शेतकऱ्याला आत्मनिर्भर करण्यासाठी शाहू महाराजांचे हे निर्णय राजकारण्यांनी पाहायलाच हवेत.
करवीर संस्थांनचे छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) खऱ्या अर्थाने लोकराजा होते हे अनेक प्रसंगावरून त्यांनी सिद्ध केले आहे. शाहू राजेंच्या शैक्षणिक, सामाजिक आणि व्यापारी धोरणाबाबत अनेक किस्से सुद्धा फेमस आहेत. एकदा तर खुद्द महाराज म्हणाले की “गरिबांचा राजा हाय मी, असले चोचले मला परवाडायचे नाहीत.” इथे क्लीक करून तुम्ही या प्रसंगाबाबत अधिक वाचू शकता.
असो आजचा मुद्दा आहे शेतकरी. आजच्या या विषयाला तशी दिल्लीमध्ये चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाची किनार पण आहेच. शेतकरी म्हणत आहेत नवीन विधायक अन्यायकारक आहे तर मोदीजी सांगत आहेत की यामुळेच शेतकऱ्यांचा फायदा आहे. आता कोण बरोबर कोण चुकीचं ही चिकित्सा आपण इथं करणार नाही पण उठता बसता शेतकऱ्याच्या नावाने राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना गेल्या 70 वर्षात अजूनही शेतकऱ्याला आत्मनिर्भर करता आले नाही ही तशी विचार करायला लावणारी गोष्ट. सरकार कोणाचेही असो काँग्रेस किंवा भाजप, राज्य किंवा केंद्र. सगळ्यांना स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी सरकारची आठवण येते हेच त्रिकालाबाधित सत्य.
भारतीय शेतकऱ्याला खरंच आत्मनिर्भर करायचे असेल तर करवीर छत्रपती शाहू महाराजांच्या शेतकरी धोरणांनाचा गृहपाठ या सगळ्या नेत्यांनी करायलाच हवा.
शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) 1910 च्या काळात शेतकऱ्यांसाठी घेतलेले हे निर्णय तुम्हीच वाचा आणि ठरवा खरंच राजकीय पक्ष योग्य शेतकरी धोरण आखत आहेत का.
एकदा शाहू महाराजांना समजले, युरोपात वेगळ्या पद्धतीने शेती करून आपल्या पेक्षा अधिक उत्पन्न घेतले जाते. महाराजांनी स्वतः युरोपात जाऊन त्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. तिथं जाऊन त्यांना समजलं की याला शास्त्रीय शेती म्हणतात आणि यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढेल.
आपल्याही शेतकऱ्यांना अश्या आधुनिक ज्ञानाचा वेळोवेळी प्रसार झाला पाहिजे या हेतूने महाराजांनी अनेक उपक्रम हाती घेतले. 1912 ला कोल्हापुरात किंग एडवर्ड अग्रीकल्चर इस्टिट्यूट स्थापन करण्यात आली. आधुनिक शेती अवजाराचे म्युझीयम सुरू करून त्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
शेतकऱ्यांना सुधारित अवजारे, बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्यात आली तसेच आधुनिक मशागतीच्या पद्धती यांचे ज्ञान आणि प्रशिक्षण मिळावे म्हणून खास शेतकरी अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या.
शेतकरी प्रदर्शन सुद्धा भरवण्यात येऊ लागली पण त्याला प्रतिसाद मिळेना म्हणून महालक्ष्मी रथोत्सव आणि जोतिबाच्या यात्रा असताना ही प्रदर्शने भरवण्यात आली आणि याला तुफान प्रतिसाद मिळू लागला. आजही कोल्हापुरात दरवर्षी अशी प्रदर्शने भरवण्यात येत्यात. अश्या प्रदर्शनमधून शेतकऱ्याला आधुनिक साधने, उत्कृष्ठ धान्याचे नमुने आणि माहितीपत्रके मिळू लागली.
शेतीला जोडधंदा म्हणून यात पुढे जनावरांचे प्रदर्शन सुद्धा भरू लागले. विविध जनावरांच्या जातीची माहिती यात देण्यात येऊ लागली. त्यांना देण्यात येणाऱ्या खाद्याची माहिती देण्यात येऊ लागली.
शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे म्हणून महाराजांनी कोल्हापुरात ठीक ठिकाणी छोटे मोठे धरण बांधून घेतली. महाराजांच्या या दूरदृष्टीमुळे कोल्हापुरात कधी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही.
आज कोल्हापूरचा शेतकरी हा श्रीमंत शेतकरी म्हणून ओळखला जातो तो छत्रपती शाहू राजेंच्या या दूरदृष्टीमुळेच.