स्वराज्य ! स्वराज्य म्हंटलं की आपल्याला आठवतात छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांनी मोठ्या संघर्षाने स्वराज्य स्थापन केले पण ते स्थापन केलेले स्वराज्य टिकवून ठेवणे हि सुद्धा तितकीच कठीण आणि महत्वाची जबाबदारी होती. स्वराज्य रक्षणाची आणि विस्ताराची जबाबदारी शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या पश्चात सर्वच राज्यकर्त्यांनी पार पडली पण या साऱ्यांमध्ये एक नाव मात्र घ्यावेच लागेल….स्वराज्याचे पेशवा.
छत्रपती शाहू (१) यांच्याकडून स्वराज्याच्या राज्यकारभाराची सर्व सूत्रे पेशव्यांकडे गेली आणि तिथून मग पेशवा काळ सुरु झाला. पेशवे सुद्धा अतिशय पराक्रमी, बुद्धिवान आणि उत्तम राज्यकर्ते होते. पेशव्यांमध्ये एक नाव नेहमीच घेतले जाते आणि ते म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवा, म्हणजेच स्वराज्याचे दुसरे पेशवा. त्यांच्या पराक्रमांची आठवण सर्वांनाच आहे पण, त्यांच्यानंतर सुद्धा असेच एक पेशवा राज्य करत होते आणि त्यांना स्वराज्यातील महान पेशव्यांपैकी एक गणले जाते. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी स्वराज्याचे पेशवेपद हाती घेत या पेशव्यांनी खूप नावलौकिक मिळवला आणि पराक्रम गाजवला.
त्यांचे नाव आहे ‘प्रधानपंत श्रीमंत माधवराव (बल्लाळ) पेशवा, यांनाच थोरले माधवराव पेशवे असेही ओळखले जाते.
चला मग आज बघूया थोरले माधवराव पेशवे यांची रंजक कहाणी
माधवराव हे पेशवा बाळाजी बाजीराव म्हणजेच पेशवा नानासाहेब यांचे पुत्र. नानासाहेबांना विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव अशी तीन अपत्ये. थोरल्या बाजीरावांच्या मृत्यू नंतर नानासाहेब पेशवापदी आले. त्यांनी अतिशय उत्तम राज्य केले परंतु, अहमद शाह अब्दाली याच्याशी झालेल्या पानिपतच्या युद्धात (३ऱ्या) मराठ्यांचा पराभव झाला आणि याच धसक्याने नानासाहेब २३ जुन १७६१ रोजी मरण पावले. नानासाहेबांनंतर त्यांचा थोरला पुत्र विश्वासराव पेशवापदी विराजमान होणार होता परंतु, विश्वासराव पानिपतच्या युद्धात मृत्यू पावले.
ठरल्याप्रमाणे आता पेशवेपदाची सूत्रे माधवराव यांच्याकडे दिली जाणार होती परंतु वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी हे पद आणि आभाळाएवढी जबाबदारी माधवरावांना सांभाळता यावी यासाठी त्यांच्या काकांच्या म्हणजेच रघुनाथराव (राघोबादादा) यांच्या अध्यक्षतेखाली माधवरावांना पेशवे पदाची जबाबदारी २० जुलै १७६१ रोजी सोपविण्यात आली.
माधवरावांनी पेशवे पदाची सूत्रे हाती घेतली तेंव्हा मराठा साम्राज्याची परिस्थिती अतिशय बिकट होती. याची मुख्य कारणे होती पानिपतची लढाई आणि त्यातील पराभव. पानिपतच्या पराभवाने मराठ्यांचे नावलौकिक अस्ताला येण्याच्या मार्गावर होते त्याचबरोबर, मराठ्यांची राजकीय स्थिती सुद्धा अस्थिर होत गेली. उत्तरेतील मराठ्यांची सत्ता कमकुवत होत गेली आणि एकेकाळी मराठ्यांच्या अधिपत्त्याखाली असलेले जाट, रोहिला आणि बुंदेला आणि इतर मंडळी आता मराठ्यांच्या अशक्तपणाचा फायदा घेत होती.
