Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

काश्मीरच्या राजाला एका ब्रिटिश महिलेनं चांगलंच गंडवलेलं… किस्सा मोठा मनोरंजक आहे

जगाचं ज्ञान व्हावं म्हणून अगदी कोवळ्या वयात असणारे काश्मीरचे राजकुमार यांना ३ वर्षांसाठी युरोपला पाठवण्यात आलं. परंतु तिथे जे घडलं ते फारच अजब होतं

पूर्वीच्या राजा-महाराजांचा थाट काही औरच असायचा ! यांचं राहणं, खाणं-पिणं, वागणं…. इतकंच काय बोलणंही अगदी शाही ! नजरेत जरब, चालण्यात तोरा, वागण्यात खानदानीपणा ही यांची वैशिष्ट्यं लक्षवेधी ठरतात.

भारतातील डोगरा वंश असलेले आणि जम्मू काश्मीरचे राजे – प्रतापसिंह यांनी आपल्या पुतण्याला, म्हणजेच राजे हरिसिंग यांना युरोप टूरवर पाठवलं. थोडं थोडकं नव्हे, चक्क तीन वर्षांसाठी ! पुढे त्यांच्याच हाती सत्ता यायची होती म्हणून त्यांना जगाचं ज्ञान व्हावं म्हणून या शिस्तीच्या काकाने आपल्या पुतण्याला परदेशी पाठवलं.

परदेशगमन ! अर्थात पैशाचा तोटा नव्हता, परंतु या अडनिड्या वयात शिकायचंही खूप होतं. हाती सत्ता असणारे हे कोवळे राजपुत्र बहुतांशी वयाच्या मानाने शहाणे असत.

maharaja of Kashmir, maharaja Hari Singh, Jammu and Kashmir, Maharaja Sir Pratap Singh, dogra dynasty, maharaja Hari Singh london story, europe, britain, maharaja hari singh robbed, जम्मू काश्मीरचे महाराजा, महाराजा हरी सिंग, ब्रिटिश महिला
Maharaja Hari Singh of Kashmir

स्वतःचा आब, घराण्याची पत, खानदान, संस्कृती, परंपरा वगैरेंना पाळत त्यांना स्वतःचा वचकही जनतेवर ठेवावा लागे. आणि त्यासाठी त्यांना अतिशय खबरदारीने, योग्य विचार करूनच वागणं गरजेचं असे. साधी, छोटीशी चूकही त्यांना क्षम्य नसे.

अत्यंत साध्या गोष्टीचं राजकारण करून ते समाजात पसरवण्यासाठी या राजे लोकांचे विरोधक नेहमी टपून असत. हरिसिंग त्यावेळी बरेच लहान होते. ऐन विशीत तर त्यांना जम्मूचा मुख्य सेनापती बनवण्यात आलं होतं. त्याआधी म्हणजे १९१८ ते १९२१ या तीन वर्षांसाठी ते परदेशी राहून बरंच काही शिकून आले होते.

परदेशी जातांना त्यांच्याबरोबर त्यांचा एक सेक्रेटर होता…मेहबूब ! राजेंची सगळी व्यवस्था बघायची जबाबदारी त्याची होती. प्रवासात राजांची ओळख एक ब्रिटिश नागरिक आर्थर याच्याशी झाली. एक भारतीय राजा आपल्या युरोपात टूरसाठी आलाय म्हटल्यावर तिथले लोक हरिसिंगांना भेटायला उत्सुक होते.

जेवढा मोठा हुद्दा तेवढे मोठे डोक्याचे तापही असतात. आपल्या भोवती जमा होणारे लोक हे कोणत्या हेतूने आले आहेत, ते केवळ कौतुक म्हणून आले आहेत की आपल्याला इजा पोचवायला आले आहेत हे ओळखणं राजांसाठी गरजेचं होतं.

बऱ्याच जणांचा हेतू त्यांना लुटायचा होता…. परंतु तेथील सरकारचा मानसही असाच काहीसा होता. राजा म्हटलं की विलासीता आलीच असं समाजणारं ब्रिटिश सरकार या प्रसिद्ध राजे लोकांना कुठल्याशा बेसावध क्षणी ट्रॅप करून ब्लॅकमेलिंग करायचं.

