टेन्शनमुक्त होऊन शांत झोप मिळण्यासाठी खास उपाय

ज्याच्यावर निद्रादेवी प्रसन्न त्याच्यावर लक्ष्मी, सरस्वती सर्वच देवी-देवता प्रसन्न होतात असं माझं म्हणजे एका झोपाळू व्यक्तिमत्त्वाचं ठाम मत आहे. अहो झोपेचं महत्व त्या व्यक्तीला विचारा जी व्यक्ती नाईट शिफ्ट करते आणि मनात असून पण सुखाची झोप घेऊ शकत नाही. रोज रात्री सुखाची आठ तासाची झोप म्हणजे स्वर्गसुखच.
भरपेट जेवण करून मऊमऊ दुलईवर जी साखरझोप येते त्याची तुलना इतर कशासोबतच होऊ शकत नाही. पण आज आपण बघितलं तर आपल्या आजूबाजूला असे अनेक महाभाग आपल्याला सापडतील जे रात्री झोपच येत नाही अशी तक्रार करत असतात. माझ्यासारख्या चोवीस तास झोप येणाऱ्या व्यक्तिमत्वाला हे झोपेची तक्रार करणारे महाभाग दुसऱ्या ग्रहावरचे तर नाहीत ना असा प्रश्नच पडतो.
पण वाचक मित्रांनो ज्यांना झोप येत नाही असे लोक कुठल्या ना कुठल्या समस्येने ग्रासलेले असतात म्हणून त्यांना झोप येत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कोणाला भरपूर काम आहे म्हणून झोप येत नाही तर कोणाला एखाद्या आजारामुळे झोप येत नाही तर कोणाला काही मानसिक कारणामुळे झोप येत नाही. पण झोप न येणे ही खूप गंभीर बाब आहे ज्याचा वेळीच उपचार केला नाही तर हाल आपलेच होतात.
आता तुमच्यापैकी बरेच जण झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या खाणारे असतील पण या झोपेच्या गोळ्या कोणत्याही विषापेक्षा कमी नाहीत हे ओळखून वेळीच सावध व्हा. तर आजचा हा लेख सगळ्या जागरण करणाऱ्या मंडळींना समर्पित.
मंडळींनो आज या लेखातून मी तुम्हाला शांत झोप मिळवण्यासाठी काही सोपे आणि रामबाण उपाय सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊ हे स्लिपवेल उपाय.
- जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्हाला झोप अगदी खात्रीशिररित्या लागू शकते. कारण जर तुम्ही झोपायच्या तासभर आधी एखादं रटाळ वाटणारं वाचन केलं तर आपोआपच तुम्हाला झोप येईल.
- बऱ्याच वेळा झोप न येण्याचा संबंध आपल्या पोटाशी असतो. जर तुमचे पोट अस्वस्थ असेल तर तुमची झोप चाळवणारंच. त्यामूळे रोज रात्री जेवण झाल्यावर शतपावली करून मग झोपी जाणे हा एक झोप येण्यासाठी रामबाण उपाय आहे.
- रोज रात्री झोपण्याआधी तुम्ही जायफळ घातलेलं दूध पिलात तर मग सुखाची झोप लागणार म्हणजे लागणारच. जायफळामध्ये असे काही गुणधर्म असतात जे आपल्याला झोप येण्यास कारणीभूत ठरतात.

- तुम्हाला जर रात्री झोपताना खोलीभर प्रकाश करून झोपायची सवय असेल तर तिथेच तुमचं चुकत आहे आणि म्हणूनच तुम्हाला जागरण करावं लागत आहे. खोलीत जेवढा जास्त प्रकाश तेवढं जास्त तुमचं जागरण. त्यामुळे खोलीमध्ये अगदी मंद उजेड असलेला लाईट लावला तर निश्चितच तुम्हाला गाढ झोप लागेल.
- रोज रात्री झोपायच्या आधी कोमट पाण्याने अंघोळ केल्याने देखील तुम्हाला फ्रेश वाटेल आणि शांत झोप लागेल.
- रोज रात्री झोपायच्या आधी डोक्याला हलक्या हाताने तेलाचा मसाज केला तर डोके हलके झाल्यामुळे तुम्हाला नक्कीच सुखाची आणि गाढ झोप लागू शकते.
- तर मग ज्यांना झोप येत नाही अशा जागरणकरत्यांनी आजपासूनच हे उपाय अंमलात आणा आणि सुखाची झोप घ्या.
👌👌