Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

राणी एलिझाबेथबद्दल जाणून घ्या ही रंजक माहिती…

सध्या लोकशाहीच्या काळ असूनही काही ठराविक राजघराण्यांचा रूबाब अजूनही अबाधित आहे, ब्रिटनचं राजघराणं त्यापैकीच एक. साहेबांच्या देशात महिला राज आल्याची बातमी आपण वाचलीच असेल. लिझ ट्रस (Liz Truss) या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. तर राज्याच्या प्रमुखपदी ब्रिटनची महाराणी (Queen of Great Britain) असते. परंतु महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth II) यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी आजारपणामुळे निधन झालं. बंकिंगहॅम पॅलेसने ही बातमी प्रसिद्ध केली. या महाराणीचं व्यक्तिमत्व , तिची कारकीर्द सर्वच अनोखं होतं. जाणून घेऊयात तिच्याबद्दलची काही रंजक माहिती.

राणी एलिझाबेथ कधीच शाळेत गेली नाही.

राणी अशिक्षित होती असा याचा अर्थ अजिबात नाही. राणीला घरी येऊन खाजगी शिक्षकांनी शिकवले होते. तिची धाकटी बहीण प्रिन्सेस मार्गारेट हिच्या बाबतीतही असेच झाले.

राणीने महायुध्दात चालवला होता ट्रक

ब्रिटनच्या तत्कालीन राजाची राजकन्या असणाऱ्या एलिझाबेथ अॅलेक्झॅंड्रा मेरी हिने दुसऱ्या महायुद्धात (World war II) ट्रक ड्रायव्हर आणि मेकॅनिक म्हणून स्वेच्छेने काम केले होते. सैन्यात सेवा करणारी शाही कुटुंबातील ती पहिली महिला सदस्य बनली.

तिचा मुकुट लग्नाच्या दिवशी तुटला.

हिरेजडीत मुकुट दुरुस्त करण्यासाठी खास शाही जवाहिर कोर्ट ज्वेलर्सला ताबडतोब बोलवावे लागले.   समारंभासाठी वेळेत यशस्वीरित्या हा मुकुट दुरुस्त करून पुन्हा घातला गेला.

लग्नातील शाही पोशाख कूपन देऊन खरेदी केला.

दुसऱ्या महायुद्धाबाबत बोलायचे झाले तर, यूकेमध्ये युद्धानंतर केल्या गेलेल्या उपायांमुळे, तत्कालीन राजकुमारी एलिझाबेथला तिच्या लग्नाच्या पोशाख खरेदी करण्यासाठी कपड्यांचे रेशन कूपन वापरावे लागले. ब्रिटिश परंपरेनुसार, सरकारने एलिझाबेथ यांना २०० अतिरिक्त रेशन कूपन देण्यात आले होते.

तिचं लग्न नात्यात झालं होतं.

महाराणी एलिझाबेथ आणि राजपुत्र फिलिप तिसरे (Prince Philip III) हे एकमेकांची भावंडं होती . एलिझाबेथ तिच्या वडिलांचं आणि फिलिप त्याच्या आईचं बाजूने राणी व्हिक्टोरियाशी नातं होतं.फिलिपचा जन्म ग्रीस आणि डेन्मार्कच्या राजघराण्यांमध्ये झाला होता परंतु जेव्हा त्याने एलिझाबेथशी लग्न केले तेव्हा त्याने आपल्या मूळ पदव्यांचा त्याग केला. फिलीप आणि एलिझाबेथ यांनी ७३ वर्षे संसार केला.

यूकेच्या पाण्यात पोहणारे सर्व हंस आणि डॉल्फिन तिच्या मालकीचे होते.

राजघराण्याच्या अधिकृत वेबसाइटनुसार, पूर्वी, पक्षी एक चविष्ट पदार्थ मानले जात होते. १२ व्या शतकाच्या सुरूवातीस, ब्रिटीश राजघराण्यानं देशातील सर्व हंसांवर दावा केला होता. सध्या, राणी ते हंस खात नव्हती, परंतु तांत्रिकदृष्ट्या सारे हंस अजूनही त्यांच्या मालकीचे आहेत. दरवर्षी, क्वीन्स स्वान मार्कर पक्ष्यांची गणना करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी स्वान अपिंग नावाच्या बहु-दिवसीय गणना अभियानाचे नेतृत्व ती करत होती. राणीला सर्व रॉयल माशांच्या मालकीचा दावा देखील करण्याचाही अधिकार होता. इ.स. १३२४ चा असा कायदाच आहे. यूकेच्या आसपासच्या पाण्यात राहणारे कोणतेही स्टर्जन, डॉल्फिन, व्हेल आणि पोर्पोइसेस अशा माशांवर हक्क दाखवू शकत होती.