मराठा साम्राज्यातीलच अनेक मंडळींना पेशवा हे अधिकारपद मान्य नव्हते इतकेच कशाला, ज्यांच्या अध्यक्षतेखाली माधवरावांना पेशवा केले ते राघोबादादा स्वतः पेशवेपदाच्या लालसेपोटी अनेक डावपेच खेळत होते, अनेक शत्रूंशी हातमिळवणी करीत होते. मराठा साम्राज्याची आर्थिक परिस्थिती पानिपत वरील युद्धामुळे अस्ताजवळ होती, बरेच सैन्य कामी आले होते (मरण पावले होते). अशा अस्थिर परिस्थितीत माधवराव वयाच्या १६व्या वर्षी पेशवा झाले आणि मग कालांतराने राघोबादादांच्या कपटीपणाचा पत्ता लागल्याने त्यांनी राघोबादादांच्या अध्यक्षतेखाली न राहता स्वतःच पेशवेपद सांभाळायचे ठरविले आणि उत्तम रित्या ते कर्तव्य पार पाडले.
निझामाचा हल्ला
पेशवा पदाची जबाबदारी नुकतीच माधवरावांच्या हाती आली होती आणि ते राघोबादादांच्या अध्यक्षतेखाली आहेत हे समजल्यावर हैदराबादचा निझाम ‘नवाब मीर निझाम अली खान सिद्दीकी’ याने पुण्यावर हल्ला केला. तब्बल ६०,००० सैन्य घेऊन निझाम पुण्यावर चाल करून आला. वाटेत काही देवळांची नासधूस करून निझामाने या राजकीय वादाला धार्मिक रूप दिले. पुण्यातील अनेक लोकांनी लोहगड, सिंहगड अशा ठिकाणी आसरा घेतला अशा नोंदी आहेत इतका निझामाचा धसका पुणे आणि मराठा साम्राज्याला बसला होता.
अखेर जवळपास ७०,००० फौज घेऊन माधवराव सज्ज झाले, सोबत राघोबादादा होतेच. निझाम उरळी येथे असतानाच मराठा फौजांनी त्याला वेढले आणि शेवटी तह करण्यास भाग पाडले. या तहाची बोलणी करण्यासाठी राघोबादादांनी पुढाकार घेतला आणि आपल्या भविष्यातील काटकारस्थानांना खतपाणी घालण्यासाठी निझाम उत्तम मित्र होऊ शकतो या आशेने राघोबादादांनी अतिशय मोजक्या आणि शुल्लक अटी म्हणजेच ४०,००००० चा मुलुख देणे वैगरे अशा ठेवल्या. हे मान्य नसल्याने राघोबादादा आणि माधवराव यांच्यातील संबंध अजून बिघडत गेले.
राक्षसभुवनची लढाई
हा १७६३ चा वगैरे काळ होता, निझामाने मराठ्यांच्या फौजा पुण्यात नाहीत हे पाहून पुन्हा पुण्यावर हल्ला केला परंतु मराठा सैन्य पुण्याकडे कूच करत आहे हे कळताच त्याने सैन्यासह पळ काढला आणि माजलगाव येथे आला आणि पाहतो तर गोदावरी नदीला पूर होता म्हणून निझाम स्वतः नदी ओलांडून गेला आणि आपल्या सैन्याची धुरा सरदार विठ्ठल सुंदर यांच्याकडे सोपवली. माधवराव आपली मराठा फौज घेऊन १० ऑगस्ट १७६३ रोजी निजामावर चाल करते झाले.
या युद्धात मराठा फौजेने अतिशय विलक्षण कामगिरी केली आणि निझामी फौजांना जोरदार लढत दिली. थोड्याच वेळात विठ्ठल सुंदर स्वतः लढाईत उतरले आणि राघोबादादांकडे कूच करते झाले, मग लगेचच स्वतः माधवराव पेशवा अश्वारूढ होऊन रणांगणात उतरले आणि स्वतः विठ्ठल सुंदरला ठार करून त्याचे शीर कलम करून ते नदीपलीकडे निझामाला पाठवून दिले.
राघोबादादांचे कट कारस्थान
राघोबादादा आणि माधवराव या दोघांतील मतभेद खूप विकोपाला गेले आणि राघोबादादांनी अखेर पुणे सोडले आणि निझाम तसेच अन्य काही फौज येऊन त्यांना मिळाल्या आणि त्यांनी पुण्यावर हल्ला करण्याचा डाव आखला. या नंतर काही काळ राघोबादादा व माधवराव यांच्यातील संबंध पुन्हा स्थिर झाले परंतु मध्येच राघोबादादांनी स्वराज्याची वाटणी करावी असा प्रस्ताव टाकला आणि साहजिकच हा माधवराव यांनी धुडकावून लावला आणि राघोबादादांना उत्तरेत पाठविण्यात आले.
