देवांचा राजा असूनही इंद्र देवाची पूजा का केली जात नाही ?
स्वर्गावर राज्य करणाऱ्या आणि देवांचा अधिपती मानल्या जाणाऱ्या इंद्राची कोणी पूजा करताना का दिसत नाही
अगदी वैदिक काळापासून ते आज टीव्हीवर चालणाऱ्या अनेक देवी देवतांच्या गोष्टींमध्ये आपल्याला इंद्रदेवाचा उल्लेख कुठे ना कुठे सापडतोच. इंद्राला देवांचा अधिपती मानले जाते. तोच स्वर्गावर राज्य करतो आणि तोच पाऊस पाडतो. म्हणूनच त्याला वर्षा म्हणजेच पावसाचा देखील देवता मानले जाते.
असं म्हणतात इंद्र हे विशिष्ट व्यक्तीचं नाव नसून ते एक पद आहे. त्या पदावर बसणाऱ्याला ‘इंद्रदेव’ म्हटले जाते. आतापर्यंत स्वर्गावर राज्य करणारे १४ इंद्र झाल्याचे मानले जाते. १४ मन्वंतरांमध्ये १४ वेगवेगळे इंद्र होते. त्यांची नावं ही पुढीलप्रमाणे होती – यज्ञ, विपश्यित, शीबी, विधु, मनोजव, पुरंदर, बाली, अदभुत, शांती, विश, रितुधाम, देवस्पती आणि सुची.
मग अशा स्वर्गावर राज्य करणाऱ्या आणि देवांचा अधिपती मानल्या जाणाऱ्या इंद्राची कोणी पूजा करताना का दिसत नाही किंवा त्याची मंदिर का दिसत नाही असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात त्यापैकी काही या पुढील –
१) वैदिक कालखंडामध्ये इंद्र फार प्रसिद्ध देव होता. ऋग्वेदात एकूण १२०८ सूक्ते आहेत त्यापैकी २५ टक्क्यांहून जास्त सूक्तांमध्ये इंद्र देवाचे वर्णन करण्यात आले आहे. पण नंतरच्या काळामध्ये लोक पुराणांकडे वळू लागले. हळू हळू इंद्राची जागा शंकर, विष्णू, ब्रह्मदेव तसेच इतर देवी-देवतांनी घेतली आणि इंद्राचे महत्त्व कमी होऊ लागले. याचाच अर्थ असा की वैदिक काळामध्ये खूप प्रसिद्ध असणाऱ्या इंद्राच्या प्रसिद्धीला पुराण काळामध्ये उतरती कळा लागली आणि लोक इतर देवांची पूजा अर्चा करू लागले. इंद्राची पूजा न करण्यामागे हे एक कारण असू शकते.
२) इंद्राला स्वर्गलोक खूप प्रिया होता. आपल्या पदावर कोणतीही गदा येऊ नये यासाठी इंद्र साधूंना आणि राजांना आपल्यापेक्षा बलशाली होऊ द्यायचा नाही. स्वतःचे पद अबाधित राखण्यासाठी तो ऋषीमुनींच्या यज्ञामध्ये, राजांच्या पूजेमध्ये नाना प्रकारची विघ्न आणायचा. विश्वामित्र ऋषींची तपश्चर्या एका स्त्रीचा वापर करून इंद्राने कशी मोडली होती हे आपल्या सगळ्यांना ठाऊक असेलच. म्हणायला जरी इंद्र ‘देव’ असला तरी त्याच्यामध्ये मनुष्याप्रमाणे गर्व, लोभ, असुरक्षितता असे मानवी गुण (अवगुण) होते. त्यामुळे इंद्राची पूजा न करण्यामागे हे सुद्धा एक कारण असू शकते.
३) इंद्राची पूजा न करण्यामागे एक कथा सांगितली जाते. पूर्वी उत्तर भारतात इंद्रोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होत असे. एकदा या उत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी भगवान श्रीकृष्ण यांना देण्याचे ठरले. तेव्हा या आयोजनाची जबाबदारी घेण्यास भगवान श्री कृष्णांनी घेण्यास नकार दिला.
जेव्हा त्यांना या नकाराबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की “अशा पूजेला काय अर्थ जी भितीने केली जात असेल. पाऊस पाडणे हा तर इंद्रदेवाचा धर्मच आहे. त्यामुळे मला अशा पूजेचा भाग व्हायाचे नाही. आपल्याला इंद्रोत्सवाऐवजी गोपोत्सव किंवा गोवर्धन उत्सवाचे आयोजन केले पाहिजे.”
भगवान श्रीकृष्णांचे असे मानने होते की सभोवतालच्या ज्या गोष्टींवर आपण मनापासून प्रेम करतो जसे की गाय, झाडे, गोवर्धन पर्वत यांची आपल्याला पूजा केली पाहिजे. कारण ते आपल्याला एकप्रकारे जीवन देतात आणि आपले पालनपोषण करतात.
भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे लोकांनी गोवर्धन पूजा करण्यास सुरवात केली. या कृतीमुळे चिडलेल्या इंद्रदेवाने लोकांना धडा शिकवण्यासाठी जोरदार पाऊस पाडायला सुरवात केली. या प्रलयकारी पावसाने लोक घाबरतील आणि माझ्याकडे दया याचना करतील असे इंद्राला वाटले होते. मात्र भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलत लोकांना त्याखाली आश्रय दिला आणि सर्वांचे प्राण वाचवले. इंद्राची घमेंड मोडून भगवान श्रीकृष्णांनी जी गोवर्धन पूजा सुरु केली ती आजतागायत कायम आहे.
वरील कारणांमुळेच देवांचा राजा असूनही इंद्राची पूजा होत नसावी आणि त्याचे मंदिर नसावे.