Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

…. आणि जिजाऊ आईसाहेबांच्या वडीलांनीच शहाजीराजांवर घाव घातला !

आपल्याला हे माहीतच असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील माननीय शहाजीराजे आणि जिजाऊ आईसाहेबांचे वडील लखुजीराव जाधव हे दोघेही निजामशाहीत सरदार होते. एकदा झालं असं की निजामशहाचा दरबार भरला होता. दरबारातील कामकाज आटोपल्यावर सर्व सरदार आप-आपल्या घरी जाण्यास निघाले. काही सरदार आपल्या वाहनावर स्वार होऊन निघून गेले तर काही सरदार निघण्याच्या तयारीत होते. लखूजीराव जाधव हेही तेथून निघून गेले होते.

तेवढ्यात अचानक एक बातमी आली की खंडागळे सरदारांचा हत्ती बिथरला आहे आणि तो आपल्या सोंडेने सपासप माणसं लोळवतोय. हत्तीवर बसलेला महूत त्याला आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता पण हत्ती काही आवरेना. हत्तीने तर एकाएकी रौद्ररूपच धारण केले होते. त्याला आवर घालण्यासाठी पुढे येण्याची कोणाची हिंमत होईना.

शेवटी शूर असलेले जिजाऊ आईसाहेबांचे भाऊ दत्ताजीराव जाधव (लखुजीरावांचे पुत्र आणि शहाजीराजांचे मेहुणे) यांनी आपल्या घोडेस्वारास हुकूम दिला की हत्तीला आवरा. हत्तीला आवरण्यासाठी मोठे रणकंदन झाले. जाधवरावांच्या कित्येक सैनिकांना प्राणास मुकावे लागले. आपल्या सैनिकांचा झालेला मृत्यू दत्ताजीरावांना सहन झाला नाही आणि ते हत्तीवर त्वेषाने तुटून पडले.

हे पाहून शहाजीराजांचे चुलत भाऊ संभाजी राजे भोसले त्यांना ओरडून सांगत होते की हत्तीला मारण्याची गरज नाही. दत्ताजीरावांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. त्यामुळे संभाजीराजे हत्तीच्या रक्षणासाठी धावले. तेवढ्यात दत्ताजीरावांनी हत्तीची सोंडच कापली आणि एव्हढ्यावरच न थांबता त्यांनी संभाजी राजांवर हल्ला चढवला, दोघांमध्ये अटीतटीची झुंज सुरु झाली. दत्ताजी आणि संभाजी राजे यांची झटपट बघून दोन्हींकडील मंडळी हत्यारे घेऊन धावली. या झुंजीमध्ये संभाजीराजेंच्या हातून लखूजी जाधवरावांचा मुलगा दत्ताजीराव ठार झाला.

लखुजीराव जाधव, शहाजीराजे भोसले, भोसले जाधव घराणे वैर, खंडागळे हत्ती घटना, जिजाऊ, khandagale hatti ghatna, lakhujirav jadhav, shahajiraje bhosle, Bhosle vs jadhav, jijau, maratha empire

दत्ताजीरावांच्या मृत्यूची बातमी काही अंतरावर गेलेल्या लखूजीरावांना समजताच, ते संतापाने पेटून उठले आणि गर्जना करीत माघारी फिरले. तळपायाची आग मस्तकात गेलेल्या लखूजीरावांनी पहिला घाव स्वतःच्या जावयावर म्हणजेच शहाजीराजांवर घातला. शहाजीराजे जमिनीवर कोसळले. ते थोडक्यात बचावले असले तरी देखील त्यांना मूर्च्छा आली होतीच. तेवढ्यात लखूजीरावांच्या तलवारीचा जबर घाव संभाजीराजेंना बसला आणि घाव वर्मी लागल्याने संभाजीराजे जागीच ठार झाले.

एका ह्त्तीमुळे झालेल्या लढाईने लखूजीरावांनी आपला मुलगा आणि शहाजीराजेंनी आपला चुलत भाऊ गमावला.

Leave A Reply

Your email address will not be published.