Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

हे हिंदी सिनेमे चक्क मराठी चित्रपटांची कॉपी आहेत

तुम्हाला ठाउक आहे का की काही हिंदी चित्रपट हे हॉलीवूड नाही, टॉलीवुड नाही तर चक्क मराठी चित्रपटांची नक्कल आहेत. ती यादी मोठी नसली तरी अभिमानास्पद आहे.

तुम्हाला एखादी हिंदी फिल्म बघतांना असं वाटलय का, ही अशी कथा ह्या आधीही आपण पाहीली आहे ? तसं बऱ्याच चित्रपटांच्या कथा ह्या ना त्या प्रकारे सारख्याच असतात. पण काही चित्रपट अगदी दुसऱ्या एका चित्रपटाची हुबेहूब नक्कल आहे असे कधी जाणवलय का ? आता तुम्ही म्हणाल की बॉलिवूड तर संकल्पना, कथा, संगीत इतकेच काय तर पोस्टर देखिल हॉलीवूडचे चोरत आलंय आणि आता तर दाक्षिणात्य सिनेमेही चोरत आहे. काही बॉलीवुडपटांच्या बाबतीत ही गोष्ट खरीच आहे. पण तुम्हाला ठाउक आहे का की काही हिंदी चित्रपट हे हॉलीवूड नाही, टॉलीवुड नाही तर चक्क मराठी चित्रपटांची नक्कल आहेत. ती यादी मोठी नसली तरी अभिमानास्पद आहे.

नागराज मंजुळेचा “सैराट” हा मराठीत आलेला आणि मराठीच नव्हे किंवा हिंदीच नव्हे तर जगभरातील चित्रपट सृष्टींनी दखल घेतलेला चित्रपट. ह्या सिनेमाने हिंदी चित्रपट सृष्टीतला बडा निर्माता करण जोहरचे लक्ष वेधुन घेतले आणि धर्मा प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली ह्या सिनेमाचा अधिकृत हिंदी रीमेक “धडक” बनला. इशान खट्टर आणि जान्हवी कपूरच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट “सैराट” इतका लोकांच्या पसंतीस उतरला नाही. हिंदी भाषिक प्रेक्षकही “सैराट” शी तुलना करुन मुळ सिनेमाच श्रेष्ठ असल्याचे सांगतात. त्याचे मल्याळम आणि पंजाब मध्येही रीमेक झाले.

ह्याच सोबत नुकताच प्रदर्शित झालेला श्रेयस तळपदे निर्मित आणि समीर पाटीलने दिग्दर्शित केलेला आणि अतिशय वेगळा विषय हाताळणारा “पोस्टर बॉईज” हा चित्रपटही मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ह्याची विनोदी हाताळनी आणि वेगळ्या विषयाने हिंदीलाही त्याची भुरळ पडली आणि श्रेयस तळपदेने ह्या सिनेमाच्या हिंदी रिमेकच्या निमित्ताने सहनिर्मिती सोबत पहिल्यांदाच दिग्दर्शानाचीही बाजु सांभाळली व त्यात सनी देओल, बॉबी देओल आणि स्वतः श्रेयस तळपदेनेही भूमिका साकारल्या आणि हा सिनेमा हिंदीतही लोकप्रिय ठरला.

हे एकुण कुणी म्हणेल की आता मराठीचे चांगले दिवस चालु आहेत. वेगळे कथानक आणि सादरीकरण ह्यामुळे मराठी सिनेमा ग्लोबल झालाय. खरंच आहे की मराठीत हाताळले जाणारे विषय आणि त्याची मांडणी ही जरा हटके असते. पण ही काही आज घडणारी गोष्ट नाही. हो, ह्या आधी देखिल काही मराठी चित्रपट होते ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला दखल घेण्यास भाग पाडले. तेही तेव्हा जेव्हा मराठी चित्रापटांच्या दर्जाच्या नावाने बोंब होती.

हे बेबी

साल २००७ ला आलेला साजिद खानचा “हे बेबी” सिनेमा आठवतोय का ? ज्यात अक्षय कुमार, फरदीन खान आणि रितेश देखमुख सह विद्या बालन ह्यांच्या भूमिका होत्या. हा सिनेमा तसा बराच बटबटीत करण्याचा प्रयत्न साजिद खानने केला पण अतिशय साधी सोपी मांडणी असलेला ह्याच आशयाचा मुळ मराठी सिनेमा म्हणजे १९८९ साली प्रदर्शित झालेला “बाळाचे बाप ब्रम्हचारी”.

marathi movies remade in hindi, marathi films, bollywood remakes of marathi movies, Hindi remakes of Marathi films, sairat hindi remake, bollywood copied marathi films, मराठी सिनेमा, हिंदीत कॉपी केलेले मराठी सिनेमे, हिंदीत बनलेले मराठी चित्रपट, मराठी चित्रपटांचे हिंदीमध्ये बनलेले रिमेक
Heyy Baby was inspired from Marathi film Balache Baap Bramhachari

ह्या मध्ये आपल्या लाडक्या अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे व अलका कुबल ह्यांच्या मुख्य भूमिका होत्या आणि गिरीश घानेकर ह्यांनी तो दिग्दर्शित केला होता. निखळ विनोदी सादरीकरण असलेला हा चित्रपट आणि अशोक सराफ व लाडक्या लक्षाची जोडी मराठी रसिक अजूनही विसरलेले नाही. “हे बेबी” हा चित्रपट हुबेहूब या मराठी चित्रपटा सारखा नसला तरी त्याची मुळ संकल्पना ही याच मराठी सिनेमातुन घेतलेली आहे हे खरे आहे. “हे बेबी” ह्या सिनेमालाही बॉक्स ऑफीसवर यश मिळाले पण ही जणू आपलीच संकल्पना असल्याच्या अविर्भावात ह्याचे सादरकर्ते वावरत होते.

टार्झन- द वंडर कार

“टार्झन- द वंडर कार” ज्यात एक कार आपल्या मालकाचा खून होताना पाहते व त्या खुनाचा बदला घेते म्हणजेच त्या मालकाचा आत्मा त्या गाडीवाटे तो बदला घेतो. आठवतंय का ? लक्ष्मीकांत बेर्डेंचा असाच एक चित्रपट ह्या आधीच येउन गेलाय, होय तोच ज्याचे नाव होते “एक गाडी बाकी अनाडी” . लाडक्या लक्ष्याचे चित्रपट महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. लक्ष्याचा हा चित्रपटही खूप गाजला होता. ह्याचा हिंदी रिमेक बनवणाऱ्यांनीही ही जणू आपलीच संकल्पना असल्याचे भासवतात. मराठी रसिकांना मात्र हे चित्रपट चांगलेच लक्षात राहीले आहेत.

भागम भाग

१९९९ साली मराठीमध्ये धुमाकुळ घालणारा एक थरारपट आला होता. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि प्रसिद्ध चाटे क्लासेस चे संस्थापक मच्छिंद्र चाटे निर्मित “बिनधास्त” हा तो चित्रपट. संपूर्ण स्त्री पात्ररचना असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि लोकप्रियही झाला. आता तुम्ही विचार कराल की “बिनधास्त” सारखे कथानक असलेला तर एकही हिंदी चित्रपट नसतांना त्याचा येथे उल्लेख करण्याचे प्रयोजन काय ? त्याचे असे आहे की अगदी हुबेहूब नसला तरी “बिनधास्त” ने एका हिंदी चित्रपटाच्या कथेला वळण देण्यात खूप मोठी भूमिका निभावली आहे. तो हिंदी चित्रपट म्हणजे २००६ साली आलेला प्रियदर्शन दिग्दर्शित “भागम भाग”. होय, ह्या चित्रपटाला थरारक वळण देणारा भाग हा मुळ बिनधास्त सिनेमाचा भाग होता.

marathi movies remade in hindi, marathi films, bollywood remakes of marathi movies, Hindi remakes of Marathi films, sairat hindi remake, bollywood copied marathi films, मराठी सिनेमा, हिंदीत कॉपी केलेले मराठी सिनेमे, हिंदीत बनलेले मराठी चित्रपट, मराठी चित्रपटांचे हिंदीमध्ये बनलेले रिमेक
Bhagam Bhag has resemblance with Marathi film Bindhast

दम लगा के हैशा

आयुष्मान खुराणा आणि भूमी पेडणेकरचा दम लगा के हैशा तुम्ही बघितला असेलच. दोघांचा अभिनय ह्यात उत्तम होताच आणि ह्या सिनेमाने अनेक अवॉर्ड सुद्धा जिंकले. पण ह्या चित्रपटाची मूळ संकल्पना देखील एका मराठी सिनेमावरून घेतलेली आहे. २०१० साली मकरंद अनासपुरे आणि तृप्ती भोईर यांचा ‘अगडबम’ नावाचा सिनेमा आलेला आणि ह्या दोन्ही चित्रपट बघितले असता ह्यात बरंच साम्य दिसून आलं.

