Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

घराणेशाहीवर टीका करायची पण गल्ली ते दिल्ली मोदींच्या पक्षातही आहे घराणेशाही… 

देशाने पारतंत्राच्या बेड्या स्वातंत्र्य अनुभवले, या गोष्टीला आता ७५ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव (Azadi ka amrit mahotsav) साजरा करताना पंतप्रधानांनी रीतीप्रमाणे लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले आणि देशाला संबोधित केलं आहे. या भाषणात त्यांनी पंचप्राण सांगितले. १३० कोटींची ‘टीम इंडिया’ त्याबद्दल ते बोलले. आणि भाषणाच्या शेवटी त्यांनी भाई-भतीजावाद, घराणेशाही या मुद्यांना अधोरेखित केलं. घराणेशाही बद्दल ते कायमच बोलत असतात. पण ज्या घराणेशाही विषयाला लक्ष्य करत मोदी (Narendra Modi) सत्तेत आले, ती घराणेशाही त्यांच्या पक्षातही रुजली आहे. ते जरा सविस्तरपणे समजून घेऊयात.

यत्र तत्र घराणेशाही सर्वत्र

आपल्या देशात लोकशाही (Democracy) आहे, पण त्या लोकशाहीचा गाडा ओढण्यासाठी ज्या गाडीवानाच्या हाती दोऱ्या असतात, तो आज गाडा ओढतो आहे खरा पण ती जागा उद्या त्याची मुलं नंतर नातवंडं अशी पिढी दर पिढी पुढं जात राहते. लोकशाहीचा आधार घेऊन ठराविक लोकांच्याच हाती पैसा, अधिकार, संपत्ती, प्रतिष्ठा असते. जनतेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी केवळ काहीच लोकांना मिळते.  काँग्रेस (Congress) सारख्या राष्ट्रीय  पक्षात तर घराणेशाही (Dynasticism) आहेच त्याचबरोबर प्रादेशिक पक्षांनी याला जास्त खत पाणी घातलं आहे. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP), तेलुगू देसम(TDP), द्रमुक (DMK), तृणमूल काँग्रेस (Trinmool Congress), तेलंगणा राष्ट्र समिती (TRS), बिजू जनता दल (Biju Janata Dal), वायएसआर काँग्रेस (YSR Congress), अकाली दल (Akali Dal), नॅशनल कॉन्फरन्स (National Conference), पीडीपी (PDP) असे प्रादेशिक पक्ष याच घराणेशाहीचं फलित आहेत. या प्रादेशिक पक्षांची स्थापना ज्यांनी केली त्यांची पुढची पिढी सध्या या प्रादेशिक पक्षांची धुरा सांभाळत आहे. फक्त दुसरीच नाही तर तिसऱ्या चौथ्या पिढीची राजकारणातली सक्रीयता वाढली आहे. सध्या देशाच्या राजकारणात ईडी (Enforcement Directorate – ED) हा जोरदार चालणारा विषय आहे. या ईडीद्वारे उजेडात येणाऱ्या भ्रष्टाचाराला (Corruption) हवा देण्यासाठी घराणेशाहीचं राजकारण (Dynasty Politics) तितकीच जबाबदार आहे.

दुसऱ्याकडे बोट करताना आपल्याकडे किती बोटं शिल्लक आहेत?

म्हणून या सगळ्याला विरोध करत मोदींनी देशभरात ‘कमळ’ फुलवलं. यु.पी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीच्या २०२२ च्या एका मुलाखतीत प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले होते की लोहियाजींचं (Ram Manohar Lohia) घराणं कुठं दिसतं का? जॉर्ज फर्नांडेस (George Fernandes) यांची गादी चालवायला त्यांचा कोणी वंशज आहे का? नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या कुटुंबातील कोणी राजकारणात दिसतं का? हे सर्वच समाजवादी आहेत. यापुढं जाऊन ते म्हणाले की ही घराणेशाही ही लोकशाहीसाठी धोकादायक आहे.  परंतु हीच संस्कृती आपल्या पक्षातही रूढ झाली आहे, याबद्दल मोदींना जास्त कल्पना नसावी. आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचे पुत्र आमदार आहेत. नारायण राणे यांच्याकडे ही तीच परिस्थिती आहे. मोदींविरोधात ज्यांनी उघड दंड थोपटले ते भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा यांनी २०१४ ते १९ दरम्यान दोन वेगवेगळ्या मंत्री पदांचा कार्यभार सांभाळला. सध्या ते वित्त खात्याच्या स्थायी समितीचे सदस्य आहेत. अनुराग ठाकूर (Anurag Thakur), पीयूष गोयल(Piyush Goyal), ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) हे केंद्रीय मंत्रीमंडळातील अन्य चेहरे देखील याच घराणेशाहीतून तिथपर्यंत पोहोचले आहेत. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सासूबाईंनी मध्य प्रदेश सरकार मध्ये मंत्रीपदावर होत्या. कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे चिरंजीव, मुंडे आणि महाजन यांच्या कन्या,  खडसेंच्या सुनबाई,  कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा एक मुलगा लोकसभेत गेला आहे तर दुसऱ्या मुलाला येत्या निवडणुकीत विधानसभेत पाठवायची तयारी सुरु आहे. महाराष्ट्रातील एकूण खासदारांपैकी एक चतुर्थांश जण घराणेशाहीतून वर आलेले आहेत. आमदारांच्या बाबतीतही संख्या अशीच आहे. धडाडीचं नेतृत्व असणारे फडणवीसही (Devendra Fadanvis) घराणेशाहीतूनच आलेले आहेत. 

कोणत्याही पक्षात तिकीट वाटताना विजयी होण्याची शक्यता, ताकद याचं मुद्यांचा विचार केला जातो. भाजपही (BJP) याला अपवाद नाही. गावकुसातल्या निवडणुका असोत नाहीतर खासदारकीच्या; पदांवर विराजमान होणारी याच नेत्यांची मुलं, नातवंडं, लेकी, सुना, जावई, भाचे, पुतणे हीच मंडळी असतात. पंतप्रधान, भाजपचे पक्षाध्यक्ष कितीही आवाज मोठा करून सांगत असले की भाजप हा घराणेशाहीपासून दूर असणारा पक्ष आहे, तरी त्यांचाही पक्षात घराणेशाही व्यवस्थित रुजली आहे आणि मुरली आहे. पुढच्या काळातही हे चित्र बदलेल, याची शाश्वती देता येत नाही.


Leave A Reply

Your email address will not be published.