Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

छोट्याश्या तैवानने केली आहे चीनची गोची

सध्या जगात युद्धजन्य परिस्थिती आहे. रशिया आणि युक्रेन (Russia – Ukraine War) युद्धाला सुरुवात होऊन काही महिने लोटलेत. रशियाने युक्रेनमध्ये हाहाकार माजवला आहे. त्यांचं एका बाजूला चालू असताना दुसरीकडे लाल ड्रॅगनने आपल्या शेजारील राष्ट्र तैवानला डोळे वटारले. चीन तैवानला (China – Taiwan Issue) युद्धाच्या खाईत लोटेल अशी भीती बऱ्याच आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्याची सुरुवात झालेली दिसत आहे. तैवानला चीनी फौजांनी चहूबाजूंनी नुकताच वेढा दिला अशा आशयाच्या बातम्या आल्या आहेत. पण तैवानही गप बसणाऱ्यातला नाही. तैवानने युद्धाभ्यासाला प्रारंभ करून महाकाय शत्रूला खुन्नस दिली. भरीस भर म्हणून अमेरिकेसारख्या महासत्तेने तैवानचा हात हातात घेतला. काहीच दिवसांपूर्वी अमेरिकी सभापती नॅन्सी पालोसी यांनी तैवानचा दौरा केला. यामुळे चीन रागाने अजूनच लालेलाल झाला. अमेरिकेलाही चीनने उघड धमकी दिली. रशियाप्रमाणे चीनला आक्रमण करणं इतकं सहज शक्य नाही. आता इतक्या छोट्या तैवानला गिळून टाकणं चीनला अवघड आहे? काय आहे कारण? समजून घेऊयात.

चीनच्या डरकाळ्या आपल्याच हद्दीत 

चीन तैवानवर हल्ला करेल, अशी भविष्यवाणी वर्तवली जात असली तरी चीनला हे काम प्रत्यक्षात करता येत नाही. चीन केवळ सीमेवर बसूनच तैवानवर गुरकावतो आहे. कारण त्याची एक मोठी अडचण झाली आहे. असं काय झालं आहे? याचं उत्तर आहे, चीनचा तैवानशी झालेला एक करार. ज्यामुळे चीन सध्यातरी केवळ तैवानला भीती दाखवण्याचं काम करतो आहे. पण तैवान त्याला भीक घालत नाही. 

असा कोणता करार दोघांमध्ये झाला आहे? 

राष्ट्राराष्ट्रांमध्ये विविध प्रकारचे करार होत असतात. बहुतांश हे व्यापार संदर्भातले करार असतात. तसाच व्यापारी करार हा चीन आणि तैवान मधील काही कंपन्यांनी केलेला आहे. जगात तैवान क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान असला तरी एका बाबतीत तो दादा आहे. इलेक्ट्रॉनिक चिप्सच्या उत्पादनात (Electronic Chips production in Taiwan) तैवान अग्रेसर आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात या इलेक्ट्रॉनिक चिप्सला अनन्यसाधारण महत्व आहे. आता हा करार पाळू नये, यासाठी तैवानवर दबाव वाढवला जात आहे. या इलेक्ट्रॉनिक चिप्स म्हणजेच मुख्यत्वे करून त्यात असणारे सेमी कंडक्टर्स (Semiconductors) हे तैवानमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार केले जातात. तैवानमधील उत्पादन आणि पुरवठा करणारी महत्वाची कंपनी फॉक्सकॉनची सिन्घुआ या चीनी कंपनीमध्ये जवळपास ७०० दशलक्ष डॉलर्सहून अधिकची गुंतवणूक आहे. पण सध्याचं राजकीय वातावरण बघता फॉक्सकॉन या तैवानी कंपनीने सिन्घुआ या चीनी कंपनीत इतकी गुंतवणूक करू नये, असा सल्ला तैवान सरकारने दिला आहे.

सरकारच्या म्हणण्याप्रमाणे जर तैवानी कंपनीने कृती केली तर चीन यामुळे गोत्यात येऊ शकतो. पण दुसऱ्या बाजूला, फॉक्सकॉनमध्येही १७ – १९% चीनी गुंतवणूक करण्यात आली आहे. आता फॉक्सकॉनचा निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय तसेच चीनचा आक्रमणाचा विचार यामुळे जगात अन्य देशांना होणारा या इलेक्ट्रॉनिक चिप्सचा पुरवठा यांवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे संगणक (Computers), टीव्ही (Smart TVs), स्मार्ट फोन्स (Smart Phones) यांच्या उत्पादनावरही परिणाम होईल. याचा फटका बाकी देशांना तर बसेलच तसेच तो चीनला जास्त बसेल. 

तैवानची मक्तेदारी हीच त्याची ढाल

वर सांगितल्याप्रमाणे तैवान या इलेक्ट्रॉनिक चिप्सचा मोठा पुरवठादार आहे. या चिप्स म्हणजे त्यातल्या सेमीकंडक्टर्सचं ८८ – ९०% उत्पादन हे तैवानमध्ये होतं. त्याची किंमत बाजारात साधारणतः १२० दशलक्ष डॉलर्सच्या आसपास आहे.  म्हणजे या सेमीकंडक्टर्सच्या उत्पादनाच्या या बाजारपेठेत तैवानची मक्तेदारी आहे. जगातील छोट्या – मोठ्या देशांना आधुनिक उपकरणे बनवण्यासाठी याच सेमीकंडक्टर्सची आवश्यकता असते. म्हणून तैवानशी कोणताच देश वाद घालत नाही. आर्थिक महासत्ता ही सलोख्याने वागतात. तैवान आपल्या सेमीकंडक्टर्सच्या मक्तेदारीची ढाल बनवून स्वतःचं संरक्षण करवून घेतो. ‘सिलिकॉन शिल्ड’ (Silicon Shield) या नावाने ही ढाल ओळखली जाते.

जगावर या युद्धाचा विपरीत परिणाम

तैवान सारख्या देशात युद्ध झालं तर या सेमीकंडक्टर्सचा पुरवठा जगाला सहजपणे होणार नाही. याचा मोठा फटका जगाला बसेल. कारण जगात एका वर्षात १००० कोटी सेमीकंडक्टर्स बनवले जातात. त्यातली तैवानी बनावटीची टक्केवारी किती हे आपण वर वाचलं आहेच. मोबाईल फोनची प्रसिद्ध कंपनी ॲपल (Apple Comany) ही या सेमीकंडक्टर्सची मोठी खरेदीदार आहे. त्याचबरोबर युरोपातील वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या, चिनी स्मार्ट फोन कंपन्या या सगळ्यांना या सेमीकंडक्टर्सची आवश्यकता असते. 

आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्नं जरी चीन पाहत असला आणि त्यासाठी शेजारच्या देशांच्या कुरापती काढत असला तरी कोणतंही मोठं पाऊल उचलणं त्याला किती महागात पडू शकतं. हे सगळं ओळखून रागानं चरफडत बसण्याखेरीज चीनकडे सध्या तरी दुसरा कोणताच पर्याय नाही. 


Leave A Reply

Your email address will not be published.