नाहीच जमलं तर त्यांच्या मनावर आपल्या पाश्चिमात्य संस्कृतीची अशी खोल छाप सोडायची की ते भारत सोडून तिकडे राहायला, अगदी तिथला धर्म स्वीकारायलाही प्रेरित व्हावेत !! ब्रिटिशांनी भारतातील जनतेला चांगलंच छळलं आणू लुटलं सुद्धा. पण एक असा मराठी राजा होता ज्याने थेट इंग्रजांनाच १ कोटी रुपयांचं कर्ज दिलेलं.

भारतातला अखेरचा शासक – दिलीपसिंग याला असाच बळी पडला होता. त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि इंग्रजी चालीरीती, त्यांची विचारसरणी, त्यांची जीवनशैली याचा एक अविभाज्य भाग बनला.…या सगळ्यात स्वतःला संरक्षित ठेवणं आणि सुखरूप मायदेशी परतणं सोपं नव्हतं.

स्कॉटलांडमध्ये असताना राजे एकदा फ्रांस व इंग्लंड यांच्यातील कुस्तीवीरांमध्ये होणारा कुस्तीचा सामना बघायला गेले. त्यांच्या विषयीची बित्तंबातमी ठेवणारे काही बदमाश त्यांच्या मागावर होते.

सामन्याच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांना लुटायचा या बदमाशांचा डाव होता. परंतु केवळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे ते यातून वाचले…

या एका धक्क्यातून सावरत नाही तोवर त्यांना असाच फसवाफसवीचा अनुभव आला. त्यांच्या रूमवर एक स्त्री आली. नंतर तिचा पती येऊन राजांना धमकाऊ लागला. अशा प्रकारे रूमवर कुण्या स्त्रीचं येणं म्हणजे राजपुत्राच्या प्रतिष्ठेला बाधाच !

शेवटी हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांना हजारो डॉलरचे चेक्स उगाचच द्यावे लागले. यातून सुटलो असं वाटत असतांना ते चेक्स कुणा भलत्याच माणसाने वटवल्याचं वृत्त आलं. त्या स्त्रीच्या पतीने न्यायालयात धाव घेतली !!

खरं तर महाराजा हरी सिंगना या प्रकरणी उगाचच गोवण्यात आलं होतं. एवढ्या मोठया रकमेवर विनाकारण पाणी सोडावं लागलेलं आणि आता केस कोर्टात गेल्याने सगळीकडे बभ्रा झाला ते वेगळं !

चौकशीमध्ये जे समोर आलं ते हैराण करणारं होतं…राजांच्याबरोबर असलेला सेक्रेटरी- मेहबूब, प्रवासात भेटलेला आर्थर, ती स्त्री व तिचा पती…. हे सगळे एकमेकांचे मदतनीस होते!

घरामध्ये वडीलधाऱ्यांच्या छत्रछायेत राहून जे ज्ञान मिळतं त्यापेक्षा बाहेरच्या जगात पडल्यावरचे अनुभव हे फार वेगळे असतात. ते भले आणि बुरेही असू शकतात. परंतु अशा कटू अनुभवांतून माणूस शहाणा बनतो आणि पुढच्या आयुष्यात ठेच लागण्याआधीच सावरतो.

अर्थात आपली काहीएक चूक नसताना आपल्याला वाईट अनुभव येतात. परंतु त्यातून आपण अधिक नियोजनबद्ध वागायला लागतो.

काश्मिर भारतात विलीन झालं तेव्हा राजे हरिसिंग हे सत्तेत होते. मुस्लिमबहुल राज्यावर एका हिंदू राजाने राज्य केलं. अनुभवांची तगडी शिदोरी असल्यानेच त्यांना हे शक्य झालं असावं…..काश्मिरचा भारतात विलय म्हटल्यावर महाराजा हरी सिंग आठवतात आणि त्यांचे किस्सेही !!

Leave A Reply

Your email address will not be published.