मुंबई-दिल्ली-मुंबई

अजुन एक जाता जाता उल्लेख करावा असा हिंदी सिनेमा म्हणजे “मुंबई-दिल्ली-मुंबई”. ह्याच्या नावावरून सच्चा मराठी रसिकाला हा कोणत्या चित्रपटाचा रिमेक असेल ह्याची कल्पना आलीच असेल. होय, स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या सहज अभिनयाची जादू असलेला आणि सतीश राजवाडेंचे उत्कृष्ट दिग्दर्शन असलेला “मुंबई-पुणे-मुंबई”. ज्या चित्रपटाला मुंबई किंवा पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. त्याचाच हिंदी रिमेक असलेला “मुंबई-दिल्ली-मुंबई” ह्या हिंदी चित्रपटाला मराठी इतकं यश मिळाले नाही किंवा त्याला अजिबात प्रेक्षकही लाभले नाही असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

marathi movies remade in hindi, marathi films, bollywood remakes of marathi movies, Hindi remakes of Marathi films, sairat hindi remake, bollywood copied marathi films, मराठी सिनेमा, हिंदीत कॉपी केलेले मराठी सिनेमे, हिंदीत बनलेले मराठी चित्रपट, मराठी चित्रपटांचे हिंदीमध्ये बनलेले रिमेक
Mumbai Delhi Mumbai is remake of Marathi film Mumbai Pune Mumbai

क्यूकी मैं झूठ नही बोलता

गोविंदा आणि सुश्मिता सेनचा क्यूकी मैं झूठ नही बोलता हा सिनेमा टीव्ही वर नेहमीच लागत असतो. कितीतरी वेळा बघितला असला तरीही तो पुन्हा पुन्हा बघावा वाटतो. पण असाच एक सिनेमा याआधी मराठीत येऊन गेलाय, अहो आपल्या लक्ष्या आणि महेश कोठारेचा. ह्या चित्रपटाचं नाव होतं ‘धांगड धिंगा’. गोविंदाचा क्यूकी मैं झूठ नही बोलता बघितल्यावर कळलं कि ह्याची मूळ कथा आपल्या लक्ष्याच्या धांगड धिंगा वरूनच घेतलेली आहे.

ह्यात मला किंवा कुणालाही आनंद होईल असे काही नाही. कारण चित्रपटावर बऱ्याच लोकांचे पैसे लागलेले असतात आणि तो बॉक्स ऑफिसवर चालला नाही तर त्यांचे नुकसान होते. पण रिमेक बनवतांना नेमक्या कोणत्या गोष्टी त्या मूळ सिनेमाच्या यशाला कारणीभूत ठरल्या याचा विचार होतांना दिसत नाही. उदाहरणार्थ, सैराट मधला परश्या आणि आर्ची पाहतांना त्यांच्या एकाच गावात राहूनही असलेली सामाजिक दरी दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी अधोरेखित केली होती, ती ह्या चित्रपटाच्या हिंदी रिमेक धडक मध्ये जाणवत नाही. ह्या मुळ गोष्टींचा विचार झाला की चित्रपट पसंतीस उतरतो. अग्निपथ हे त्याचे यशस्वी उदाहरण करण जोहरनेच दाखवून दिलंय.

सध्याचा मराठी चित्रपट हा स्टार्स पेक्षा चित्रपटाच्या विषयावर भर देणारा आहे आणि ते अभिमास्पद आहे. भविष्यात असे अनेक मराठी सिनेमे जरुर येतील ज्यातून इतर भाषिक चित्रपटसृष्टींना प्रेरणा मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. फक्त मराठी चित्रपटांवर नुसतं प्रेम न करता सिनेमागृहांमध्ये गर्दी करुन त्याला अर्थिक स्थैर्यही मराठी प्रेक्षकांनी द्यायला हवे.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.