मुंबईत लहानशा खोलीत जमिनीवर झोपणाऱ्या या खेळाडूने मैदानावर भल्याभल्यांना झोपवले!
कला – क्रीडा – साहित्य असे एकही क्षेत्र नाही जिथे महाराष्ट्राने भारताचा झेंडा उंचावलेला नाही. किंबहुना कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकत भारताला सर्वात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधवही महाराष्ट्रातलेच.
तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राने विविध खेळांमध्ये देशाला अनेक रत्ने दिली. पण याबाबतीत क्रिकेट थोडा जास्त भाग्यवान ठरला. संजय मांजरेकर, सुनील गावस्कर, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर अशी एकाहून एक मौल्यवान रत्ने या मराठी मातीने क्रिकेटला दिली.
पण भारतीय क्रिकेटचा रत्नजडीत मुकुट महाराष्ट्रानेच घडवलेल्या आणखी एका रत्नाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि तो रत्न म्हणजे भारताचा माजी वेगवान गोलंदाज ‘झहीर खान’.
झहीरचा जन्म, शिक्षण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी
झहीर खान कुठल्याही धनदांडग्या कुटुंबातून नव्हता. खूपच गरिबी पाहिल्यानंतर त्याला यश मिळाले होते. झहीर खानचा जन्म ७ ऑक्टोबर १९७८ साली महाराष्ट्रतील श्रीरामपूरच्या एका मराठी मुस्लिम कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांचे नाव बक्तीयार खान तर आईचे नाव झाकिया खान.
Zaheer Khan ने न्यू मराठी शाळेतून आपल्या प्राथमिक शिक्षणास सुरवात केली. पुढे के.जी.सोमय्या सेकेंडरी शाळेतून आपले शिक्षण पूर्ण केले. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फार हलाखीची होती. मात्र तरीही झहीरने क्रिकेटमध्ये करियर करायचे मनाशी पक्के केले होते.
जेव्हा कधी झहीरचा कोणताही मित्र त्याच्या घरी यायचा तेव्हा तो झहीरच्या गोलंदाजीचेच तोंडभरुन कौतुक करायचा. यावरुनच आपल्या मुलामध्ये काहीतरी खास बात आहे याची जाणीव झहीरच्या कुटुंबीयांनाही झाली आणि त्यांनी त्याला पुरेपूर पाठिंबा दिला.
क्रिकेटची आवड आणि वडिलांचा पाठिंबा
झहीरच्या खेळाची सुरवातही एखाद्या साधारण मुलाप्रमाणेच झाली. तो देखील लहानपणी गल्लीत क्रिकेट खेळायचा. पण हळू हळू क्रिकेट खेळणंच त्याची आवड बनलं. दिवसेंदिवस त्याची क्रिकेटमधील रुची वाढू लागली. त्याची ही आवड आणि उत्साह बघून झहीरच्या वडलांनी त्याला प्रोत्साहन देण्यास सुरवात केली.
इतर आईबापांप्रमाणे झहीरच्या वडलांनाही आपल्या मुलाला इंजिनियर बनवायचे होते. मात्र त्यांचे हे स्वप्न झहीरच्या क्रिकेटच्या आड येत असल्याचे कळताच त्यांनी ते कायमचे सोडून दिले. आपल्या मुलाच्या स्वप्नपुर्तीसाठी एका बापाने केलेला, तो एक मोठा त्याग होता.
मुंबईला प्रस्थान आणि नाईकांच्या तालमीमध्ये झहीरची जडणघडण
पुढे झहीरचे वडील त्याला मुंबईला घेऊन आले. माजी क्रिकेटपटू सुधीर नाईक यांच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये झहीरचे अॅडमिशन करुन दिले.
सुधीर नाईक यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “झहीर जेव्हा माझ्याकडे आला होता, तेव्हा तो एकदम नवखा होता. त्याला क्रिकेटमधल्या फारशा नियमांची देखील माहिती नव्हती. मी त्याच्याकडून सलग ४० मिनिटे गोलंदाजी करवून घेतली आणि नंतर थांबायला लावले. कारण मला भिती होती की त्याच्या जबरदस्त अशा वेगवान गोलंदाजीने कोणी जखमी नको व्हायला”.
