त्या दिवशी विलासराव आणि सभेला आलेले हजारो लोक ढसाढसा रडले
१९८० साली ए.आर.अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा अंतुलेंच्या नवीन मंत्रिमंडळात आपल्याला काम करण्याची संधी मिळेल असे विलासरावांना वाटत होते. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही.
आपण कितीही नाही म्हंटलं तरी राजकारण हे तसं स्वार्थाचं क्षेत्र. इथे प्रत्येक जण आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद मिळवण्यासाठी आसुसलेला असतो. आपलं पद कसं सुरक्षित राहील, आपलं महत्त्व कसं वाढेल, त्यातून आपला फायदा कसा करता येईल याच प्रयत्नात इथे प्रत्येकजण असतो. मात्र प्रत्येक गोष्टीला जसे अपवाद असतात तसे राजकारणातही आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील तो अपवाद म्हणजे स्वर्गीय विलासरावजी देशमुख.
विलासराव एक अजब रसायन
विलासराव म्हणजे हसऱ्या चेहऱ्याचे दिलखुलास व्यक्तिमत्त्व, विलासराव म्हणजे कर्तृत्व, नेतृत्व आणि वकृत्वाचा सुरेख संगम. विलासराव म्हणजे विरोधकालाही आपलंस करणारं अजब रसायन. कितीही विशेषण लावली तरी ती पुरी पडत नाहीत कारण विलासराव व्यक्तिमत्वच असे होते की ते शब्दात मावत नाही.
विलासरावांचा राजकीय प्रवास हा अगदी ग्रामपंचायतीपासून सुरु झालेला. एक एक माणूस जोडत, लोकांपर्यंत पोहचत, कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी करत विलासरावांनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले आणि पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्रच आपल्या कवेत घेतला.
निस्वार्थी विलासराव
यशाच्या शिखराकडे वाटचाल करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बरेचदा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, आपण ज्या गोष्टीस पात्र आहोत त्यादेखील मिळत नाही आणि मग यातूनच सूडाची किंवा वैमनस्याची भावना निर्माण होते.
मात्र विलासराव इथेही अपवाद ठरले. विलासरावांना कष्टाने जे मिळालं ते त्यांनी स्वीकारलं आणि जे मिळालं नाही ते मोठ्या मनाने सोडूनही दिलं. त्यांनी कधीही कुणाबद्दल राग, द्वेष, इर्षा बाळगली नाही आणि हेच त्यांच्या यशाचं गमक ठरलं.

ए.आर.अंतुले मुख्यमंत्री बनले परंतू विलासरावांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही
विलासरावांच्या याच गुणाची प्रचिती देणारा एक किस्सा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्याबाबतीत घडला. १९८० साली ए.आर.अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा अंतुलेंच्या नवीन मंत्रिमंडळात आपल्याला काम करण्याची संधी मिळेल असे विलासरावांना वाटत होते. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. अंतुलेंनी विलासरावांना संधी न दिल्यामुळे विलासराव मंत्रिमंडळाबाहेरच राहिले.
अंतुलेंनी लातूर जिल्हा दिला
विलासरावांनी या गोष्टीचे वाईट वाटून घेतले नाही. जे मिळालं नाही ते मोठ्या मनाने सोडून द्यायचं, हा गुण मुळातच अंगी असलेल्या विलासरावांनी अंतुलेंबद्दल कोणताही राग मनात न धरता त्यांना लातूरला बोलावून त्यांचा भव्यदिव्य सत्कार केला. (तेव्हा लातूर हा वेगळा जिल्हा नसून उस्मानाबाद जिल्ह्याचाच एक भाग होता.)
या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक भाषण स्वतः विलासरावांनी केले आणि म्हणाले, “अंतुले साहेब तुम्ही लातूरला प्रतिनिधित्व दिलं नाहीत, काही हरकत नाही. पण तुम्ही आम्हाला लातूर जिल्हा द्या”.
विलासरावांचं हे भाषण संपताच अंतुले भाषणाला उभे राहिले आणि म्हणाले, “अहो विलासराव मागून मागून तुम्ही काय मागितलं, लातूर जिल्हा…..दिला”.

