Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

ह्या ४ कारणांमुळे फाशीची शिक्षा सूर्योदयापूर्वीच दिली जाते

आपल्या देशात सुरुवातीपासूनच फाशीची शिक्षा हि मृत्युदंडाची शिक्षा म्हणून देण्यात येते. पण काही देशांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा दिली जात नाही. अत्यंत क्रूर अपराधासाठीच आपल्याकडे मृत्युदंड दिला जातो. यातही भारताचे राष्ट्रपती मृत्यूदंडाची हि शिक्षा कमी करू शकतात, रद्द करू शकतात, किंवा काही दिवसांसाठी पुढे देखील ढकलू शकतात.

भारतीय दंड विधानानुसार फाशीची शिक्षा देण्याचे काही नियम तयार करण्यात आलेले आहेत. याच नियमांना धरून भारतात फाशी दिली जाते. काय आहेत हे नियम जाणून घेऊयात……

कायद्याच्या दृष्टीने ज्या व्यक्तीने अत्यंत गंभीर अपराध केलेला असेल अशा व्यक्तीला मृत्युदंड दिला जातो आणि संविधानिक दृष्टीने देखील याला भारतात मान्यता आहे. जर व्यक्तीचा अपराध हा गंभीर असेल आणि कोर्टासमोर त्याने केलेला अपराध पुराव्यांशी सिद्ध झाला तर भारतीय दंड विधानानुसार त्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. इतरही अनेक शिक्षा दिल्या जाऊ शकतात उदाहरणार्थ जन्मठेप, अनेक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, ई.

कुठल्याही न्यायाधीशासाठी मृत्यूदंडाची शिक्षा देणं हे सोपं काम नक्कीच नसतं, अत्यंत गंभीरपणे हा निर्णय त्यांना घ्यावा लागतो. त्यामुळेच, मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावल्यानंतर न्यायाधीश तो पेन तोडून टाकतात परंतु वर सांगितल्याप्रमाणे मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याचे काही नियम आहेत. मृत्यूदंडाची शिक्षा ही सूर्योदयाच्या पूर्वी दिली जाते.

आपल्या सर्वांना कल्पना आहे की मृत्युदंडाची शिक्षा तेव्हाच दिली जाते जेव्हा अपराध क्षमा योग्य नसेल आणि अशा क्षमा योग्य नसणाऱ्या अपराधाच्या शिक्षेसाठी काही नियम तयार करण्यात आलेले आहेत. यातील मृत्युदंडा साठी एक ठराविक वेळ निर्धारित करण्यात आलेली आहे, तुम्ही नेहमी ऐकलं असेल की मृत्यूदंडाची शिक्षा ही सूर्योदयापूर्वीच दिली जाते.

फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करायच्या आधी काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जातात उदाहरणार्थ अपराध्याला फाशीची शिक्षा देण्यापूर्वी त्याला नवीन कपडे दिले जातात. त्याला जर कुठलं धार्मिक पुस्तक वाचायची इच्छा असेल तर ते पुस्तक देखील त्याला उपलब्ध करून दिलं जातं.

त्याच्या आवडीचं जेवण मागवण्यात येतं आणि त्याची शेवटची इच्छा विचारली जाते. अशा अनेक गोष्टींची पूर्तता केल्यानंतरच गुन्हेगाराला फाशीची शिक्षा ठोठावण्यात येते.

फाशीची शिक्षा शिक्षण सूर्योदयापूर्वी दिल्या जाण्याची चार कारणं सांगितली जातात कायदेशीर, प्रशासकीय, सामाजिक आणि नैतिक.

कायदेशीर कारण

गुन्हेगाराला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यापूर्वी त्याला जेलमध्येच ठेवण्यात येतं आणि याच परिसरात संपूर्ण कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली जाते. यासाठी प्रशासनाला देखील काही नियम पाळावे लागतात.

पोलीस अनुसंधान एवं विकास ब्युरो (BPR &D): भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या कायद्यानुसार मृत्यूदंडाची शिक्षा ही सूर्योदयापूर्वीच दिली गेली पाहिजे. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये देखील भारतीय कायद्यात ठरलेल्या वेळेप्रमाणे फाशीची शिक्षा दिली जाते.

सामाजिक कारण

फाशी दिल्यामुळे भारतीय समाजावर चुकीचा प्रभाव पडू नये याचा विचार करूनच फाशीची शिक्षा सूर्योदयाच्या आधीच दिली जाते. सकाळी सर्वसामान्य नागरीक शक्यतो तणावमुक्त आयुष्य व्यतीत करत असतो आणि त्यासोबतच मीडिया देखील एवढ्या सकाळी ऍक्टिव्ह नसते त्यामुळेच समाजावर कुठल्याही चुकीचा प्रभाव निर्माण होऊ नये यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे.

प्रशासकीय कारण

प्रशासकीय दृष्ट्या जर सूर्योदयापूर्वीच फाशीची शिक्षा देण्यात आली तर त्या गोष्टीचा दिवसभरातील इतर कामांवरती परिणाम होणार नाही याचा विचार करूनच फाशीची शिक्षा सूर्योदयापूर्वी दिली जाते.

शिक्षा देण्यापूर्वी जेल प्रशासन अनेक प्रक्रिया पूर्ण करत असते. गुन्हेगाराची मेडिकल टेस्ट केली जाते, त्यानंतर अनेक रजिस्टरमध्ये त्याची नोंदही करण्यात येते. शिक्षेची अंमलबजावणी झाल्यानंतर गुन्हेगाराच्या शरीराची टेस्ट केली जाते.

डॉक्टरांमार्फत शिक्षा पूर्ण झाले आहे की नाही याची तपासणी केली जाते आणि नंतर मृतदेह परिवाराकडे सुपूर्त केला जातो. या सर्व प्रक्रियेला खूप मोठ्या प्रमाणात वेळ आवश्यक असतो.

नैतिक कारण

एक समज असा देखील आहे की अपराध्याला दिवसभर मृत्यूची वाट पहावी लागू नये म्हणून सूर्योदयापूर्वीच शिक्षेची अंमलबजावणी केली जाते कारण दिवसभर मृत्यूची वाट पाहत असताना त्याच्या मानसिक स्वास्थ्य वरती परिणाम होऊ शकतो.

अपराध्याला शिक्षेच्या काही तासांपूर्वी उठवलं जातं जेणेकरून तो इतर सर्व दैनंदिन क्रिया पुर्ण करू शकेल. जर त्याला कुठली धार्मिक प्रार्थना पूर्ण करायची असेल तर ती प्रार्थना पूर्ण करूनच तो फाशीवर जाऊ शकेल.

या चार कारणांमुळेच मृत्यूदंडाची फाशीची शिक्षा ही सुर्योदयापूर्वी देण्याचं निश्चित करण्यात आलेला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.