Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

१०० गनिमांच्या तुकडीला एकटे भारी पडणारे सरनौबत हंबीरमामा

स्वराज्य, म्हणजे स्वतःचे आणि आपले राज्य असे आपण म्हणतो परंतु या बोलण्यापलीकडे आपण विशेष काही करत नाही. पण शिवरायांच्या स्वराज्यात असे मावळे, निष्ठावंत मंडळी होती कि ज्यांनी स्वराज्य म्हणजे आपले राज्य हे फक्त बोलून दाखविले नाही तर आपल्या कार्याने त्यांनी आपला शब्द आणि स्वराज्याचा अर्थही राखला. शिवरायांनी जोडलेली मंडळी शिवरायांसोबत सावलीसारखी सोबत असत आणि इतकेच नव्हे तर शिवरायांच्या मृत्यूनंतरही स्वराज्याचे शिलेदारानी शिवरायांप्रती आणि स्वराज्याप्रती असणारी आपली निष्ठा ढळू दिली नाही, उलट शिवराय गेल्यानंतर हि मंडळी अजून जोमाने स्वराज्य रक्षण आणि विस्ताराच्या कामाला लागली. या मंडळींत अनेक नावं येतात, घ्यावी तेवढी कमीच आहेत परंतु, एक नाव इतिहासाने कायमच जपले आहे ते म्हणजे हंबीरराव मोहिते.

हंसाजी मोहिते

हंबीरराव मोहिते यांचे खरे नाव हंसाजी मोहिते, छत्रपती शिवरायांनी त्यांना त्यांच्या अनेकवेळा केलेल्या बहादूरीबद्दल हंबीरराव हा किताब दिला होता. यामुळे हंसाजी मोहिते यांना सर्वजण हंबीरराव मोहिते म्हणूनच ओळखतात. छत्रपती संभाजी राजांच्या काळातही हंबीरराव कार्यरत होते आणि शंभूराजे त्यांना हंबीरमामा अशी प्रेमळ हाक देत असत.

स्वराज्याचे पहिले सरनौबत अथवा सरसेनापती हंबीरराव मोहिते.

हंसाजी यांचा जन्म १६४० मध्ये तळबीड, सातारा येथे झाला. हंसाजी यांना स्वराज्याचे पहिले सरनौबत असेही संबोधले जाते. याचे कारण असे कि, हंसाजी यांच्या आधी देखील काही मंडळी सरनौबत पदी विराजमान होतीच परंतु, शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर जेव्हा स्वराज्य आणि स्वराज्याचा छत्रपती हे दोन्ही अधिकृत झाले तेव्हा राजांनी पुन्हा आपल्या मंत्रिमंडळाची नेमणूक केली आणि त्यात सरनौबत म्हणून पद आणि मानाची वस्त्रे हंसाजी मोहिते यांना देण्यात आली हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती होण्याचा मान त्यांना मिळाला.

Senapati Hambirrao Mohite in marathi, सरनौबत हंबीरमामा, हंसाजी मोहिते, मोहिते घराण्याचे भोंसल्यांशी नाते, हंबीररावांचे योगदान, स्वराज्याचे शिलेदार,  छत्रपती शिवराय, Maratha History, Hambirrao Mohite, हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती, Senapati Hambirrao Mohite, hambirrao mohite wiki marathi,
Source – Pinterest.ie

बहलोल खान या शत्रूशी लढाई करताना १६७४ मध्ये प्रतापराव गुजर कामी आले, हेच प्रतापराव आधी सरसेनापती म्हणून कार्यभार सांभाळत होते, राज्याभिषेकाच्या आधीच प्रतापराव गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली होती, म्हणून प्रतापरावांनंतर त्यांच्याच तोडीचे आणि उजवे असणारे हंबीरराव यांना सरसेनापती पदाची जबाबदारी देण्यात आली.

मोहिते घराण्याचे भोंसल्यांशी नाते

मोहिते घराणे पूर्वीपासून पराक्रमी, आदिलशाही आणि निजामशाहीत देखील मोहित्यांच्या पूर्वजांनी पराक्रम गाजविले आहेत. तळबीड मधील पाटीलकी सांभाळणाऱ्या या घराण्यातीलच संभाजी मोहिते हे शहाजी राजांच्या सैन्यात सामील होते. कालांतराने संभाजी मोहिते हे शहाजी राजांच्या सैन्यात मोठ्या पदावर होते. पुढे शहाजीराजे कर्नाटकात निघून गेले परंतु, संभाजी मोहिते यांना मुलगी होती, तिचे नाव सोयराबाई आणि याच सोयराबाईंचा विवाह संभाजी मोहिते यांनी शहाजी राजांच्या मुलाशी म्हणजेच आपल्या शिवरायांशी लावून दिला. याच संभाजी मोहित्यांचे पुत्र म्हणजेच हंसाजी मोहिते होय.

