क्रिकेटच्या इतिहासात जेव्हा दोन्ही संघाचे कप्तान एकाच वेळी टॉस जिंकलेले….
दोन्ही संघाच्या कॅप्टनने एकाच वेळी टॉस जिंकणे शक्यच नाही …. हो ना ? पण असं घडलं होतं इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यादरम्यान
क्रिकेट म्हटलं की क्रिकेट फॅन्स आणि कर्णधार या दोघांनाही टॉस आपल्या बाजूने होताना पाहायचे असते. टॉस मुळे सामने गमावल्याचे अनेक किस्से आपण पाहिलेले आणि ऐकलेले आहेत. पण आज आम्ही आपल्याला टॉसबद्दलचा असा किस्सा सांगणार आहोत ज्या सामन्यात दोन कर्णधार एकत्र टॉस जिंकले होते. ते कर्णधार होते अजित वाडेकर आणि गॅरी सोबर्स.
आता तुम्ही म्हणाल हे कसे काय शक्य आहे ? तर हे शक्य झाले होते सन १९७१ मध्ये इंडिया विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी सामन्यामध्ये, जेव्हा टीम इंडिया वेस्ट इंडीजच्या दौर्यावर गेली होती.
याच मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सुनील गावस्कर यांनी डेब्यू केला होता आणि भारतीय क्रिकेटला एक लिटिल मास्टर मिळाला होता. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला होता. क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या विंडीजचा भारताविरुद्धचा हा पहिला कसोटी पराभव, पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला, तिसरा आणि चौथा कसोटी सामना मात्र अनिर्णीतच राहिला होता.
१३ एप्रिलपासून सुरू झालेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीज कोणत्याही परिस्थितीत पराभवाला सामोरे जाऊ इच्छित नव्हती. त्यादिवशी कसोटी सामना दूर राहिला पण दोन्ही कर्णधार म्हणजेच गॅरी सोबर्स आणि अजित वाडेकर यांना कुठल्याही परिस्थितीत टॉस जिंकायचाच होता. मागील सामन्यात सोबर्स हे १७८ नाबाद खेळले होते. त्याच सामन्यात रोहन कन्हाईनेही चांगली फलंदाजी केली होती.
टॉस जिंकून विंडीज प्रथम फलंदाजी करून मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य उभारु शकते आणि चौथ्या डावात भारताला गॅरी सोबर्स, जॅक नोरिगा आणि डेव्हिड होल्फोर्डच्या गोलंदाजीचा सामना करावा लागू शकतो याची वाडेकरांना पूर्णपणे कल्पना होती जे की त्यांना नको होते. कारण पोर्ट ऑफ स्पेनची खेळपट्टी फिरकीपटूंना उपयुक्त होती आणि पाचव्या दिवशी तेथे फलंदाजी करणे सोपे नसायचे.
या सामन्याच्या सुरुवातीला टॉस करण्याची वेळ आली. नाणे हवेत भिरकावण्यात आले. संपूर्ण मालिकेत ‘हेड्स’ बोलत आलेल्या Ajit Wadekar यांनी टॉससोबत पलटी मारली आणि ‘टेल्स’ असा आवाज दिला. सोबर्स यांचे पूर्णपणे लक्ष फिरत्या नाण्यावर लागले होते, त्यांनी वाडेकरांचा आवाज ऐकला नाही. या संपूर्ण मालिकेत सोबर्स यांनी वाडेकर यांच्याकडून केवळ हेड्स ऐकले होते.
नाणे खाली पडले आणि निकाल आला टेल्स. Garry Sobers यांना वाटले की त्यांनी टॉस जिंकला. इकडे वाडेकर आनंदी होत होते की नाण्याचा कौल त्यांच्या बाजूने आला. आता टॉस जिंकल्यावर मग सांगायलाचं हवे की काय निवडणार ? त्यावर दोन्ही कर्णधार एकत्र म्हणाले – बॅटिंग. आता मात्र सर्व आश्चर्यचकित झाले की दोन्ही संघ एकत्र फलंदाजी कशी करतील. दोन्ही कर्णधार बराच वेळ उभे राहिले. काय करावे ते सुचेना ? शेवटी सोबर्स यांनी निकाल मान्य केला आणि भारताने प्रथम फलंदाजी केली.
