Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

तो कामगार नेता सूड घ्यायला गेला आणि रतन टाटांनी त्याचा पुरता बिमोड केला

केलेल्या कारवाईने तो कामगार चांगलाच चवताळला, व्यवस्थापन आणि रतन टाटांची झोप उडवल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही असा प्रणच त्याने केला.

तसं पाहायला गेलं तर कामगार चळवळ ही महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. किंबहुना हा महाराष्ट्राच देशातील कामगार चळवळीचं उगमस्थान राहिला आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते या राज्याच्या जडणघडणी पर्यंत मोठं योगदान कामगार चळवळीनं दिलं आहे.

१८९० साली नारायण मेघोजी लोखंडे यांनी ‘बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची’ स्थापना केली. कामगारांच्या न्यायहक्कांसाठी लढणारी ही देशातील पहिला संघटना होती. आणि इथूनच खऱ्याअर्थाने सुरवात झाली देशातील कामगार चळवळीला. या चळवळीने कॉम्रेड डांगे, बी.टी.रणदिवे, एस.एस. मिरजकर, गोदावरी परुळेकर, अहिल्या रांगणेकर, जॉर्ज फर्नांडिस, दत्ता सामंत असे एकाहून एक सरस नेते कामगार वर्गाला दिले.

या नेत्यांनी कष्टकरी – कामगार वर्गासाठी दिलेला लढा, पुकारलेले संप, रस्त्यावर उतरुन केलेला संघर्ष आणि भांडवलदार – कारखानदारांना घ्यायला लावलेली माघार यांचे किस्से आजही लोकांच्या स्मरणात आहे. मात्र या किस्स्यांसोबत एक किस्सा असाही आहे, ज्यात एका प्रतिष्ठित उद्योगपतीने एका मुजोर आणि हट्टीवादी कामगार नेत्याला असा धडा शिकवला की त्याचा पुरता बिमोडच झाला. चला तर मग जाणून घेऊया काय होता तो किस्सा….

१९८८ साली टेल्कोच्या उपाध्यक्षपदी Ratan Tata आणि त्याचवर्षी झालेला संप

आपल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबातील सदस्यप्रमाणे वागवणारे, त्यांना अनेक सुखसुविधा देणारे, त्यांच्या भल्यासाठी कित्येक योजना राबवणारे उद्योगपती म्हंटलं की एक नाव आपोआपच डोळ्यासमोर येतं ते म्हणजे ‘रतन टाटा’.

रतन टाटा १९९१ मध्ये जरी टाटा सन्स आणि ग्रुपचे अध्यक्ष बनले असले, तरी त्याआधीपासूनच ते विविध जबाबदाऱ्या सांभाळत होते. ७ एप्रिल १९८८ साली पुण्यातील टेल्कोच्या उपाध्यक्ष पदाची सूत्र रतन टाटांच्या हाती आली आणि दुर्दैव म्हणजे याच वर्षी टेल्कोमध्ये ऐतिहासिक असा संप झाला.

टेल्कोतील कामगारांचा संप आणि राजन नायरच्या नावाची चर्चा

या संपामुळे राजन नायर हे नाव सर्वांच्याच नजरेत आले. तो टेल्को कामगार संघटनेचा सरचिटणीस होता, त्यानेच हा संप घडवून आणला होता. राजन नायर (Rajan Nair) म्हणजे अत्यंत उत्साही पण चळवळ्या माणूस, त्याच्या याच स्वभावामुळे टेल्कोत कामाला लागल्यापासून अवघ्या ६ वर्षांतच तो कामगार संघटनेचा सरचिटणीस बनला.

राजन मूळचा केरळचा जरी असला तरी दिर्घकाळ पुण्यात राहिल्यामुळे मराठी उत्तम बोलायचा. राजनला बॉडी बिल्डिंगचा नाद होता. तो स्वतः उत्तम बॉडी बिल्डर असल्याने पुण्याच्या कामगार वर्तुळामध्ये बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा त्याने बऱ्याच लोकप्रिय केल्या.

राजनची उंची बेताचीच असली तरी तो बोलायला जेव्हा स्टेजवर उभा राहायचा तेव्हा साऱ्यांच्याच नजरा त्याच्यावर खिळायच्या. त्याच्या बोलण्यातील आवेश, हावभाव आणि भाषाकौशल्य एवढे प्रभावी होते की सर्वांनाच त्याची दखल घेणे भाग पडायचे.

राजन नायरचे वाढते महत्त्व आणि रतन टाटांशी जवळीक

राजन (Rajan Nair) जेवढा अमराठी कामगारांमध्ये लोकप्रिय होता तेवढाच तो मराठी कामगारांमध्येही लोकप्रिय होता. एवढंच नाही तर संपाच्या आदल्याच वर्षी उत्कृष्ट कामगाराचा पुरस्कारही त्याने पटकावला होता. खुद्द रतन टाटांनीच त्याला या पुरस्काराने सन्मानित केले. त्यामुळे रतन टाटा टेल्कोच्या हजारो कामगारांतही राजनला चांगलेच ओळखायचे.

राजन नायर रतन टाटांना केव्हाही भेटू शकतो, त्याला अपॉइंटमेंटची गरज नाही, त्याची पोहोच थेट रतन टाटांपर्यंत असल्याने तो कंपनीतल्या कोणाही अधिकाऱ्याला घाबरत नाही किंवा दबत नाही. थोडक्यात काय तर राजन हा रतन टाटांचा आवडता आहे, एकप्रकारे तो त्यांचा चमचा आहे, असे त्याकाळी कामगार वर्तुळात बोलेल जायचे.