पुढे कालांतराने याच हंसजींना शिवरायांनी हंबीरराव हा किताब दिला आणि स्वराज्याच्या सरसेनापती या पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. याच हंबीररावांनी कन्या ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवरायांच्या धाकट्या पुत्रासोबत म्हणजेच राजाराम राजांसोबत केला आणि पुन्हा मोहिते आणि भोसले यांची सोयरीक घट्ट विणली गेली. याच ताराराणींनी पुढे पराक्रम गाजवत आपल्या वडिलांचे आणि पर्यायाने स्वराज्याचे नाव गाजविले.

हंबीररावांचे योगदान

हंबीररावांचे वर्णन करायचे झाले तर स्वराज्यातील निष्ठावंत वादळ असे करावे लागेल. जवळपास गनिमाच्या १०० च्या एका तुकडीलाही एकटे भारी पडावे असे आपले हंबीरमामा होते. अनेक मोहिमा हंबीररावांनी मोठ्या निष्ठेने पार पाडल्या आणि विजय देखील मिळविला. नेसरीच्या लढाई मध्ये मराठ्यांनी आपले सरनौबत प्रतापराव गुजर यांना गमावले होते. यामुळे मराठे सैन्य कमकुवत पडले असतांनाच हंबीररावांनी सैन्याचे नेतृत्व आपल्या हाती घेतले आणि मराठ्यांचा शत्रू बहलोल खान याच्यावर चाल केली.

राजकारण, युद्धनीती, युक्ती आणि शक्ती यांची जोड असलेले हंबीरराव आपल्या सैन्यासहीत विजयी झाले आणि मराठ्यांच्या संभाव्य पराभवाला हंबीररावांनी विजयाची उंची दिली. अशा वीर आणि शक्तिशाली सरनौबतांच्या अध्यक्षतेखाली मराठा सैन्य अजूनच आत्मविश्वासू आणि बळकट झाले. शिवरायांच्या आदेशावरून हंबीररावांनी आपल्या सैन्यासोबत मोहीम करीत दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यांवर चाल केली आणि यासोबतच मुघलांच्या अनेक प्रदेशांत धुमाकूळ घातला.

महाराज कर्नाटक मोहिमेवर असताना देखील हंबीररावांवर अनेक जबाबदाऱ्या होत्या, त्यांनी आदिलशाहीचा कर्नाटकातील पठाण हुसैनखान याचा जोरदार पराभव केला आणि तिथेही मराठे सैन्य सरस सिद्ध केले.

Senapati Hambirrao Mohite in marathi, सरनौबत हंबीरमामा, हंसाजी मोहिते, मोहिते घराण्याचे भोंसल्यांशी नाते, हंबीररावांचे योगदान, स्वराज्याचे शिलेदार,  छत्रपती शिवराय, Maratha History, Hambirrao Mohite, हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती, Senapati Hambirrao Mohite, hambirrao mohite wiki marathi,
Source – YouTube

निष्ठेची व्याख्या : हंबीरराव

छत्रपती शिवाजी राजांच्या विश्वासू माणसांपैकी हंबीरराव हे एक. छत्रपतींच्या सहवासात सतत राहिलेले हंबीरराव यांनी शिवरायांचे थोरले पुत्र संभाजीराजे यांना देखील आपल्या अंगाखांद्यावर खेळविले, वाढविले. शिवरायांप्रमाणेच शंभूराजेही माणसे जोडण्यात आणि माणसांची पारख करण्यात उत्तम होते. हंबीरराव हे खरेतर संभाजीराजांच्या सावत्र आईसाहेब सोयराबाई यांचे सख्खे भाऊ आणि राजाराम राजांचे सख्खे मामा. असे असूनही संभाजी राजांचे आणि हंबीररावांचे असे काही सूत जुळले कि त्यांचे नाते मामा आणि भाचा, युवराज आणि कार्यकारी, छत्रपती आणि सरनौबत अशा अनेक चौकटींच्या पुढे होते.

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी सईबाई हयात नसल्याने सोयराबाई यांना महाराणी म्हणून अभिषेक झाला परंतु त्यांचा मुलगा राजाराम यांच्यावर युवराज म्हणून अभिषेक न होता, सईबाईंच्या मुलाला म्हणजेच आपल्या शंभुराजांना युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला. याच काळापासून मग छत्रपतींचा वारसदार राजाराम का नसावेत या वादाला तोंड फुटले.