क्रिकेटच्या मैदानाबाहेर असलेलं अजित वाडेकर आणि गॅरी सोबर्स यांचं नातं
हे झालं क्रिकेटच्या मैदानावरील सोबर्स आणि वाडेकरांचे असलेले नाते. पण सोबर्स यांनी वाडेकरांचे का ऐकले, यामागेही एक किस्सा आहे. खरं तर अजित वाडेकर सोबर्स यांना आपले आदर्श मानत असत तसेच सोबर्स यांच्याही हृदयात वाडेकरांबद्दल विशेष स्थान होते. सोबर्स आणि वाडेकर यांच्यातील या ऋणानुबंधाची कहाणी १९६६-६७ मध्ये सुरू झाली होती.
वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर होता. या मालिकेचा पहिला सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार होता. सामन्यापूर्वी नेट सरावादरम्यान सोबर्सने एका तरुण भारतीय मुलाला फलंदाजी करताना पाहिले. सोबर्स त्या मुलाकडे काळजीपूर्वक पाहत होते.
जेव्हा त्यांचे लक्ष त्या मुलाच्या शूजकडे गेले जे शूज वाईटरित्या फाटलेले होते. सोबर्सने त्या मुलाला विचारले, “तू उद्याचा कसोटी सामना खेळणार आहेस का ?” उत्तर मिळाले, “होय!” मग तू हे फाटलेले शूज का घातले आहेस ? “हे माझे लकी शूज आहेत.” हे उत्तर ऐकून सोबर्स काहीच न बोलता तेथून निघून गेले.
या संदर्भात Ajit Wadekar यांनी एकदा ईएसपीएन क्रिकइन्फोशी संभाषणादरम्यान सांगितले होते की डिसेंबर १९६६ मध्ये मी ब्रेबॉर्नवर कसोटी पदार्पणाच्या तयारीसाठी नेट सराव करत होतो तेव्हा मी फाटलेल्या शूजची जोडी घातली होती. माझ्या कॉलेजच्या काळापासून हे शूज माझ्याकडे होते. मला वाटायचे की हे शूज माझ्यासाठी लकी आहेत.
एकदा मी सराव करत असताना एक माणूस माझ्याकडे आला आणि त्याने विचारले की मी हा कसोटी सामना खेळणार आहे का ? मग त्याने माझ्या शूजची साईजही विचारली. जेव्हा मी माझ्या घरी पोहोचलो तेव्हा माझ्या आईने सांगितले की एक माणूस आला होता. ज्याने मला हे एक जोडी शूज दिले. त्याने त्याचे नावही आईला सांगितले पण यानंतरही माझी आई त्याला ओळखू शकली नाही. तो व्यक्ती इतर कोणीही नसून Garry Sobers होते.
कोण कुठला वेस्ट इंडिजचा कर्णधार आणि त्यांनी वाडेकरांचे घर शिवाजी पार्कमध्ये शोधून त्यांच्या आईला शूज दिले. ही वाडेकर यांच्यासाठी खूप आनंदाची तसेच आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती. ही वेगळी बाब आहे की या शूजमध्ये करिअर सुरू करणे वाडेकरांसाठी लकी ठरले नव्हते कारण त्यांच्या पहिल्या कसोटी सामन्यातच त्यांना फक्त आठ आणि चार धावा करता आल्या होत्या.
पण गॅरी सोबर्स यांनी वाडेकर यांच्या प्रती जो जिव्हाळा दर्शवला यातून ते एक खेळाडू सोबतच एक उत्तम माणूस देखील होते हे स्पष्ट झाले.