Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

गुगलवर लोकनेता म्हणून सर्च करा पहिलं नाव ‘गोपीनाथ मुंडे’ येतंय

राजकारणी झालेत व होतील पण संघर्ष करणारे, बहुजनांसाठी तळमळीने काम करणारे लोकनेते Gopinath Munde परत होऊ शकत नाहीत.

सध्या आपण काहीही अडलं, प्रश्न पडला तर उत्तरं मिळवण्याचा आपल्या हक्काचा जो स्त्रोत आहे तो म्हणजे गूगल बाबा, ज्याला सर्वज्ञानी म्हणूनही ओळखलं जातं. तर अशा महान बाबांना जर ‘लोकनेता’ या शब्दाबद्दल विचारलं तर ज्या सगळ्या लिंक्स येतात त्यात नाव असतं ते स्व. गोपीनाथजी मुंडे यांचं (Gopinath Munde) सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ आभासी जगात जास्त वेळ घालवणार्या सध्याच्या आपल्या पिढीला ‘लोकनेता’ या शब्दाचा अर्थ आणि व्याप्ती कितपत माहिती असू शकते? लोकनेता म्हणजे काय नक्की ?

जे राजकारणी समाजासाठी विकासाचं राजकारण करतात, सत्तेशी त्यांचं फार देणंघेणं नसतं. सत्तेत आल्यामुळे मिळणार्या प्रसिद्धीचं त्यांना फार महत्व नसतं, सत्तेत असो किंवा विरोधात; या नेत्यांचं जनतेच्या मनातलं स्थान दृढच राहिलं आहे आणि त्यांनी जनमानसावर कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे. अशा नेत्यांची यादीमध्ये गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हे नाव आहे.

विद्यार्थी चळवळीतील नेता, आमदार, उपमुख्यमंत्री – गृहमंत्री खासदार आणि केंद्रीय मंत्री, गोपीनाथजींचा दमदार आणि संघर्षपूर्ण असा गल्ली ते दिल्लीपर्यन्तचा प्रवास आहे. ते सर्वसाधारण शेतकरी – कष्टकरी कुटुंबात जन्माला आले त्यामुळे त्यांची मातीशी नाळ जन्मापासूनच जोडली गेली होती. नाथरा या त्यांच्या जन्मगावी त्यांचं शालेय शिक्षण झाडाच्या सावलीत असणार्या शाळेत झालं आणि मॅट्रिकनंतर आंबेजोगाईच्या स्वामीरामानंद तीर्थ महाविद्यालयात बी.कॉम.चं शिक्षण घेतलं व त्यानंतर त्यांनी पुण्याच्या प्रसिद्ध ILS कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

 गोपीनाथ मुंडे, लोकनेता, Lokneta, gopinath mundhe in marathi, gopinath mundhe, gopinath munde, gopinath munde death, gopinath munde photo, gopinath munde family, gopinath munde image, gopinath munde daughter

स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातले त्यांचे मित्र स्व. प्रमोद महाजन यांच्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रभावित झालेलेच होते. कॉलेजच्या काळात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करू लागले. विद्यार्थी दशेतच राजकीय संघर्षाला सुरुवात झाली. लादल्या गेलेल्या आणीबाणी विरोधात अभाविप तर्फे आंदोलन छेडलं गेलं व त्यात त्यांनी सहभाग घेतला. अशाच पद्धतीनं कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले गोपीनाथजी राजकरणात प्रवेश करते झाले होते.

आपलं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी लढणार्या गोपीनाथजींच्या समोर आव्हान अधिकच कठीण होतं. कारण ते ‘उच्चवर्णीय’ नव्हते, तर अन्य मागासवर्गीय म्हणजे वंजारी समाजातून होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही राजकीय कारकीर्द घडवावी यासाठी अजिबात अनुकूल नव्हती. बरं त्यांनी निवडलेल्या पक्ष भाजपला राजकीय जगतात विस्तार करण्यासाठी खूप अडथळे होते.

