महारथी अर्जुनाचा त्याच्याच मुलाने वध केलेला
महाभारतातील अनेक सुरस कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत पण महाभारत हे एक असे महाकाव्य आहे यातील प्रत्येक पात्राला स्वतःचा इतिहास आहे आणि या इतिहासामुळे या कथा संपतच नाहीत. अर्जुन भारतातील सर्वात श्रेष्ठ धनुर्धारी आणि योद्धा म्हणून सांगितला जातो. अर्जुन संपूर्ण आयुष्यात एक देखील युद्ध पराभुत झाला नाही असे देखील आपल्याला सांगण्यात येते परंतु अर्जुन देखील एक युद्धात पराभूत झाला होता. या युद्धात त्याला त्याचे प्राण देखील गमवावे लागले होते परंतु त्याला परत जिवंत करण्यात आले. जाणून घेऊया असा कोण योद्धा होता ज्याने अर्जुनाला देखील परास्त केले.
महाभारतातील कथेनुसार अर्जुनाचे चार विवाह झाले होते. द्रौपदी, सुभद्रा, चित्रांगदा, उलुपी या चौघींशी अर्जुनाने विवाह केला होता. यातील चित्रांगदा पासून अर्जुनाला एक पुत्र होता ज्याचे नाव होते बब्रुवाहान. हा बब्रुवाहन मणिपूरचा राजा होता. महाभारत युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून धर्मराज युधिष्ठिराने अश्वमेध यज्ञाला सुरुवात केली.
अश्वमेध युद्ध करताना एक अश्वमेध घोडा सोडण्यात येतो आणि हा घोडा जिथे जाईल तिथे यज्ञ करणाऱ्या राजाची सेना मागे मागे जाते. हा अश्वमेध घोडा ज्या राज्यात जाईल त्या राजा कडे दोन पर्याय असतात, एक म्हणजे समोरच्या राजाला आपले समर्थन देणे अथवा त्याच्यासोबत युद्ध करणे.
युधिष्ठिरचा महायज्ञ सुरू असताना अर्जुन अश्वमेध यज्ञाच्या घोड्यासोबत प्रवास करत होता. अर्जुनाची किर्ती पाहून कोणताही राजा त्यांचा घोडा अडवत नसे आणि जो राजा घोडा आडवत असे त्याला अर्जुन परास्त करत असे. हा घोडा पुढे मणिपूरला आला.
अश्वमेध यज्ञाच्या घोड्यासोबत आपले पिता अर्जुन आले आहेत हे कळताच बब्रुवाहन त्यांना भेटण्यासाठी राज्याच्या सीमेवर गेला. परंतु अर्जुनाने चिडून त्याला सांगितले की, “मी आता तुझा पिता नाही तर महाराज युधिष्ठिर यांचा प्रतिनिधी आहे, त्यामुळे तू क्षत्रिय धर्माचं पालन करत माझ्याशी युद्ध करायला हवं.” बब्रुवाहन या गोष्टीला तयार होत नव्हता, तेव्हा अर्जुनची दुसरी पत्नी उलुपीने बब्रुवाहनला समजावून सांगितले कि तू आपल्या वडिलांशी युद्ध करून आपल्या धर्माचे पालन कर. शेवटी बब्रुवाहन युद्धासाठी तयार झाला.
अर्जुन आणि बब्रुवाहन यांच्यामध्ये मोठ घनघोर युद्ध झालं. बब्रुवाहन आपल्या पिताप्रमाणे एक पराक्रमी योद्धा होता. या युद्धात बब्रुवाहनने अर्जुनाचे प्राण घेतले आणि बब्रुवाहन स्वतः मूर्च्छित झाला. आपल्या पतीचे प्राण आपल्या पुत्राने घेतले हे कळाल्यानंतर बब्रुवाहनची आई चित्रांगदा रणभूमीत आली आणि शोक व्यक्त करू लागली. दरम्यान बब्रुवाहनला देखील शुध्द आली आणि त्याला पश्चाताप होऊ लागला, तो देखील आक्रोश करू लागला. तिथेच उपस्थित असलेल्या उलूपीकडे दोघेही मदतीची याचना करू लागले.

दोघांचा आक्रोश बघून उलुपीचे मन देखील खचले होते. अर्जुनाची पत्नी उलुपी हि नागकन्या होती आणि तिच्याकडे काही विशेष शक्ती होत्या. त्या परिस्थितीत उलूपीने संजीवनी मंत्राचे स्मरण करत परमेश्वराकडे अर्जुनासाठी याचना केली आणि एक दिव्य नागमनी प्रकट झाला. या नागमनीच्या साहाय्याने उलूपीने अर्जुनाला पुन्हा जिवंत केले.
जिवंत झाल्यावर अर्जुनाला आपल्या मुलाचे सामर्थ्य बघून खूप आनंद झाला. बब्रूवाहनाने अश्वमेध घोडा अर्जुनाला परत केला आणि अर्जुन पुन्हा एकदा आपल्या पुढच्या प्रवासाला निघाला.