मुघलांना वाटलं मराठ्यांचा राजा कर्नाटकात पळाला पण याच डावपेचाने त्यांना उध्वस्त करून टाकलं.
मराठेशाहीच्या इतिहासात गाजलेले आणि हिंदवी स्वराज्यास नवसंजीवनी छत्रपतींचे दोन प्रवास म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रा ते रायगड प्रवास आणि छत्रपती राजाराम महाराजांचा रायगड ते जिंजी प्रवास. मराठ्यांच्या छत्रपतींचे हे दोन्हीही प्रवास तितकेच नाट्यमय आणि अंगावर शहारे आणणारे. पण त्याहून महत्वाचे म्हणजे हे दोन्ही प्रवास हिंदवी स्वराज्यास नवसंजीवनी देणारे ठरले.
ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार याबाबत म्हणतात,
“मराठ्यांच्या इतिहासात या राज्यांचे दोन प्रवास इतके महत्वाचे होते की यदाकदाचित ते मार्गात शत्रूच्या हाती सापडले असते तर हिंदवी स्वराज्याचा ग्रंथ तिथेच गुंडाळावा लागला असता.”
या दोन्ही प्रवासाबाबत अधिक बोलायचं झाल्यास त्यामध्ये फरक इतकाच की, पहिल्या प्रवासात छत्रपतींना महाराष्ट्राबाहेरून महाराष्ट्रात यायचे होते तर दुसऱ्या प्रवासात छत्रपतींना महाराष्ट्रातून बाहेर जायचे होते. आणि योगायोग पहा दोन्ही प्रवास क्रूर औरंगजेबाच्या कचाट्यातून निसटण्याची केलेली दिव्येंच होय.! दोन्ही प्रवासात छत्रपती यशस्वी झाल्यानंतर स्वराज्याने मरगळ झटकली आणि सत्तेचा वृक्ष जोमाने बहरू लागला.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज अचानकपणे दक्षिण कोकणात मोहिमेवर गेले असताना दगाफटका झाला अन शत्रुकडून कैद झाले. यानंतर मराठ्यांच्या ह्या छत्रपतींच्या निधनानंतर स्वराज्यात हाहाकार माजला, तर तिकडे मुघल औरंगजेबाला मराठी मुलुख जिंकून स्वप्नपूर्ती करण्याच्या उकळ्या फुटत होत्या. यावेळी गादीवर विराजमान झाले ते संभाजीराजेंचे धाकटे बंधू राजाराम. राजाराम महाराज गादीवर बसल्यानंतर झालेल्या खलबतांमध्ये सर्व कुटुंब रायगडावर नको असे ठरले आणि त्याप्रमाणे छत्रपती राजाराम महाराज पहिल्यांदा प्रतापगडावर गेले पण मुघलांचा पिच्छा काही सुटत नव्हता.
अखेर, पन्हाळगडावरून राजाराम महाराजांनी जिंजीच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. अनेक प्रसंगावर मात करत मराठ्यांचा हा अवघ्या विशीतील छत्रपती जिंजी पर्यंत पोचला अन जिंजी ही मराठ्यांची तिसरी राजधानी घोषित केली.
इतिहासात डोकावल्यास छत्रपती राजाराम महाराजांच्या या प्रवासाबाबत फक्त पलायनाचे चित्र रंगवल्याचे लक्षात येईल. पण याकडे नीट लक्ष दिल्यास त्यांना चाणाक्ष राजारामराजेंचे डावपेच आणि राज्यकला समजली नसावी. छत्रपती राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास म्हणजे फक्त जीव वाचवण्यासाठी केलेला खटाटोप नव्हता तर तो एक लष्करी डावपेच होता.
शंभूराजेंच्या मृत्यनंतर रायगडाचा पाडाव झाला आणि राणीसाहेबांसोबत शाहूराजे मुघलांच्या कैदेत गेले. मुघल मराठा युद्धाचा रंगाचं बदलला, मराठ्यांना नवा छत्रपती मिळाला पण स्वराज्यातील परिस्थिती योग्य नसल्याने त्यांना सहकाऱ्यांसोबत प्रदेश सोडावा लागला. खुद्द छत्रपतींच राज्य सोडून गेल्याने सर्वसामन्य मराठा सरदार – ठाणेदार यांचे अवसान गळाले, इतके की मुघलांच्या फौजांनी मराठी मुलुख जिंकण्याचा सपाटा लावला. पण राजाराम महाराजांनी प्रदेश सोडण्यापूर्वीच महाराष्ट्रतील सर्वाधिकार रामचंद्रपंतकडे बहाल केले आणि याचवेळी या लष्करी डावपेचाची आखणी करण्यात आली होती.
महाराष्ट्रापासून ५०० मैल दूर नवी राजधानी स्थापन झाल्याने तिला जिंकून घेण्यासाठी औरंगजेबाने आपले सगळे सैन्य दक्षिणेच्या दिशने वळवले. औरंगजेब आणि मुघलांचे लक्ष मराठी मुलुखावरून दक्षिणेतील जिंजीवर केंद्रित झाले आणि छत्रपती राजाराम महाराजांनी टाकलेल्या डावपेचात औरंग्या अडकला.
यामुळे दोन गोष्टी घडल्या एक महाराष्ट्रावरील मुघलांचा दबाव कमी झाला आणि दुसरा म्हणजे मराठ्यांचा छत्रपतींने दक्षिणेत जाऊन राजधानी घोषित केल्याने मर्जीसाठी गाठीभेटी घेण्यासाठी सगळे सरदार कर्नाटकात जाऊ लागले आणि स्वाभाविकपणे दक्षिण मोहिमेस कधी नाही इतके बळ प्राप्त झाले.
इकडे महाराष्ट्रात अवसान गळलेल्या सर्वसामान्य मराठ्यांत ईर्षा पैदा करण्याचे काम संताजी, धनाजी, मानाजी मोरे, बहिर्जी घोरपडे यांनी चालू केले आणि स्वराज्याची ढसाळलेली इमारत पुन्हा जोशाने उभी करण्यास सुरवात केली. संताजी आणि धनाजी यांच्या नेतृत्वखाली मराठा सरदारांनी शत्रूने काबीज केलेला मराठी मुलुख पुन्हा जिंकून स्वराज्यात आणण्याचा सपाटाच लावला इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात तळ ठोकून असलेल्या मुघलांच्या नामक सरदार सर्जाखानाला धूळ चारून त्याच्याकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल केली आणि याची दहशत इतकी पसरली की मुघल अंमलदार आपणहून खंडणीच्या रकमा तयार ठेवू लागले.
स्वराज्यावर आलेल्या भल्या मोठ्या संकटाला न डगमगता अत्यंत स्थिरबुद्धीने त्याला चितपट करणाऱ्या मराठ्यांच्या तिसऱ्या छत्रपतीला इन्फोबझ्झचा मानाचा मुजरा….!
कव्हर फोटो करवीरकर छत्रपती राजाराम महाराजांचा आहे.