारा असल्यामुळे तोच ध्वज असावा असं या नेत्यांचं मत होतं. हा तिरंगी झेंडा भारतीय स्वातंत्र्यानंतर स्वीकारणार नाहीत, तसेच तीन हा आकडा अशुभ असतो. असेही विचार त्यांनी तेव्हा व्यक्त केले होते. खरंतर तिरंगा हा कॉंग्रेस पक्षाच्या झेंड्याची सुधारित आवृत्ती होती, त्यामुळेही हा विरोध केला असावा, असं मानलं जातं. 

ध्वज संहितेचं कारण

आपला ध्वज हा राष्ट्रीय चिन्हांपैकी एक आहे, तर तो फडकवण्याबद्दल काही नियम आहेत. हे संविधानात (Constitution of India) समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या नियमावलीलाच ‘ध्वज संहिता’ (Flag code of India) म्हणतात. त्यानुसार सर्वसाधारण नागरिकांना त्यांच्या घरात, ऑफिसमध्ये व संघटनांच्या कार्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करता येणार नाही. संघ ही एक खाजगी संस्थाच आहे म्हणून त्यांनी तिरंगा फडकवला नव्हता. यासाठी २००२ मध्ये सर्वोच्च न्यायालयात (Supreme court of India) एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यांवर सुनावणी करताना न्यायालयाने भारतीय ध्वज संहितेत बदल करण्याच्या सूचना दिल्या व नागरिकांना खाजगी ठिकाणी ही राष्ट्रध्वज फडकवण्याबद्दल परवानगी दिली. त्यानंतर संघानेही तिरंगा फडकवला. 

परंतु या आधी ही १९९५ मध्ये नवीन जिंदल या व्यक्तीने त्याच्या कंपनीत राष्ट्रध्वज फडकवण्याबद्दल सरकारने केलेल्या प्रतिबंधा संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली असता न्यायालयाने सांगितलं की अन्य दिवशी जरी तिरंगा फडकवण्यास परवानगी नसली तरीही सामान्य नागरिक स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन आणि गांधी जयंती या दिवशी खाजगी ठिकाणी ध्वज फडकवू शकतात. याबद्दल १९७१ चा व १९८२ सालचा असे दोन सरकारी आदेश आजही ऑनलाईन पहायला मिळतात.

हे होतं तर २००२ साली ध्वजसंहितेत बदल करण्यास न्यायालयाने का सांगितलं असेल?

या आरोपांवर उत्तर देताना संघाने १५ ऑगस्ट १९४७ आणि २६ जानेवारी १९५० ला तिरंगा फडकवला असल्याबद्दल आणि त्या प्रसंगाचे फोटो ही त्यांच्याकडे असल्याबद्दल सांगितलं आहे. कुणाच्याही राष्ट्रभक्तीवर शंका घेण्याचं कारण नाही. भूतकाळात जे काही घडलं तेच मांडलं. राजकारणाबद्दल काय बोलायचं? ते तर चिरायू आहेच. पण भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो ही अपेक्षा! भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा!.!.!


Leave A Reply

Your email address will not be published.