तत्कालीन राजकरणात ‘ठराविक समाजातील’ व्यक्तींची मक्तेदारी होती, तिथं आपला निभाव कशा पद्धतीनं लागेल हे लक्षात घेऊन गोपीनाथजींनी भाजप हा ‘सवर्णांचा पक्ष’ अशी ओळख पुसून टाकण्यासाठी अतोनात कष्ट केले आणि केवळ शहरी पक्ष म्हणून प्रसिद्ध असलेला भाजप हा राज्याच्या कानाकोपर्यात पोहोचवून भक्कम करण्यासाठी संघर्ष केला. राज्यस्तरीय राजकरणात स्वतःचा प्रभाव पाडत असताना त्यांनी बर्याच वेळेला उभा महाराष्ट्र पालथा घातला, राज्याच्या विविधतेबरोबर विविध माणसांचा अनुभव घेतला, त्यांचे प्रश्न समजून घेतले, त्यांच्या प्रश्नांसाठी लढा दिला.

शेतकरी पार्श्वभूमी असल्यामुळे धाडसी वृत्ती, स्वभावतः असलेला बेदरकारपणा यामुळं १९९२ मध्ये राजकारणाच्या गुन्हेगारीकरणा विरोधात आवाज उठवला आणि महाराष्ट्रातल्या ‘बलाढ्य राजकीय व्यक्तिमत्वाशी’ त्यांनी पंगा घेतला. याबद्दल त्यांना हीतचिंतकांनी समजावून पहिलं पण मुंडेजींनी जिद्द सोडली नाही. त्याचबरोबर महाजनजींच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पक्षांतर्गत आव्हानालाही त्यांनी दिल्ली दरबारीच गुंतवून ठेवलं. संघ परिवारातल्या जेष्ठ व्यक्तींच्या सम्मती विना बर्याच नेत्यांनी त्यांनी पक्षात आणलं. एका मुलाखती मध्ये त्यांनी गमतीनं सांगितलं आहे,

“१९६७ साली मी कॉलेजात गेलो पण बाहेर कधी पडलो हे विचारू नका. एका वर्गात किमान दोनदा बसलेलो आहे. आम्ही तिथं संघर्ष केला आहे.”

१९९५–९९ हे ४ वर्षांचं युती शासन व आठ दिवसांचं केंद्रीय मंत्री पद हे दिवस सोडले तर त्यांची राजकीय कारकीर्द ही विरोधी पक्षात जास्त काळ गेली. म्हणूनच अचूकवेळी योग्य प्रश्न उचलून तो सोडवण्यासाठी संघर्ष करण्याची जी निपुणता त्यांच्याकडे होती, आणि यामुळेच ते सत्ताधार्यांची कोंडी करायचे. म्हणून या लढाऊ वृत्तीमुळं त्यांची राजकीय कारकीर्द दमदार आणि धारदार आहे.

हल्ली नेते निवडणूका झाल्या तर फक्त शासकीय कार्यक्रम आणि काही इवेंट्स मध्ये ते पण व्यासपीठावर दिसतात, पण मुंडे साहेब त्यात नव्हते. निवडणूकांच्या काळात तर सभांचा भरगच्च कार्यक्रम गावोगावी असायचाच पण इतरवेळीही शांत बसायचे नाहीत. राजकारणात काम करताना सामाजिक प्रश्नांवर काही भूमिका घेणं हे नेत्यांना अवघड जातं, पण मुंडे साहेब याला आधी प्राधान्य द्यायचे, सामाजिक मुद्द्यांवर त्यांची ठाम भूमिका असायची.

एक प्रसंग असा आहे, मराठवाड्यात पाण्याची मोठी समस्या आहे, हा राज्याच्या दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, २०१३ च्या उन्हाळ्यात पाण्याची समस्या उभी राहिली, सर्व नेत्यांचे दुष्काळी दौरे झाले, पण ठोस पाऊलं उचलली गेली नाहीत, सरकारने काही विशेष मदत केली नाही. मुंडे साहेबांनी यासाठी उपोषणाची घोषणा केली, आणि औरंगाबादच्या आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं. आता सरकारची पाळी होती, पण दबावाच्या वातावरणातही सरकारने लवकर लक्ष दिलं नाही, एका मधुमेही व्यक्तीला उपवासाचा काय त्रास होऊ शकतो ? याची कल्पना करुयात पण तरीही मुंडे साहेब मागे हटले नाहीत. २ ते ३ दिवसांनंतर सरकारचे प्रतिनिधी आले आणि त्यांच्याकडून आश्वासन मिळाल्यावरच हे उपोषण थांबलं. या उपोषणाचे पडसाद दिल्लीतही उमटले व केंद्रातर्फे पाहणी पथकही पाठवलं गेलं.