राजन नायरचा उन्माद आणि कंपनीतून निलंबन

पण ते म्हणतात ना यश प्रत्येकालाच हाताळता येत नाही. रतन टाटांशी (Ratan Tata) असलेली जवळीक आणि कामगारांमधील लोकप्रियतेमुळे राजनला गुर्मी चढली. त्याच्या वागण्यातील बेछूटपणा दिवसेंदवस वाढू लागला. त्याचा उन्माद एवढ्या टोकाला पोहचला की एका सुरक्षा रक्षकाला जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत राजनची मजल गेली.

त्याच्या या बेजबाबदार आणि उर्मट वागणुकीमुळे १९८८ साली कंपनीने राजन नायरवर निलंबनाची कारवाई केली.

रतन टाटांना अडचणीत आणण्याची आयती मिळालेली संधी

या कारवाईने राजन चांगलाच चवताळला, व्यवस्थापन आणि रतन टाटांची झोप उडवल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही असा प्रणच त्याने केला. अशातच कामगारांच्या वेतनकराराची मुदत संपून पुष्कळ महिने झाले होते. नवीन वेतन करार करायला कंपनी चालढकल करत होती. यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरली.

या नाराजीचा फायदा उठवत व्यवस्थापन आणि Ratan Tata ना अडचणीत आणण्याची आयती संधीच राजनकडे चालून आली. राजनने कामगारांमध्ये असलेल्या नाराजीचा वापर केला आणि कंपनी नवीन वेतन करार करत नाही म्हणून कामगारांचं संप घडवून आणला. कंपनीत साडेआठ हजार कामगार होते. त्यावेळी बहुदा ही पुण्यातील सर्वात मोठी कंपनी होती.

राजन नायरचा हटवादीपणा आणि रतन टाटांची ठाम भूमिका

पुण्यातील समाजसेवक, स्थानिक नेते, राजकीय मंडळी, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व अन्य पुढारी तसेच डॉ. दत्ता सामंत, पुण्यातील पत्रकार असे अनेक लोक हा संप मिटावा, कंपनी आणि व्यवस्थापनमध्ये समेट व्हावी यासाठी प्रयत्न करत होते. मात्र मी चर्चा करेन तर रतन टाटांशीच अन्यथा कोणाशीच नाही अशी आडमुठी भूमिका राजनने घेतली.

त्याचा हा हटवादीपणा पाहून राजनशी टेल्कोचे व्यवस्थापन बोलेल, मला त्याचे तोंडही पाहायचे नाही, अशी ठाम भूमिका रतन टाटांनी घेतली.

राजन नायरचा आडमुठेपणा आणि कामगारांमध्ये फूट

अनेक महिने संप सुरु होता, राजनच्या आडमुठेपणामुळे व्यवस्थापन आणि संघटनेमध्ये समेट काही होत नव्हती. काहीही झालं तरी राजन नायरला भीक घालायची नाही असा निर्धार रतन टाटांनीही केला होता.

परिणामी राजनने स्वतःच्या सुडासाठी आणि प्रतिष्ठेसाठी पुकारलेल्या या संपाला इतर पदाधिकारी विटले आणि राजन नायरच्या माणसांमध्ये फूट पडली. राजनला बाजूला ठेवून व्यवस्थापनाने संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांशी नवीन वेतन करार केला. यामुळे कामगारांमध्ये दुही माजली.

हा करार होताच राजन नायरच्या समर्थकांनी शनिवारवाड्यावर उपोषण सुरु केले. पोलिसांनी भल्या पहाटेच्या अंधारातच सर्वांना उचलून रत्नागिरीच्या तुरुंगात टाकले. या कारवाईने इतर कामगारही घाबरले.

आठ दहा महिन्यांपासून सुरु असलेल्या संपामुळे कामगार आधीच गांजले होते. राजनच्या हटीवादीपणामुळे आपले नुकसान होतेये, ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी कामावर जाण्यास सूरवात केली, कारखाना पुन्हा सुरु झाला. मात्र यासर्व गोष्टींनी राजन नायरचा पुरता बीमोड केला.

राजन नायरचा यशस्वी बीमोड आणि रतन टाटांच्या पाठीवर कौतुकाची थाप

हा सरळ सरळ Ratan Tata च्या खंबीरपणाचा आणि मूल्यांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरांतून उमटू लागली. संपाच्या पुढच्याच वर्षी टेल्कोने आपली विक्री वाढवून रतन टाटांच्या किर्तीत आणखीनच भर घातली.

या संपामुळे टेल्कोचे नुकसान झाले, कामगारांचे नुकसान झाले सोबतच सरकारचाही महसूल बुडाला. मात्र राजन सारख्या हेखेखोर माणसाला अद्दल घडवल्याबद्दल रतन टाटांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाऊ लागली.

या प्रकरणानंतर मुंबई – पुणे – ठाणे या औद्योगिक पट्ट्यातील कामगार संघटना संपावर जाण्यापूर्वी चारदा विचार करु लागल्या आणि यातून सर्वांनाच धडा मिळाला की एखादी गोष्ट तुटेपर्यंत कधीच ताणू नये!

Leave A Reply

Your email address will not be published.