Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

तिन्ही सैन्यदलांची सॅल्यूट करण्याची पद्धत वेगवेगळी का आहे ?

इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एयर फोर्स ही तिन्ही दलं एकाच सैन्याचा भाग असताना त्यांच्या Salute करण्याच्या पद्धतीमध्ये वेगळेपणा का ?

सैन्य दलाच्या कार्यक्रमांमध्ये किंवा मग प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनामध्ये आपल्या विविध दलांचा एकदम कडक असा सॅल्युट पाहिला की अंगात दहा हत्तींच बळ आल्याशिवाय राहत नाही. उर अभिमानाने भरुन यावा असा हा सॅल्युट असतो.

मात्र हे सर्व डोळे निरखून पाहत असताना एक प्रश्न मनात सतत घोंगवत राहतो, तो म्हणजे इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एयर फोर्स ही तिन्ही दलं एकाच सैन्याचा भाग असताना त्यांच्या Salute करण्याच्या पद्धतीमध्ये वेगळेपणा का ? हा प्रश्न जरी अतिशय साधा वाटत असला तरी त्याचं उत्तर फार रोचक आहे.

रोमन काळात सैनिक आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सलामी देण्यासाठी डोक्यावरची टोपी हातात घेऊन, थोडं वाकून सलामी देत असत. कालांतराने ह्यात बदल होत गेले आणि आता तिन्ही सैन्यदल आपल्या हाताच्या पंज्याने सलामी देतात.

चला तर मग, क्षणाचाही विलंब न करता जाणून घेऊया तिन्ही सैन्य दलाची सलामी देण्याची पद्धत वेगवेगळी का ?

भारतीय भूदल (Indian Army)

बॉर्डर, एलओसी या सिनेमांमध्ये आपण जवानांना सॅल्यूट करताना लहानपणापासून बघत आलोय. तुम्ही नीट निरीक्षण केलं असेल तर भारतीय भूदलात सॅल्युट करतेवेळी हाताचा पंजा पुढील बाजूस केला जातो. सर्व बोटं एकमेकांशी जोडलेले असतात आणि हाताच्या मधले बोट हॅटबँड किंवा भूवयाच्या वरील भागास स्पर्श करत असते. अशाप्रकारे सॅल्युट करुन हे दर्शविले जाते की सॅल्युट करणाऱ्या व्यक्तीचा कुठलाही चुकीचा किंवा गुप्त इरादा नाही आणि तो निशस्त्र आहे.

आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सॅल्यूट करून त्यांच्यावर विश्वास आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याची हि पद्धत आहे.

Indian Army Salute

भारतीय नौदल (Indian Navy)

नौदलात सॅल्युट करताना हाताचा पंजा जमिनीच्या दिशेने ९० डिग्री झुकलेला असतो. यामुळे Salute करताना पंजाचा तळवा पूर्णतः झाकला जातो. आता आपल्याला असा प्रश्न पडणं साहजिक आहे कि नौदलात पंजा खालच्या बाजूला ठेऊन सॅल्यूट (Salute) का केले जाते. अशाप्रकारे सॅल्युट करण्यामागचा इतिहास असा की पूर्वी जहाजावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हात ग्रीस किंवा ऑईलने खराब व्हायचे. त्यामुळे अशा खराब हातांनी सॅल्युट करताना वरिष्ठांचा अपमान होऊ नये. यासाठी हाताचा पंजा जमिनीच्या दिशेने झुकवून सॅल्युट केला जायचा. पुढे हीच पद्धत नौदलात रुढ झाली.

भारतीय हवाई दल (Indian Air Force)

भारतीय हवाई दलाची सॅल्युट करण्याची पद्धत आधी भूदलासारखीच होती. मात्र २००६ साली त्यामध्ये बदल करण्यात आला. नव्या पद्धतीनुसार नौदलामध्ये सॅल्युट करताना हाताचा पंजा ४५ डिग्री झुकलेला असतो, जो हवाई दलाची आकाशाच्या दिशेने असलेली प्रगती दर्शवतो. हवाई दलाने सॅल्युटची ही नवी पद्धत स्वीकारण्यामागे त्यांचीही इतर दोन दलांप्रमाणेच स्वतःची खास पद्धत असावी हा हेतू होता.

Indian Air Force Salute

आमचा हा लेख वाचून आपली तिन्ही दलं वेगवेगळ्या प्रकारे सॅल्युट (Salute) का करतात या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नक्कीच मिळाले असेल. तेव्हा पुढच्या वेळी हा प्रश्न कोणाला पडल्यास त्याला ही सर्व माहिती नक्की द्या ! तसेच कुणाला वाटत असेल कि सैन्यदलात सलामी देणे हि निव्वळ एक पद्धत आहे तर त्यांना हा लेख वाचायला द्या आणि सॅल्यूट करण्यामागे काय हेतू असतो हेही त्यांना कळूद्या.

Leave A Reply

Your email address will not be published.