अनेक सरदारांनी आणि मंत्र्यांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर राजाराम राजांना छत्रपती करण्याचा कट केला. अनेक मराठे याच्या समर्थानात होते तर बरेच मराठे याला विरोध करीत होते. शंभूराजे हे वादळ थोपविणे असे सहज सोपे काम नव्हते म्हणून हंबीररावांसारख्या शक्तिशाली माणसाकडे एक जबाबदारी आली ती म्हणजे संभाजी राजांना कैद करण्याची. आपण सोयराबाईंचे सक्खे भाऊ, राजाराम राजांचे सख्खे मामा… संभाजी शेवटी सख्खे नव्हे तर आपण राजाराम राजे व आपल्या सख्या बहिणीच्या बाजूने उभे राहावे अशी विनंती आणि धमकीही हंबीररावांना देण्यात आली.

इतकं सगळं होऊनसुद्धा आपले हंबीरराव उभे राहिले ते शंभूराजांच्या बाजूने, त्यांनी आपल्या कर्तव्यापुढे आपले नातेदेखील बाजूला सारले आणि शंभूराजे आणि हंबीरमामा या नात्याला निष्ठेची जोड दिली. कपटी मराठा सरदारांनी विनंती केली, मग लाच दिली, आमिषं दाखविली, शेवटी धमकीही आणि हुकूमही दिला परंतु हंबीरराव शंभुराजांना अटक करण्यास मुळीच तैयार झाले नाहीत. उलट अनेक मराठे शंभूराजांच्या विरोधात असतांना आपले हंबीरराव मात्र एका प्रचंड आधारासारखे शंभूराजांच्या सोबत उभे राहिले आणि त्यांचे बळ द्विगुणित केले.

केवळ एक युवराज आणि राजे म्हणून नाही तर स्वतःच्या सख्या भाच्यापेक्षा आणि बहिणीपेक्षा हंबीररावांचे नाते शंभूराजांशी घट्ट होते आणि या नात्यासोबतच शंभूराजांप्रती कमालीची निष्ठा, कर्तव्याची जाणीव, जबाबदारी या साऱ्याची जाण ठेवत हंबीररावांनी नेहमीच शंभुराजांना आपला पाठिंबा दिला आणि वडिलांच्या निधनानंतर वडील म्हणून त्यांनीही शंभूराजांची मायेने जपणूक केली, त्यांचा आदर देखील केला आणि स्वतःची निष्ठा त्यांच्या पायाशी वाहिली देखील.

१६८७ मध्ये शंभूराजे छत्रपती असतांना, मुघल आणि मराठे यांच्यामध्ये वाई येथे युद्ध झाले. या युद्धाचे नेतृत्व मुघलांकडून सर्जा खान करीत होता आणि मराठ्यांकडून शंभुराजांनी आपले सैन्य हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पाठविले. मराठ्यांनी हंबीररावांच्या नेतृत्वाखाली जोरदार पराक्रम केला, सर्जाखान याला पराभूत करून मुघलांना चांगलीच अद्दल घडविली परंतु या युद्धात तोफेचे मारे होत असतांना आपल्या हंबीररावांना तोफेचे गोळे लागून त्यांचा मृत्यू झाला. विजय तर मिळाला परंतु मराठ्यांचा दिग्विजयी मोहरा हरपला.

Senapati Hambirrao Mohite in marathi, सरनौबत हंबीरमामा, हंसाजी मोहिते, मोहिते घराण्याचे भोंसल्यांशी नाते, हंबीररावांचे योगदान, स्वराज्याचे शिलेदार,  छत्रपती शिवराय, Maratha History, Hambirrao Mohite, हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती, Senapati Hambirrao Mohite, hambirrao mohite wiki marathi,
Source – Wikipedia

शिवाजी महाराजांना निश्चयाचा महामेरू असे म्हटले जाते, हे ऐकून मला वाटते आपले इमान, आपली निष्ठा, आपले प्राण सर्वच छत्रपतींच्या (शिवराय आणि शंभूराजे) पायाशी वाहणारे हंबीरराव म्हणजेच स्वराज्याचे खऱ्या अर्थाने पहिले सरनौबत हंसाजी मोहिते हंबीरराव यांना ‘निष्ठेचा महामेरू’ असे संबोधले तर ते वावगे ठरणार नाही. शिवरायांचे स्वराज्य आणि मराठ्यांचा इतिहास हा एक विशाल सागर आहे आणि याच सागरातील हि अशी माणसं छोटे छोटे भाग आहेत, ज्यांच्याकडून आभाळाएवढं घेण्यासारखं आहे. अशा आभाळ आणि अथांग, निष्ठावंत हंबीररावांना मनाचा मुजरा.


Leave A Reply

Your email address will not be published.