उत्तरेतून परतल्यावर राघोबादादा पुन्हा माधवराव यांच्या विरुद्ध कारस्थाने करू लागले. त्यांनी धोडप हा किल्ला काबीज केला आणि स्वतःच्या समर्थानात असणारी मंडळी गोळा केली आणि इंग्रजांशी सुद्धा मैत्री केली. सुमारे १० जुलै १७६८ रोजी मराठा फौजांनी अचानक राघोबादादांच्या सैन्यावर स्वारी केली आणि त्यांना पराभूत केले अखेर राघोबादादा शरण आले आणि पुढे माधवराव यांच्या मृत्यू पर्यंत राघोबादादांना नजरकैदेत ठेवण्यात आले.
राजयक्ष्म
माधवराव पेशवा झाले आणि अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली. परंतु सतत होणारी धावपळ, लढाया आणि प्रत्येक बाजूने येणारी संकटे थोपवण्यात सारखे व्यस्त असणाऱ्या माधवरावांना शरीराने पूर्ण साथ दिली नाही. माधवरावांना राजयक्ष्म हा आतड्यांचा आजार झाला होता आणि यामुळे ते अतिशय त्रासलेले होते. १७७० साली माधवरावांनी दक्षिण मोहीम आखली आणि ते कूच करत गेले परंतु त्यांना होणाऱ्या शारीरिक त्रासामुळे त्यांनी मिरजेत विश्राम केला. त्यांना या मोहिमेतून माघारी यावे लागले आणि पूढे त्यांनी अनेक वैद्य तसेच इंग्रज डॉक्टरांकडून सुद्धा उपचार करवून घेतले परंतु कसलाही परिणाम माधवरावांच्या आरोग्यावर होत नव्हता.
आपले अखेरचे क्षण माधवरावांनी थेऊर येथील चिंतामणी गणेशाच्या सानिध्यात व्यतीत करण्याचे योजिले आणि अखेर वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी, १८ नोव्हेंबर १७७२ रोजी (कार्तिक वद्य अष्टमी, शके १६९४, नंदननाम संवत्सर, बुधवार) मराठा साम्राज्याचे ४थे पेशवा अनंतात विलीन झाले. स्वराज्याचे ४थे पेशवा माधवराव यांना अतिशय कमी वयातच पेशवे पदाची सूत्रे देण्यात आली पण त्यांनी अतिशय उत्तम रित्या आपल्या जबाबदाऱ्या पार पडल्या.
माधवराव पेशवे यांना मराठा साम्राज्याचे महान पेशवे म्हणुन गणले जाते. पानिपत युद्धानंतर मराठा साम्राज्याची गेलेली सत्ता परत मिळवणे, स्वराज्याचा आर्थिक ह्रास भरून काढणे, अंतर्गत वाद आणि काटकारस्थानांना सामोरे जाणे, निझामाचा मुकाबला करणे, दक्षिणेत आपला वचक कायम करणें, रक्षाभुवन च्या लढाईत अतुल्य पराक्रम करणे, इंग्रजांशी नेहमी कठोर आणि सावध धोरण ठेऊन एकही हातमिळवणी अथवा तह न करणे आणि इंग्रजांना हस्तक्षेप करू न देणे, दक्षिणेत मराठा सत्ता बळकट करणे आणि अशा अनेक कामांना पेशवे माधवराव यांनी सफल केले आहे.
माधवरावांची सत्ता, निष्ठा, सुसज्ज नियोजन आणि करारीपणा तसेच युद्धप्रसंगी असलेले शौर्य या साऱ्यामुळे पानिपत युद्धानंतर विस्कटलेली स्वराज्याची घडी पुन्हा पूर्ववत झाली. माधवरावांच्या सत्ताकाळात मराठ्यांनी आपली सैन्यशक्ती परत कमावली आणि त्याचबरोबर माधवरावांनी स्वतःला एक योग्य पेशवा, योग्य योद्धा आणि राज्यकर्ता सिद्ध केले. माधवरावांनी १७६१ ते १७७२ असे ११ च वर्षे राज्य केले पण मराठा साम्राज्य त्याही कालावधीत सुसज्ज आणि सुबक केले.
छान माहिती. इतिहासाबद्दल अजून माहिती वाचायला आवडेल.
खुप छान माहीती
धन्यवाद सतीश कुलकर्णी जी.
लेख आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.