Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या मृत्यू वेळीचा थरारक प्रसंग

ती लढाई लक्ष्मीबाईंची शेवटची लढाई होती. “मै अपनी झांसी नहीं दूंगी” म्हणत शेवटपर्यंत ब्रिटिशांना शरण न गेलेल्या राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनातील अखेरच्या युद्धाला शब्दबद्ध करण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न.

कॅप्टन रॉड्रिट ब्रिग्स, हा पहिला ब्रिटिश होता ज्याने राणी लक्ष्मीबाईंना रणांगणात लढतांना प्रत्यक्ष पहिले होते. तो क्षण जसाच्या तसा मांडतांना कॅप्टन रॉड्रिट लिहितात. “आपल्या घोड्याचा लगाम राणीने आपल्या दातांमध्ये धरला होता व आपल्या दोन्ही हातांनी त्या तलवार चालवत होत्या.” अखेर राणी लक्ष्मीबाईंना रोखण्यासाठी स्वतः कॅप्टन रॉड्रिट ब्रिग्स पुढे सरसावले. कॅप्टन रॉड्रिट ब्रिग्स राणीवर वार करण्याच्या तयारीतच होते पण तेवढ्यात राणी लक्ष्मीबाईंच्या घोडेस्वारांनी राणीला चहुबाजुंनी घेरले व कॅप्टन रॉड्रिट ब्रिग्स ह्यांच्यावरच प्रतिहल्ला चढवला.

राणीचे संरक्षक कवच बनलेल्या अनेक घोडेस्वारांना मारल्यानंतर व काही जणांना जखमी केल्यानंतर कॅप्टन रॉड्रिट ब्रिग्स पुन्हा एकदा राणी लक्ष्मीबाईंवर हल्ला करण्यासाठी पुढे झेपावले व त्यांना साथ मिळाली ती जनरल रोज ह्यांच्या उंटाच्या तुकडीची. ह्या तुकडीच्या युद्धात उतरण्यामुळे ब्रिटिशांमध्ये पुन्हा एकदा जोश संचारला व ते सर्व ताकदीने राणी व तिच्या सैन्यावर तुटून पडले. राणीचे सैनिक तरीसुद्धा युद्धातून पळाले नाही पण त्यांची संख्या मात्र आता कमी झाली होती. युद्ध निर्णायक टप्प्यावर येऊन पोचले होते.

ह्या लढाईत सहभागी झालेल्या अजून एका ब्रिटिश सैनिकाने जॉन हेनरी सिल्वेस्टरने आपल्या “रिकलेक्शन्स ऑफ द कॅम्पेन इन माळवा अँड सेंट्रल इंडिया” या पुस्तकात ह्या लढाईचे वर्णन करतांना लिहिले ते पुढीलप्रमाणे “अचानक राणीने आपल्या घोडेस्वारांना आदेश दिला कि “माझ्या मागे या” राणीच्या आदेशानुसार पंधरा घोडेस्वारांची एक तुकडी राणीच्या मागे गेली. राणी व तिच्या घोडेस्वारांची हालचाल इतकी वेगवान होती कि काही क्षण ब्रिटिश सैनिक अवाक होऊन पाहतच राहिले, तेवढ्यात कॅप्टन रॉड्रिट ब्रिग्स जोऱ्यात ओरडला “दैट्स दि रानी ऑफ़ झाँसी, कैच हर” तोपर्यंत राणी लक्ष्मीबाई व त्यांच्या घोडेस्वारांनी जवळजवळ मैलभर अंतर पार केले होते.

अखेर ब्रिटिशांनी राणी व तिच्या सैनिकांना गाठले व लढाईला नव्याने सुरुवात झाली. राणीच्या सैनिकांपेक्षा ब्रिटिश सैनिक संख्येने दुप्पट होते. तुंबळ युद्ध सुरु झाले. राणी लक्ष्मीबाई पुन्हा एकदा त्वेषाने लढत होत्या. लढत लढता अचानक राणीला आपल्या डाव्या बाजूला छातीवर कुणीतरी वार केल्याचे जाणवले. एका ब्रिटीश सैनिकाने आपल्या बंदुकीच्या पुढील टोकावर लावलेल्या चाकूने राणीच्या छातीवर वार केला. राणी जखमी झाली होती. तश्याच परिस्थितीमध्ये राणीने घोडदौड सुरूच ठेवली. थोड्याच अंतरावर एक छोटासा ओढा लागला. राणी लक्ष्मीबाई तो ओढा पार करून जाण्याच्या प्रयत्नात असतांनाच एक बंदुकीची गोळी त्यांच्या डाव्या बाजूला कमरेमध्ये घुसली. ह्या बंदुकीच्या गोळीचा वार मात्र जबरदस्त होता.

राणीच्या डाव्या हातातील तलवार हातातून निसटली व जमिनीवर पडली, जखम गंभीर होती. तितक्यात अजून एक ब्रिटिश सैनिक राणीच्या घोड्याजवळ आला व त्याने राणीवर तलवारीने जोरदार वार केला. हा तलवारीचा वार इतका घातक होता कि राणी लक्ष्मीबाई घोड्यावरून खाली कोसळल्या.

राणीच्या एका सैनिकाने राणी लक्ष्मीबाईंना उचलले व जवळच्या एका मंदिरात तो तिला घेऊन गेला. राणी लक्ष्मीबाईंचा श्वास अद्याप चालू होता. मंदिरातील पुजाऱ्याने गंगाजलाची धार राणी लक्ष्मीबाईंच्या मुखामध्ये धरली. बाहेर प्रचंड गोळीबार सुरु होता. कॅप्टन रॉड्रिक ओरडला “ते मंदिरात गेले आहेत त्यांच्यावर हल्ला करा, राणी अजून जिवंत आहे” इकडे हळूहळू राणी लक्ष्मीबाईंची प्राणज्योत विझू लागली. राणीची इच्छा होती कि आपले पार्थिव शरीर ब्रिटिशांच्या हाती पडू नये. ती इच्छा कशीबशी तिने आपल्या सैनिकाला बोलून दाखवली व अखेर तो क्षण आला. मंद मंद होत जाणारा राणी लक्ष्मीबाईंचा श्वास अखेर थांबला.

झाशीची राणी झांशीला सोडून गेली होती. लढाई संपली, मृत्यूशी चालत असलेली झुंज अखेर संपली होती. राणीच्या सैनिकांनी घाईघाईने राणीचा अंतिम संस्कार केला व राणीचे पार्थिव शरीर ब्रिटिशांच्या हाती लागू दिले नाही.


2 Comments
  1. राजु कटके says

    खूप लड़ी मर्दानी ओ झासी वाली रानी थी

  2. MAHESH MANE says

    Khup rag eto Ami atta jalmala Alo te ..teyakali sagleyni dushmanshi ladat aple pran gamvle ..atta apn kahich Karu shkat nahi yecha rag eto ..attche rajkarn khup vichitar ahe …as vhtat ki rajshai pahije

Leave A Reply

Your email address will not be published.