Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

छत्रपती संभाजीराजेंना मुघलांच्या कैदेतून सोडवण्याचे अज्ञात प्रयत्न.

मराठेशाहीचा आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास, मुघलांच्या तावडीतून छत्रपती संभाजीराजे याना सोडवण्याचा प्रयत्न झालाच नाही असं सगळे इतिहासकार मानत होते. अनेक पूर्वग्रहदूषित इतिहासकारांनी छत्रपती संभाजीराजेंनाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला तर इतर इतिहासकारांनी राजेंना सोडवण्यासाठी मराठ्यांनी केलेल्या धडपडीबाबत कोणतेही पुरावे नसल्याचं नमूद केले. पण आता मराठ्यांच्या दुसऱ्या छत्रपतीला मुघल कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न झाल्याचं पुढं येत आहे.

या सगळ्या प्रसंगावर प्रकाश टाकणारा हा लेख तुमच्यासमोर प्रस्तुत..

जोत्याजी केसकारांचा प्रयत्न –

संगमेश्वर येथे मोहीमेवर गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना दगाफटका झाला अन ते मुघलांच्या हाती लागले. इतिहासातील नोंदीनुसार मराठ्यांच्या छत्रपतीला पकडल्यानंतर मुघलांनी पन्हाळ्याच्या पूर्व दिशेने वळसा घालून वारणा नदी ओलांडून शिराळा येथे आले. मराठ्यांच्या हेरखात्यानुसार महाराजांना शिराळा येथे आणले जाणार असल्याचे जोत्याजी केसकर या सरदाराला कळाले.

जोत्याजीने लागोलाग कुणालाही खबर न लागता सैन्याची जमवाजमाव करून राजेंना सोडवण्याचा प्रयत्न केला. दबा धरून बसायचे आणि शत्रूवर गनिमी काव्याने प्रहार करायचा असं नियोजन. ठरल्याप्रमाणे मुघल फौज जात असताना जोत्याजी केसकर आणि सैन्याने विजेच्या चपळाईने हल्ला केला आणि महाराजांना सोडवण्यात यश आले. त्यावेळी जोत्याजी महाराजांना पळून जाण्यासाठी विनंती केली. राजे जोत्याजीला म्हणाले..

“मी शूर आहे, मी पळून जाणार नाही. लढत राहीन”

अगदीच क्षणभराचे संभाषण ते, तेवढ्यात मुघल सैन्याने गोळा होऊ लागले आणि त्यांचे सैन्य पाहता आपला टिकाव लागणार नाही असा विचार करून जोत्याजी पुन्हा झाडाझुडपात गायब झाला. छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची अशी लोककथा आहे.

पण लोककथा म्हणजे इतिहास नव्हे, याची इतिहासाच्या पद्धतीने चिकित्सा होणे गरजेचे. ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी या कथेची चिकीत्सा अगदी उत्तम केली आहे.

डॉ जयसिंगराव पवार यांच्यानुसार याकथेचे स्वरूप एखाद्या दंतकथेप्रमाणे आहे. मोडेन पण वाकणार नाही अश्या स्वाभिमानी संभाजी महाराजांच्या जनसामान्यांतील प्रतिमेला केंद्रस्थानी धरून ही कथा तयार झाली असावी. जोत्याजी केसकर याने मुघलांवर हल्ला केला अन तो शंभुराजेंच्या जवळ पोचला तेव्हा राजे “मी शूर आहे, मी पळून जाणार नाही. लढत राहीन” असं बोलल्याचं सांगते.

पण तो प्रसंग असा होता की छत्रपती संभाजी महाराज अश्याप्रकारचे उद्गार काढणे शक्य नव्हते. कारण जीव जाण्यापूर्वी शत्रूच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्याचा हा प्रसंग पहिलाच नव्हता. याआधीही छत्रपती संभाजीराजे तीन वेळा शत्रूला तुरी देऊन स्वराज्यात पुन्हा आले होते.

ते तीन प्रसंग खालीलप्रमाणे –

  1. 1666 चा आग्रा भेटीचा प्रसंग
  2. 1668 ला दक्षिणेचा सुभेदार शहाजादच्या छावणीतून सुटण्याचा प्रसंग
  3. 1679 दिलेरखानाच्या छावणीतून निसटून आल्याचा प्रसंग

पण याचा अर्थ असाही होत नाही की ही कथा पूर्णपणे खोटी आहे. डॉ जयसिंगराव पवार यांनी केलेल्या चिकित्सेप्रमाणे लोककथांमध्ये सत्य इतिहासाचे कण सापडू शकतात. मुळात या कथेमध्ये जोत्याजी केसकर का आला असावा ? रायगडावरील एखादा दुसरा सरदार का नाही ? याच उत्तर महत्वाचं

इतिहासात डोकावल्यास लक्षात येईल की जोत्याजी केसकर हा पन्हाळा शिराळा परिसरातील पुनाळ गावाचा पाटील होता आणि कामानिमित्त तो रायगडला गेला असता तिथे अकस्मात राजेंच्या कैदेची वार्ता कानावर पडली. छत्रपती घराण्याचा एकनिष्ठ सेवक म्हणून मल्हार रामराव बखरकाराने केसकारांचा गौरव केला आहे.

शिवछत्रपतीच्या तालमीत वाढलेला जोत्याजी केसकर शंभुराजेंचा सुद्धा खास होता. पुढे शंभुराजेंच्या स्वर्गवासनंतर येसूबाईंच्या सांगण्यानुसार राजाराम महाराजांनी काही ठराविक लोकांच्या हाती सूत्रे सोपवत रायगड सोडला. तेव्हा गडावर कारभार पाहणाऱ्यामध्ये जोत्याजी केसकर यांचाही उल्लेख आहे.

सेवाभावी वृत्ती असणाऱ्या जोत्याजी केसकारांचा उल्लेख बखरकार रामराव यांनी अनेकदा केल्याचे आपल्याला सापडते पण त्यामुळे त्यांची कथा पूर्णपणे ताज्य ठरविता येणार नाही.

हे खरे आहे की अश्या लोककथेस कागदोपत्री ठोस पुरावा उपलब्ध झालेला नाही आणि भावी काळात होणारच असेही नाही. पण अश्या लोककथेमुळे इतिहासाच्या अज्ञात गोष्टींवर प्रकाश पडून नवीन आशा पल्लवित होणे महत्वाचे.


हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.