Zaheer Khan जेव्हा मुंबईत आला तेव्हा त्याच्याकडे राहायला घरदेखील नव्हते. शेवटी नाईलाजास्तव एका नातेवाईकाच्या घरी आश्रय घ्यावा लागला. त्यातच लहान घर आणि घरात जास्त माणसं असल्याने झहीरला जमिनीवर चादर टाकून झोपावे लागायचे.
पण नियतीचा खेळ तरी कुणाला ठाऊक होता. आज जो जमिनीवर झोपत होता, उद्याला तोच क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्यांना झोपवणार होता.
क्रिकेटमधील करियरला खऱ्याअर्थाने सुरवात आणि भारतीय संघात स्वतःचे स्थान
आयसीसी नॉकआऊट ट्रॉफी दरम्यान झहीरने बांगलादेश आणि केनियाच्या विरुद्ध आपल्या पहिल्या वन डे आणि टेस्ट मॅचेसची सुरवात केली. झहीर डावखुरा वेगवान गोलंदाज असल्याने तो दोन्ही बाजुला स्विंग करण्यासाठी ओळखला जायचा.
झहीर खानला २००० सालच्या आयसीसी नॉकआऊट मॅचसाठी घेऊन जाण्याचा निर्णय सौरव गांगुलीने घेतला. जिथे त्याने केनिया विरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये ३ विकेट्स घेतल्या.
यानंतर झहीर भारतीय संघाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला. झहीरने २००३ सालच्या वर्ल्डकप मध्येही उत्तम कामगिरी केली आणि संघाचा फायनल पर्यंत जाण्याचा मार्ग सुकर केला.
झहीर खानने या टुरनामेंटच्या ११ मॅचेसमध्ये १८ विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये झहीरचा अॅव्हरेज २० runs पर विकेट होता.
दुखापत झाल्याने संघाच्या बाहेर
उत्तम प्रदर्शन करुनही २००४ साली जमखी झाल्यामुळे झहीरला पाकिस्तान दौऱ्यातून वगळण्यात आलेे. मग तो आपल्या फिटनेस आणि फॉर्ममुळे चिंताग्रस्त झाला.
२००५ साली भारतीय संघात इरफान पठाण, श्रीशांत आणि आर.पी.सिंग असे नवीन गोलंदाज आल्याने संघात स्वतःची जागा बनवणे झहीरसाठी अधिकच कठीण होऊन बसले.
जोरदार पुनरागमन आणि संघात अढळ स्थान
अशा बिकट परिस्थितीतही झहीरने पुनरागमन केले. इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या झहीर (Zaheer Khan)ने आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवत तब्बल ७८ विकेट्स घेतल्या.
२००८ साली ‘विसडम क्रिकेटर ऑफ दी इयर’साठीही झहीरची निवड करण्यात आली. आपल्या कार्यकर्तृत्वाचा जोरावर झहीरने पुन्हा एकदा संघात अढळ स्थान निर्माण केले व पुन्हा मागे वळून कधीच पाहिले नाही.
झहीरची क्रिकेटमधील सुर्वण कारकीर्द
२०११ चा वर्ल्डकप तर कुठलाही भारतीय विसरु शकत नाही. त्यावेळी झहीर खान भारतीय संघातील टॉप परफॉर्मर खेळाडू होता. त्याने अनेक महत्वाच्या विकेट्स घेत भारताला वर्ल्डकपपर्यंत पोहचवले.
झहीरच्या ODI कारकीर्दीचा आढावा घेतला तर लक्षात येतं की त्याने 200 मॅचेसमध्ये 282 विकेट्स घेतल्या.
२००३ सालच्या वर्ल्डकप मध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या स्थानी होता. त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये ५ वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ३ वेळा ‘मॅन ऑफ द सिरीज’च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘वन डे’ क्रिकेटच्या बाबतीतही बोलायचं झालं तर झहीरने ६ वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि एकदा ‘मॅन ऑफ द सिरीज’चा अवॉर्ड पटकावला. एवढंच नाही तर क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानामुळे भारत सरकारनेही झहीरचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरव केला.
आपल्या दैदिप्यमान अशा कारकीर्दीनंतर १५ ऑक्टोबर २०१५ साली झहीरने रिटायरमेंट घेतली. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर २३ नोव्हेंबर २०१७ साली झहीर सागरिका घाटगे या अभिनेत्री सोबत विवाह बंधनात अडकला. आज ते क्रिकेटमधल्या लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत.