Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

पेशवे पदासाठी काका पुतण्याचा ‘हा’ संघर्ष मराठी सत्तेला सुरुंग लावून गेला.

मराठे सरदार, राजे, पेशवे यांनी शत्रूशी दिलेल्या लढ्याबद्दल आपण ऐकत आलोय परंतु आपला इतिहास निरखून बघितला असता हे देखील आपल्या नजरेस येते कि आपलेच नातेवाईक, आप्तस्वकीय बरेचदा आपल्याच विरुद्ध काही शुल्लक कारणांमुळे विरोधात जातात आणि आपल्यासाठी आणि पर्यायाने आपल्या राज्यासाठी धोका निर्माण करतात. याची इतिहासाने अनेक उदाहरणे दिली, यातच एक उदाहरण पेशवे (भट) घराण्याचे देखील आहे.

पेशवा माधवराव (१) व त्यांचे सख्खे काका रघुनाथराव उर्फ राघोबादादा यांच्यात सुरुवातीला जरी ऐक्य असले तरी नंतर मात्र याचे परिवर्तन मत्सरात होते आणि मत्सराचे परिवर्तन युद्धात. आज याच काका पुतण्यात झालेल्या लढाईबद्दल जाणून घेऊया.

कोण होते माधवराव व रघुनाथराव (Madhavrao and Raghunathrao Peshwa)

माधवराव भट हे मराठा साम्राज्याचे ४थे पेशवा होते. माधवराव (Madhavrao Peshwe) हे पेशवा बाळाजी बाजीराव यांचे पुत्र. पानिपतच्या युद्धकाळादरम्यान एकीकडे मराठ्यांनी आपले अनेक सैनिक व आप्तस्वकीय गमावले तर दुसरीकडे पेशवा बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब देखील वारले आणि मग वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी माधवरावांवर मराठा साम्राज्याच्या पेशवे पदाची सूत्रे सोपविली गेली. पानिपतच्या युद्धात झालेली वित्तहानी आणि अशा अनेक अडचणी माधवरावांनी मोठ्या हुशारीने दूर केल्या आणि म्हणूनच त्यांना सर्व पेशव्यांच्या पंक्तीत मोठे आदराचे स्थान दिले जाते.

Raghunathrao Peshwa, Madhavrao Peshwe, Madhavrao I, Battle of Dhodap, Madhavrao vs Raghunathrao, पेशवा माधवराव (१), माधवराव भट, धोडपची लढाई, राघोबादादा, रघुनाथराव पेशवा, maratha empire, Madhavrao Peshwa in marathi
Madhavrao Peshwe, Madhavrao I

रघुनाथराव यांना राघोबादादा असे देखील म्हटले जायचे. रघुनाथराव (Raghunathrao Peshwe) यांनी देखील काही काळ पेशवेपद भूषविले आहे. हे पेशव्यांच्या पंक्तीतील ६वे पेशवा. १८ ऑगस्ट १७३४ रोजी सातारा येथे राघोबादादांचा जन्म झाला. पेशवा पहिले बाजीराव व काशीबाई यांना बाळाजी बाजीराव व रघुनाथराव अशी दोन अपत्ये आणि पेशवा बाळाजी बाजीराव यांचे पुत्र माधवराव. या नात्याने रघुनाथराव हे माधवराव यांचे सख्खे काका लागतात. पेशवा बाळाजी बाजीराव यांच्या मृत्यूनंतर रघुनाथरावांच्या अधिपत्याखालीच माधवरावांना पेशवा पदाची सूत्रे सोपविली होती.

मतभेद

साधारण १७६२ मध्ये, माधवरावांनी (Madhavrao I) कर्नाटक मोहीम आखली आणि निजामावर चाल करण्याचे ठरविले. या गोष्टीवर माधवराव व रघुनाथराव यांच्यात दुमत होते. निझामाच्या वाटेवर आपले सैन्य माधवराव घेऊन जात असतांनाच अर्ध्या वाटेवरून रघुनाथरावांनी सैन्यातून आणि मोहिमेतून माघार घेऊन पुणे गाठले. मराठा सैन्यात काही मंडळी रघुनाथरावांच्या बाजूने होती, अशा मंडळींना घेऊन रघुनाथरावांनी पुणे सोडले आणि ते मावळ मध्ये वडगाव येथे गेले आणि त्यांनी स्वतःची स्वतंत्र फौज बनवायला सुरुवात केली. पुढे रघुनाथरावांच्या सैन्याने आजूबाजूच्या प्रदेशात लूटमार सुरु केली.

हि गोष्ट माधवरावांना समजताच त्यांनी कठोर पाऊले उचलली परंतु आपल्याच काकाविरुद्ध लढाई करणे माधवरावांना योग्य वाटत नसल्याने त्यांनी रघुनाथरावांशी तह करण्याचे ठरविले. दोघांत तह झाला असूनसुद्धा काही कालावधीने रघुनाथरावांनी (Raghunathrao Peshwe) माधवरावांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या गाफील मराठा छावणीवर हल्ला केला आणि अनेकांना यमसदनी धाडले आणि माधवरावांचा पराभव केला. हैदर अली याच्या विरुद्ध माधवरावांनी मोहीम काढली असताना हैदर अलीने रघुनाथरावांना मदतीसाठी विनवणी केली होती. तेव्हा सुद्धा रघुनाथरावांनी हैदर अली याच्यासोबत करार करून त्याला मराठ्यांच्या तावडीतून सुटून जाण्यास मदत केली.