अंतुलेंचा ‘दिला’ हा शब्द ऐकून सारेच चाट पडले. कोणाला काहीच कळेना, सभेला आलेल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली आणि जेव्हा ही कुजबुज थांबली तेव्हा अंतुलेंनी वाक्य पूर्ण करत म्हंटलं, “तुम्हाला लातूर जिल्हा दिला” आणि सारा आसमंत टाळ्यांनी दणाणून गेला.
सिमेंट घोटाळ्याचा आरोप आणि अंतुलेंचे मुख्यमंत्री पद गेले
१९८० साली मुख्यमंत्री झालेल्या ए.आर. अंतुलेंचे मुख्यमंत्री पद फार काळ टिकले नाही. त्यांच्यावर झालेल्या सिमेंट घोटाळ्यांच्या आरोपांमुळे १९८२ साली त्यांना राजीनामा द्यावा लागला. या आरोपांमधून अंतुले यांची निर्दोष मुक्तता झाली खरी. मात्र त्यांच्या राजकीय आयुष्याची १० वर्षे, ही कायदेशीर लढाई लढण्यात गेली. परिणामी ते राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेले.
लातूर जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रम आणि विलासरावांचे अंतुलेंना उद्घाटनासाठी निमंत्रण
२००७ साली लातूर जिल्ह्याच्या निर्मितीला २५ वर्षे पूर्ण झाली. तोपर्यंत विलासराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र लातूर जिल्ह्याशी असलेली त्यांची नाळ काही तुटली नव्हती. म्हणूनच त्यांनी लातूर जिल्ह्याचा रौप्य महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी चक्क ए.आर.अंतुलेंनाच आमंत्रित केले.
तेव्हा राजकारणात अंतुलेंचे पूर्वीसारखे वजन राहिले नव्हते. तरीही विलासरावांनी त्यांना बोलावणे धाडले आणि कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा मान त्यांना दिला.

अंतुलेंची विलासरावांवर स्तुतीसुमने आणि सगळ्यांचे डोळे पाणावले
अंतुले कार्यक्रमाला आले. विलासरावांनी त्यांना स्वतः फेटा बांधला. त्या बांधलेल्या फेट्यासह अंतुले भाषणाला उभे राहिले आणि म्हणाले,
“विलासराव १९८१ साली तुम्ही केलेला सत्कार मी विसरलेलो नाही. मात्र मी तुम्हाला मंत्रिमंडळात घेतलं नव्हतं, हे तुम्ही मनात ठेवलं नाही…..राजकारणात कोणी २५ दिवसही लक्षात ठेवत नाही, तुम्ही मला २५ वर्ष लक्षात ठेवलं. मी जिल्हा दिला ही फार छोटी गोष्ट आहे. मुख्यमंत्र्याचा अधिकार एवढा असतो की एक जिल्हा देणं काहीच नाही. पण तरीही तुम्ही मला लक्षात ठेवलं. फक्त लक्षातच ठेवलं नाही तर कार्यक्रमाला बोलवून माझ्या हस्ते उद्घाटन केलं, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.”
अंतुलेंचे ते शब्द ऐकून साऱ्यांचे डोळे पाणावले. सभेला आलेले हजारो लोक ढसाढसा रडले. विलासरावांच्या द्वेषशून्य राजकारणाची प्रचिती यानिमित्ताने सर्वांनाच आली. एक आदर्श राजकारणी कसा असावा याचा नवा मापदंडच त्यांच्या या कृतीने सर्वांसमोर प्रस्थापित झाला.
आज विलासराव आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी प्रस्थापित केलेले उच्च मापदंड अजूनही आहेत. द्वेष, इर्षेच्या पलीकडे जाऊन विरोधकालाही आपलंस करणारे विलासराव त्यांच्या निस्वार्थी आणि कृतज्ञ स्वभावामुळे आजही प्रत्येकाच्या मनात घर करुन आहेत.
