आबांनी विधानसभेत जोरदार भाषण केलं. ते भाषण एवढं जबरदस्त होतं की त्या आरोग्य संचालाकला लगेचच निलंबीत करण्यात आलं. परंतू हे प्रकरण मात्र आबांच्या चांगलंच अंगलट आलं.
एकदा विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरींनी आबांना बोलावून घेतलं, आबा त्यांच्याकडे गेले. तेव्हा एक तरुण मुलगी त्यांच्यासमोर बसून रडत होती आणि तिला बघून मधुकरराव चौधरीही रडत होते. आबांना काही कळेनाच नेमकं काय चाललं आहे.
तेवढ्यात मधुकरराव चौधरी म्हणाले “हे मी काय ऐकतोय, काय चाललंय आपल्या राज्यात. ही मुलगी एका औषध कंपनीत काम करते. तुमचे एक आरोग्य संचालक या मुलीकडे नको ती मागणी करतात. हा भ्रष्ट अधिकारी आहे. या मुलीने माझ्याकडे हे स्विस बँकेतले नंबर दिलेत. जर आपल्या राज्यामध्ये अधिकाऱ्यांचे असे खेळ चालले असतील तर आपला विधानसभेत बसून उपयोग काय”.
माहितीची सत्यता न तपासताच आबांचे विधानसभेत भाषण
यावर आबांनी लगेचच विचारलं “साहेब यावर मी काय करु”. मधुकरराव उत्तरले “तुम्ही यावर विधानसभेत बोला. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे”
आबांनी माहितीची सत्यता न पडताळताच मुलीला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी पोटतिडकीने भाषण केलं. ते भाषण एवढं जबरदस्त होतं की त्या आरोग्य संचालाकला लगेचच निलंबीत करण्यात आलं.
महाराष्ट्रातल्या डॉक्टरांची सरकारला संपाची नोटीस
दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातल्या सगळ्या डॉक्टरांनी संप करण्याची सरकारला नोटीस दिली. पुन्हा एकदा शरद पवारांनी आबांना बोलावून घेतलं आणि विचारलं “आर आर तुमच्याकडे काय काय माहित्या आहेत”. यावर आबा म्हणाले साहेब मला ज्या माहित्या होत्या, त्या सगळ्यांनी विधानसभेत दिलेल्या आहेत.
“तुम्ही दिलेले फोन नंबर बघितले, त्या मुलीचा पत्ता पोलिसांनी बघितला. हे सगळं खोटं आहे”. पवारांचं हे बोलणं ऐकून आबा त्यांच्याकडे बघतंच उभे राहिले.
पुढे पवार म्हणाले “तुम्ही दिलगिरी व्यक्त करा आणि त्या अधिकाऱ्याचं निलंबन रद्द करावं अशी मागणीही तुम्हीच करा”.
यावर आबा म्हणाले “साहेब मला दिलगिरी व्यक्त करायला लावू नका. आपण माझ्यासाठी मधुकरराव चौधरींकडे चला, आपण हा सगळा प्रकार त्यांना सांगू”
दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की टळली
शरद पवार आणि आबा मधुकरराव चौधरींकडे गेले. घडलेला सारा प्रकार त्यांना सांगितला आणि त्या आरोग्य संचालकाला अडकवण्यासाठी त्याच्या विरोधकांनी केलेलं हे कृत्य होतं, हे ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं.
त्याच दिवशी अध्यक्ष मधुकरराव चौधरींनी विधानसभेत सांगितलं की “मला काही माहित्या मिळाल्या. त्या मी आर.आरला सांगितल्या. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोग्य संचालकाला निलंबीत करण्यात आलं. पण आम्हाला मिळालेल्या माहित्या चुकीच्या होत्या” आणि आबा पुन्हा एकदा सुटले.
आबांनी माहितीची सत्यता न तपासता भाषण केलं. त्या अधिकाऱ्यावर कारवाई करायला लावली. पण त्यामागे मुलीला न्याय मिळावा हा शुद्ध हेतू होता.
आबांची हिच संवेदनशीलता त्यांची ओळख होती. अडल्या नडल्याला कसलाही विचार न करता मदत करणारा त्यांचा स्वभाव होता. समोरच्याचे दुःख तेच आपले दुःख मानून पोटतिडकीने काम करणारे आबा त्यांचा या गुणांमुळेच प्रत्येकाच्या मनात घर करुन गेले.