 गोपीनाथ मुंडे, लोकनेता, Lokneta, gopinath mundhe in marathi, gopinath mundhe, gopinath munde, gopinath munde death, gopinath munde photo, gopinath munde family, gopinath munde image, gopinath munde daughter

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या बाजूने आपली भूमिका घेतली व हेच नाव दिलं गेलं पाहिजे म्हणून मराठवाड्यात पायपीट केली. मंडल आयोगाच्या बाजूनेही ते कायम राहिले. भटक्या-विमुक्त समाजाची जनगणना झाली पाहिजे याबद्दलही आग्रही होते.

गोवारी हत्याकांड किंवा कोठेवाडी प्रकरण किंवा पाणी मागणार्या शेतकर्यांवर गोळीबार झाल्याची घटना असो, साहेबांनी तिथे जाऊन परिस्थितीचा अंदाज घेतलेला असायचा व विधिमंडळात या मुद्द्यांवर आवाज उठवताना सभागृहाला हादरवून सोडायचे आणि सरकारला दखल घ्यायला भाग पाडायचे. टायकोटातला सायेब आणि गावकूसातला धोतर-फेटेवाला सगळ्यांना सारखीच वागणूक असायची त्यांच्यालेखी, सर्वांशी तितक्याच आपुलकीनं बोलायचे, चौकशी करायचे. सामाजिक प्रश्नांबरोबर लोक कौटुंबिक समस्याही घेऊन यायचे आणि साहेब त्यांचंही निराकरण करायचे. त्यांना लोकांमध्ये रमलेलं आवडायचं. या त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे त्यांनी भाजप- शहरी सवर्णीयांचा पक्ष ही ओळख पुसून ग्रामीण भागात तळागाळापर्यन्त पक्ष पोहोचवला.

सोशल इंजीनीरिंग करून पक्षाला सत्तेत आणलं. माळी, धनगर, वंजारी, कोळी, आगरी अशा विविध जातींना पक्षाशी जोडण्याचं महत्वाचं काम त्यांनी केलं. उपेक्षितांचा ते आवाज बनले. महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजनांच नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केली. याला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठींबा दिला. त्यांच्या भोवती कायमच लोकांचा गराडा असायचा.

राष्ट्रसंघाच्या (United Nations) च्या जागतिक व्यासपीठावर जाणं हा त्यांचा मोठा सन्मान झाला तरीही कुठेही तो विशिष्ट तोरा न दिसता कार्यकर्ते व सामान्य यांच्याबद्दलची आपुलकी, त्यांच्यासाठी काम करायची तळमळ अखेरपर्यन्त होती. राजकीय जग सोडून अराजकीय मुंडेजी हे एक रसिक नाट्यप्रेमी, प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते. राजकीय वैरी तात्पुरत्या स्वरूपाचं असायचं. मुंडे-महाजन आणि विलासराव या मैत्रीचे खुमासदार किस्से सर्वश्रूत आहेत. विविध क्षेत्रातल्या व्यक्तींशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी व लोकनेतेपद भूषवण्यासाठी यापेक्षा कोणती वेगळी नीती असेल असं वाटतं नाही.

राजकारणी झालेत व होत राहतील पण असा संघर्ष करणारे, बहुजनांसाठी तळमळीने काम करणारे, त्यांच्या मनावर अधिराज्य करणारे, लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडेजी परत नाही होऊ शकत. इन्फोबझ्झ कडून या लोकनेत्याला ही लेखरूपी आदरांजली!.!.!

Leave A Reply

Your email address will not be published.