राणीकडे संपत्ती खूप होती परंतु ती यूकेमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नव्हती.

राणीला करदात्यांकडून काही पैसे मिळाले आणि राजघराण्यातील खाजगी स्थावर मालमत्तेमधून आणखी काही रक्कम मिळाली. २०१९ च्या फोर्ब्सच्या अंदाजानुसार तिची किंमत सुमारे ५०० दशलक्ष डॉलर होती. परंतु तरीही राणी  यूकेमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नव्हती.

तिच्याकडे पासपोर्ट किंवा वाहन चालवण्याचा परवाना नव्हता.

ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट दोन्ही राणीच्या नावाने जारी केले जातात, त्यामुळे तिला सुद्धा गरज नाही. ती सफाईदारपणे गाडी चालवत होती. तिने एकदा लँड रोव्हरमध्ये बसून सौदी अरेबियाचे प्रिन्स अब्दुल्लाला तिच्या देशाच्या एका मालवत्ता दाखवली होती.

तिच्यावर खटला चालवला जाऊ शकला नाही किंवा कोर्टात साक्ष देण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही.

राणी असल्याने तिला बरेच भत्ते मिळत असत. एलिझाबेथने कधीही या अधिकाराचा गैरवापर केल्याचे दिसले नाही. राजघराण्यातील वेबसाइटवर एक विधान आहे, ” महाराणी विरोधात दिवाणी आणि फौजदारी कारवाई केली जाऊ शकत नाही. तरीही राणी तिच्या वैयक्तिक उपक्रमांबद्दल अत्यंत काळजी घेत असे आणि सर्व गोष्टी कायद्यानुसार कठोरपणे पार पाडल्या जात. म्हणून कोणत्याच प्रकारच्या कारवाईची गरज पडली नसावी.

राणी एलिझाबेथची स्वतःची बार्बी डॉल होती.

सम्राज्ञीचा वाढदिवस आणि सिंहासनावर ७० वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी, बार्बीने (Barbie Doll) राणी एलिझाबेथची प्रतिकृती असणारी शाही बाहुली बनवली.

तिने १९८९ पासून तीच नेलपॉलिश वापरले.

सर्वात शक्तीशाली राजघराण्याची प्रमुख असूनही राणी एलिझाबेथने एकच नेलपॉलिश गेले ३० वर्षांहून अधिक काळ वापरले. याची किंमत केवळ ७ डॉलर इतकी आहे. म्हणजे ही नेलपॉलिश खूप स्वस्त आहे. 

तिने खूप दिवस राज्य केले.

१९५२ मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर एलिझाबेथ राजगादीवर विराजमान झाली. तिने जवळपास ७० वर्षे राज्य केले. तिच्या राज्यारोहणाप्रसंगी असणाऱ्या लोकांपैकी ८१% जनता आता हयात नाही. त्या काळातील दर पाच ब्रिटिशांपैकी चार जण मृत झालेले आहेत. तिने आजवर १५ ब्रिटिश पंतप्रधान आणि १४ अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना पाहिले. नुकतीच ६ सप्टेंबर रोजी सध्याच्या नवनियुक्त पंतप्रधान लिझ ट्रस यांचीही भेट घेतली होती.

अलीकडेपर्यंत ती रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास शॅम्पेन प्यायची.

राणीची चुलत बहीण मार्गारेट रोड्सने एकदा सांगितले की राणीचे तिच्या अल्कोहोलच्या सेवनावर कठोर नियम आहेत.  पुर्वी राणी काही ठराविक प्रसंगी दुपारच्या जेवणापूर्वी लिंबाचा तुकडा आणि भरपूर बर्फासह जिन आणि डुबोनेट घेत असे. दुपारच्या जेवणासोबत वाईन आणि संध्याकाळी ड्राय मार्टिनी आणि एक ग्लास शॅम्पेन घेत असे. तथापि, ऑक्टोबर २०२१ मध्ये, एक अहवाल आला की ९५ वर्षीय  राणीला डॉक्टरांनी तिला रोजचे मद्यपान सोडून त्याऐवजी पाणी आणि रस घेण्याचा सल्ला दिला होता.

तर अशा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आणि जागतिक इतिहासातील महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार असणाऱ्या या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना भावपूर्ण श्रद्धांजली..


Leave A Reply

Your email address will not be published.