धोडपची लढाई (Battle of Dhodap)

माधवरावांना पेशवे पदावरून उतरविण्याचे आणि त्यांच्याविरुद्ध जाण्याचे रघुनाथरावांच्या कारस्थान अधिकच जोर घेत होते. आपले सख्खे काका या नात्याने माधवरावांनी त्यांना अनेकदा माफ केले होते. परंतु प्रत्येक गोष्टीला जशी मर्यादा असते तशीच माधवरावांना देखील होतीच! रघुनाथराव आपले राज्य विस्तार व्हावे यासाठी उत्तरेकडील मोहिमेवर निघाले होते परंतु हि मोहीम फसली आणि रघुनाथराव आनंदवल्ली, नाशिक येथे आले. नाशिक मध्ये धोडप नावाचा किल्ला आहे, या किल्ल्यावर रघुनाथराव वास्तव्यास होते.

धोडप हा किल्ला नाशिक मध्ये चांदवड तालुक्यात उभा आहे. साल्हेरच्या किल्ल्यानंतर हा किल्ला सह्याद्री पर्वतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच किल्ला आहे. याच किल्ल्यावर आपला मुक्काम ठोकून रघुनाथराव आपल्या पुढच्या कारस्थानाची तयारी करीत होते. त्यांना माधवरावांची जागा मिळविण्यासाठी वाट्टेल ते करायचे होते. त्यांनी याच किल्ल्यावरून माधवरावांविरुद्ध कट आखला. अनेक सरदारांना सोबत घेऊन रघुनाथरावांनी त्यांच्याशी करार केला आणि माधवरावांविरुद्ध फौज खडी केली. हे सगळे समजताच मात्र माधवरावांना हे सहन करणे अशक्य वाटू लागले आणि त्यांनी देखील रघुनाथरावांना प्रतिकार करण्याचे ठरवले.

सुमारे १० जुन १७६८ रोजी धोडापच्या नजीकच माधवराव (Madhavrao I) व त्यांच्या सैन्यांनी रघुनाथराव व त्यांच्या सैन्याला पकडले आणि या दोन्ही सैन्यात युद्ध झाले. यालाच धोडापची लढाई (Battle of Dhodap) असे देखील म्हणतात. काही वर्षापुर्वी रघुनाथरावांनी कपटाने माधवरावांच्या छावणीवर हल्ला करून माधवरावांना पराभूत केले होते. या वेळी मात्र माधवराव व त्यांचे सैन्य रघुनाथवारांच्या सैन्याला चांगलेच महागात पडले.

Raghunathrao Peshwa, Madhavrao Peshwe, Madhavrao I, Battle of Dhodap, Madhavrao vs Raghunathrao, पेशवा माधवराव (१), माधवराव भट, धोडपची लढाई, राघोबादादा, रघुनाथराव पेशवा, maratha empire, Madhavrao Peshwa in marathi
Dhodap Fort, Battle of Dhodap

रघुनाथरावांना कैद

या घमासान युद्धाच्या शेवटी, रघुनाथरावांचा पराभव झाला आणि माधवरावांनी रघुनाथरावांना कैद केले. रघुनाथरावांच्या बंडांना तूर्तास इथे विराम मिळाला. माधवरावांनी रघुनाथरावांना पुण्यात आणले. पुण्यातील शनिवार वाड्यावर रघुनाथरावांना नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय माधवरावांनी घेतला. रघुनाथरावांसोबत त्यांचा विश्वासू आणि प्रत्येक कटात साथ देणारा सखाराम बापू बोकील यांना सुद्धा नजरकैदेत ठेवण्यात आले. साधारण ऑक्टोबर १७७२ मध्ये रघुनाथरावांनी शनिवार वाड्यातील नजरकैदेतून सुटण्याचा प्रयत्न केला परंतु लगेचच हा प्रयत्न वाया गेला आणि रघुनाथरावांना पुन्हा एकदा पकडले गेले.

पुढे १८ नोव्हेंबर १७७२ रोजी आजाराच्या कारणाने माधवरावांचा मृत्यू झाला. मग १३ डिसेंबर १७७२ पासून ३० ऑगस्ट १७७३ पर्यंत नारायणराव म्हणजेच माधवरावांचे बंधू यांनी पेशवेपद भूषविले. परंतु लगेचच ५ डिसेंबर १७७३ मध्ये रघुनाथरावांनी (Raghunathrao Peshwe) पेशवेपद घेतले. परंतु रघुनाथराव यांनी देखील १७७४ पर्यंत म्हणजेच साधारण एका वर्षापर्यंतच पेशवेपद भूषविले. माधवरावांनंतर सक्षम म्हटले जावे असे पेशवेपद कोणलाही भूषवता आले नाही. सत्तेसाठी मुघलांच्यात झालेला आतील संघर्ष अगदी हुबेहुब पेशवेपदासाठी रंगला आणि राज्य विस्तार दूरच राहिला. १८१८ साली तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठी सत्तेला सुरुंग लागण्यामागचे हेच एक प्रमुख कारण.

माधवराव अजून काही काळ हयात असते तर कदाचित मराठी सत्तेची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती काही वेगळीच असती.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.